- मावळ, लोणावळा परिसरात दरड कोसळल्याच्या दुर्घटनांनंतर ‘पीएमआरडीए’च्या ‘पीडीआरएफ’कडून तात्काळ शोधमोहीम व बचावकार्य
- आळंदीत पुरात अडकलेल्या २० पोलीस कर्मचाऱ्यांसह २४ जणांची सुखरूप सुटका
- लोणावळ्यातील वेदांत अकॅडमीमध्ये अडकलेल्या २५ नागरिकांची सुखरूप सुटका
- लोणावळा परिसरात अद्यापही पीएमआरडीएचे जवान कार्यरत; तीन पथके मुक्कामी तैनात
- धायरीमध्ये बेडरूममध्ये अडकलेल्या दोन चिमुकल्या मुलींना अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढले; २४ तास नियंत्रण कक्ष सतर्क
पुणे : पुणे महानगर प्रदेशात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे विविध भागांत पूर व दरड कोसळण्याच्या गंभीर घटना घडल्या. या आपत्कालीन परिस्थितीत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अग्निशमन दल आणि पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद दलाने (पीडीआरएफ) अत्यंत तत्परतेने युद्धपातळीवर मदत व बचावकार्य राबवले. पूर आणि दरडींच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यश आले आहे. लोणावळा परिसरात अद्यापही पीएमआरडीएचे जवान कार्यरत असून, तीन पथके मुक्कामी तैनात आहेत.
मुसळधार पावसामुळे मावळ आणि लोणावळा परिसरात दरडी कोसळण्याच्या मोठ्या घटना घडल्या. पाटण (लोणावळा) येथील पाटण-बोरज रस्त्यावर दरड कोसळल्याची दुर्घटना घडली. या ठिकाणी राबविण्यात आलेल्या व्यापक शोधमोहीमेनंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका महिलेसह तिघांना बाहेर काढण्यात आले. मळवली येथे दरड कोसळल्याने सुमारे २५ ते ३० नागरिक अडकल्याची माहिती मिळताच नियंत्रण कक्षाने तातडीने हालचाली केल्या. तसेच, पवना लेकजवळील आपटी गावातही दरड कोसळून २५ ते ३० नागरिक अडकले होते. मारुंजी अग्निशमन केंद्राच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तेथे बचावकार्य सुरू केले.
नद्यांना आलेला पूर आणि सोसायट्यांमध्ये शिरलेल्या पाण्यामुळे अनेक नागरिक विविध ठिकाणी अडकले होते. पीडीआरएफच्या जवानांनी लाईफ रिंग, लाईफ जॅकेट आणि दोरीच्या साहाय्याने त्यांना सुखरूप बाहेर काढले. आळंदी येथील केंद्रे महाराज मठात नदीचा प्रवाह प्रचंड वाढल्याने पुराचे पाणी शिरले होते. मठात अडकलेल्या २० पोलीस अंमलदारांसह अन्य चार नागरिकांना पथकाने शिताफीने सुरक्षित बाहेर काढले. लोणावळा (वळवण) येथील माऊंट व्ह्यू सोसायटी व अबेडा व्हिला परिसरात नदीचे पाणी वाढल्याने बंगल्यात अडकलेल्या १५ नागरिकांची (त्यात ८ पुरुष व ७ लहान मुले) सुखरूप सुटका करण्यात आली. तसेच, दोन चारचाकी वाहने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली. चाकण-चिंबळी फाटा येथील एका नामांकित कंपनीत पुराचे पाणी शिरल्याने अडकलेल्या २० ते २५ कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
लोणावळा येथील वेदांत अकॅडमीच्या परिसरात पाणी साचल्यामुळे अडकलेल्या २५ नागरिकांची पीडीआरएफच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. जांभे गावातील ग्रामपंचायत परिसरातील घरांच्या पार्किंगमध्ये पाणी शिरल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ३० ते ३५ नागरिकांना जवळील प्राथमिक शाळेत तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले.
याशिवाय, घोरावडी स्टेशनजवळ पाण्यात अडकलेली बस, कासार साई परिसरातील घरे, मंत्रा २४ वेस्ट सोसायटीचे बेसमेंट आणि वढू खुर्द येथील नदीपात्रात अडकलेल्या सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. पूर आणि दरडींशिवाय इतरही काही आपत्कालीन कॉल्सवर पथकाने तातडीने प्रतिसाद दिला. त्यात, धायरी येथील लक्ष्मी पार्क सोसायटीतील एका फ्लॅटच्या बेडरूमचा दरवाजा लॉक झाल्याने आत अडकलेल्या ११ वर्षे व ४ वर्षे वयाच्या दोन लहान मुलींना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढून पालकांच्या स्वाधीन केले. तसेच, नांदेड सिटी येथील मंगल भैरव सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये गॅस सिलेंडरच्या रेग्युलेटरमधून गॅस गळती होत असल्याची माहिती मिळताच जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून गळती थांबवली आणि संभाव्य मोठा अनर्थ टाळला. धानोरे गाव (आळंदी) येथे रस्त्यावर काटेरी बाभळीचे मोठे झाड पडल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या माहितीवरून पथकाने चेन सॉ, कुऱ्हाड आणि क्रेनच्या साहाय्याने झाड हटवून वाहतूक सुरळीत केली.
सध्या लोणावळा परिसरात पीएमआरडीएचे जवान अद्यापही कार्यरत असून, संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला त्वरित प्रतिसाद देण्यासाठी त्या भागात पीडीआरएफची तीन पथके मुक्कामी तैनात ठेवण्यात आली आहेत. परिसरातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यकतेनुसार शोध व बचावकार्य सुरू आहे.
“नागरिकांची सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. संपूर्ण परिस्थितीवर आमचे बारकाईने लक्ष असून अग्निशमन दल आणि आपत्ती प्रतिसाद पथक २४ तास तैनात आहे. नागरिकांनी कृपया सतर्क राहावे व आपत्तीच्या वेळी तातडीने संपर्क साधावा.”
– देवेंद्र पोटफोडे, अग्निशमन दल व पीडीआरएफ प्रमुख, पीएमआरडीए, पुणे
महत्त्वाचे संपर्क
📞 आपत्ती व्यवस्थापन कक्ष: ९५४५२८२९३०
- नांदेड सिटी केंद्र : ०२०-६७५२०००१
- मारुंजी केंद्र : ०२०-६७९९२१००
- वाघोली केंद्र : ०२०-२९५१८१०१

