Home Blog Page 29

पानशेत वसाहतीजवळील मोठा पूल वाहतुकीसाठी बंद;पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

पुणे, दि. 1 :राजगड तालुक्यातील खानापूर ते पानशेत मार्गावरील (प्र.जि.मा. ३७) कि.मी. १४/०४५ येथे पानशेत वसाहतीजवळील मोठा पूल संरचनात्मकदृष्ट्या अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याने तो सर्व प्रकारच्या जड व हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम ११५ अंतर्गत बंद करण्यात आल असल्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गजानन पाटील यांनी जारी केले आहेत.

सदर पूल ६८ वर्षांहून अधिक जुना असून विशेष तांत्रिक परीक्षणात त्याची स्थिती अत्यंत कमकुवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. आगामी मान्सून काळात मुठा नदीच्या विसर्गामुळे दुर्घटना व जीवितहानीची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

लवासा, वरसगाव व आसपासच्या भागातून पानशेतकडे जाणारी वाहतूक निळकंठेश्वर रस्ता–डवजे–कोंढूर–बहुली–कातवडी–मांडवी–कुडजे–खडकवासला धरणमार्ग–गोऱ्हे–खानापूर या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. तसेच पानशेत व वरसगाव धरण परिसरातून पुणेकडे येणारी वाहतूक कुरण खुर्द–राणवडी–सोनपूर–ओसाडे–खानापूर–गोऱ्हे–खडकवासला धरणमार्ग–कुडजे–मांडवी–कातवडी–बहुली–कोंढूर–डवजे–निळकंठेश्वर मार्गे वळविण्यात येत आहे.

नागरिकांनी प्रशासनाने निर्धारित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा व वाहतूक व्यवस्थेस सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी केले आहे.
000

मुठा नदीवरील धोकादायक पूल कायमस्वरूपी बंद; वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश

पुणे, दि. 1 : हवेली तालुक्यातील कातवडी–कॉदूर–निळकंठेश्वर मार्गावरील (ग्रामा-४५ कि. तर. 1/000) मुठा नदीवरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याने तो कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे यांनी जारी केले आहेत.

मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम ११५ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला आहे. पूल बंद झाल्यामुळे कातवडीकडून डावजे–कुरणकडे जाणारी वाहतूक कातवडी–बहुली–कोंढूर–डावजे–जांभळी–कुरण या मार्गाने वळविण्यात आली आहे. तसेच कुरण–डावजे बाजूकडून कातवडीकडे येणारी वाहतूक कुरण–जांभळी–डावजे – कोंढूर–बहुली–कातवडी या पर्यायी मार्गाचा वापर करण्यात यावा.

वाहतुकीची सुरक्षितता लक्षात घेऊन संबंधित ठिकाणी मजबूत बॅरिकेडिंग करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या आदेशामुळे परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गांद्वारे सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
000

अन्न व औषध प्रशासनाकडून आंबेगाव व खेड तालुक्यात ५ ठिकाणी धडक कारवाई १९ लाखाहून अधिक रकमेचा साठा जप्त

0

पुणे, दि. १: अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच पुणे जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत आंबेगाव व खेड तालुक्यात ५ ठिकाणी धडक कारवाई करण्यात आली; यामध्ये १९ लाख ३ हजार ३७९ लाख रुपयाचा साठा जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पुणे विभागाचे सहायक आयुक्त (अन्न्) दि.वा. भोगावडे यांनी दिली आहे.

आंबेगाव तालुक्यात मंचर येथे साईराज पान अँड टी हाऊस व समीक्षा कोल्ड्रिक जनरल अॅड किराणा स्टोअर यांच्या पाठीमागील छोट्या गोदामामध्ये दोन ठिकाणी ३० हजार ३९५ रुपयाचा गुटखा, पानमसाला व इतर तत्सम प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री करत असल्याचे आढळून आले. संबंधितावर भारतीय न्याय संहिता, २०२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ नुसार पोलीस स्टेशन, मंचर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंचर येथे खेमराज फूड इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड ही आस्थापना विनापरवाना नोंदणी व्यवसाय करत असल्याचे आढळून आले. तसेच येथे विक्रीसाठी ठेवण्यात आलेला मैदा, बेसन, आटा व इतर अन्नपदार्थ असा १९ हजार ८८६ किलोचा १० लाख ४९ हजार ३६४ रुपये किमतीचा साठा नमुना विश्लेषणासाठी घेऊन जप्त करण्यात आला.

