पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा निर्णय
पुणे | प्रतिनिधी
पुणे शहरात १५ जूनपासून लागू करण्यात आलेली एक दिवसाआड पाणीपुरवठ्याची योजना ७ जुलैपासून तात्पुरती स्थगित करण्यात आली असून, ७ जुलै ते ११ जुलै २०२६ या कालावधीत शहरात नियमित पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, धरणक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. तसेच आषाढी वारीनिमित्त मोठ्या संख्येने वारकरी पुणे शहरात दाखल होत असल्याने या कालावधीत नागरिकांना आणि वारकऱ्यांना सुरळीत पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने पाणीकपात स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेच्या आदेशानुसार १२ जुलैपर्यंत नियमित पाणीपुरवठा सुरू राहणार असून, त्यानंतर धरणक्षेत्रातील पावसाची स्थिती आणि उपलब्ध पाणीसाठा याचा आढावा घेऊन पुढील निर्णय जाहीर केला जाईल. पाणीपुरवठा विभागातील सर्व अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, जलशुद्धीकरण केंद्र तसेच वितरण विभागाला आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