खेड तालुक्यातील खालची भांबुरवाडी येथील उज्वल सुपारी ही आस्थापना विनापरवाना, नोंदणी व्यवसाय करत असल्याचे आढळून आले. या आस्थापनेत विक्रीसाठी ठेवण्यात आलेली सुपारी ही अप्रमाणित अथवा असुरक्षित असल्याच्या संशयावरून १ हजार ८९८ किलो वजनाचा आणि ८ लाख १६ हजार १४० रुपयाचा साठा जप्त करण्यात आला.

नरे येथील ओम साई फरसाण या आस्थापनेची तपासणीदरम्यान फाईड ग्रीन वाटाणा या अन्नपदार्थांमध्ये कृत्रिम रंगाचा वापर करत असल्याचे आढळून आले. त्या अनुषंगाने फाईड ग्रीन वाटाणा या अन्न पदार्थाचे व यात वापरला जाणारा कृत्रिम रंगाचे नमुने तपासणीसाठी घेऊन ६८ किलो असे ७ हजार ४८० रुपयाचा साठा भेसळीच्या संशयावरून जप्त करण्यात आला.

या कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी स्वाती मरके, सुप्रिया जगताप, संतोष सावंत, सतीश हाके, प्रकाश कचवे, लक्ष्मीकात साळवे, अभिजीत झोडगे, आदित्य जोशी, सकेत सूर्यवंशी व नमुना सहाय्यक साळवे याच्या पथकाने या कार्यक्षेत्राचे सहाय्यक आयुक्त (अन्न) नारायण सरकटे प्रदीप आंबरे यांच्या उपस्थितीत व पुणे विभागाचे सह आयुक्त (अन्न) दि.वा. भोगावडे यांच्या निर्देशान्वये पार पडली. अन्न व औषध प्रशासनामार्फत ग्राहकाच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या तसेच निकृष्ट भेसळयुक्त व बेकायदेशीर अन्न उत्पादन करणाऱ्या आस्थापनाविरुद्ध अशा मोहिमा सुरूच राहणार असून नागरिकानी याबाबतची माहिती प्रशासनास उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

जनगणना प्रगणकांना सहकार्य करा; पुणे महानगरपालिकेचे झोपडपट्टीधारकांना जाहीर आवाहन

0

पुणे: पुणे महानगरपालिका क्षेत्रातील घोषित आणि अघोषित झोपडपट्टी भागातील नागरिकांनी जनगणना २०२७ च्या कामकाजासाठी येणाऱ्या प्रगणकांना (Enumerators) पूर्ण सहकार्य करावे, असे जाहीर आवाहन पुणे महानगरपालिकेच्या शहर जनगणना कार्यालयाने केले आहे. काही ठिकाणी नागरिक प्रगणकांना माहिती देण्यास टाळाटाळ करत असून वादाचे प्रसंग निर्माण होत असल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाने हे पत्रक प्रसिद्ध केले आहे.

१६ मे ते १४ जून दरम्यान पहिली फेरी

जनगणना अधिनियम १९४८ अंतर्गत सध्या जनगणनेचे कामकाज सुरू आहे. या अंतर्गत १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत जनगणना २०२७ च्या पहिल्या फेरीचे क्षेत्र कामकाज (Fieldwork) वेगाने सुरू आहे. या मोहिमेत प्रगणक प्रत्यक्ष घरांना भेटी देऊन माहिती संकलित करत आहेत.

माहिती गोपनीय राहणार

काही नागरिक प्रगणकांना घरे क्रमांक देणे आणि जनगणनेची माहिती देण्यास असहकार्य करत असून कामात अडथळा निर्माण करत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, जनगणनेचे काम हे राष्ट्रीय स्वरूपाचे असून ते विहित मुदतीत पूर्ण करणे अनिवार्य आहे. तसेच, नागरिकांकडून संकलित केली जाणारी सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार आहे.

महानगरपालिकेचे आवाहन

राष्ट्रीय कर्तव्याचा भाग म्हणून सर्व नागरिकांनी, विशेषतः झोपडपट्टीधारकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा. प्रगणक घरी आल्यावर त्यांना योग्य माहिती देऊन सहकार्य करावे, जेणेकरून जनगणनेची प्रक्रिया सुरळीत पार पडेल, असे आवाहन शहर जनगणना कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

विधान परिषदेची रणधुमाळी:17 जागांसाठी महायुती आणि मविआत होणार थेट लढत; आमने-सामने पहा कोण?

काही जागांवर ‘पेच’ आणि बंडखोरीचे आव्हान४ जूनकडे सर्वांचे लक्ष

भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक ११ जागांवर- शिवसेना ४ जागांवर-अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस २ जागांवर- उद्धव ठाकरेंची शिवसेना (यूबीटी) ६ जागांवर, तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ३ जागांवर

मुंबई- विधान परिषदेच्या १७ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांसह काही अपक्ष उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख आघाड्यांनी आपापले मोहरे मैदानात उतरवले असून, १७ मतदारसंघांतील लढतींचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. अनेक ठिकाणी अपक्ष आणि बंडखोरांनी अर्ज भरल्याने चुरस वाढली असली, तरी मुख्य मुकाबला हा महायुती विरुद्ध मविआ असाच रंगणार आहे.

सत्ताधारी महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक ११ जागांवर आपले उमेदवार रिंगणार उतरवले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना ४ जागांवर, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस २ जागांवर निवडणूक लढवत आहे. विरोधी बाकांवरील महाविकास आघाडीत काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत ८ जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. उद्धव ठाकरेंची शिवसेना (यूबीटी) ६ जागांवर, तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ३ जागांवर लढत आहे.

अनेक मतदारसंघांत अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरल्याने आणि स्थानिक नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याने दोन्ही आघाड्यांची डोकेदुखी वाढली आहे. महायुतीमध्ये रायगड, छत्रपती संभाजीनगर-जालना, यवतमाळ, पुणे, नाशिक, परभणी आणि नांदेड या ८ जागांवर नाराजांनी अर्ज दाखल करत बंडाचे निशाण फडकावले आहे. नाशिकसारख्या ठिकाणी मविआचा अधिकृत उमेदवार नसल्याने पेच निर्माण झाला आहे.

अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी आणि नाराज नेत्यांनी अर्ज भरल्यामुळे अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. ४ जून ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने, त्या दिवशी बंडखोरी शमवण्यात नेत्यांना किती यश येते, यावरच विजयाचे समीकरण अवलंबून असेल. खरी लढत पक्षीय चिन्हांवर असली, तरी स्थानिक पातळीवरील गणिते या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहेत.

१७ मतदारसंघातील प्रमुख लढती, आमने-सामने कोण?

क्र.मतदारसंघमहायुतीचे प्रमुख उमेदवार (पक्ष)मविआचे उमेदवार (पक्ष)
सोलापूरराजेंद्र राऊत (भाजप)आदित्य फत्तेपूरकर (काँग्रेस)
अहिल्यानगरप्राजक्त तनपुरे (भाजप)करण ससाणे (काँग्रेस)
ठाणेरविंद्र फाटक (शिवसेना)अभिजीत पवार (राष्ट्रवादी – शपा)
जळगावनंदकिशोर महाजन (भाजप)शरद तायडे (शिवसेना – ठाकरे)
सांगली-साताराधैर्यशील माने (भाजप)बाळासाहेब पाटील / अभयसिंह जगताप (राष्ट्रवादी)
नांदेडअमर राजूरकर (भाजप)रामदास पाटील (काँग्रेस)
यवतमाळदुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना)साहेबराव कांबळे (काँग्रेस)
पुणेविक्रम काकडे (राष्ट्रवादी – आपा)श्रीकांत पाटील (राष्ट्रवादी – शपा)
भंडारा-गोंदियाअविनाश ब्राह्मणकर (भाजप)दिलीप बनसोड (काँग्रेस)
१०रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गअनिकेत तटकरे (राष्ट्रवादी – आपा)अधिकृत उमेदवार (शिवसेना – ठाकरे)
११नाशिकनरेंद्र दराडे (शिवसेना)मविआचा उमेदवार नाही (अपक्षाला पाठिंबा)
१२वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीअरुण लखानी (भाजप)शैलेश अग्रवाल (काँग्रेस)
१३अमरावतीप्रवीण पोटे (भाजप)हर्षदीप देशमुख (काँग्रेस)
१४धाराशिव-लातूर-बीडबसवराज पाटील (भाजप)महेश देशमुख (काँग्रेस)
१५परभणी-हिंगोलीसईद खान (शिवसेना)डॉ. विवेक नावंदर (शिवसेना – ठाकरे)
१६छत्रपती संभाजीनगर-जालनाअधिकृत उमेदवार (भाजप/शिवसेना)अधिकृत उमेदवार (शिवसेना – ठाकरे)
१७नागपूर (पोटनिवडणूक)डॉ. राजीव पोतदार (भाजप)अतुल लोंढे (काँग्रेस)

लक्ष्मीनगर पोलिसांनी रचला सापळा; पिस्तुलासह रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांना अटक

पुणे:पुणे शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंर्तगत लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने एका धडक कारवाईत रेकॉर्डवरील पाहिजे असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला त्याच्या साथीदारासह अटक केली आहे. आरोपींकडून एक बनावटी लोखंडी पिस्तूल (गावठी कट्टा) आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

सापळा रचून केली अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ मे २०२६ रोजी लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कॉम्बिंग ऑपरेशन सुरू होते. यादरम्यान पोलीस अंमलदार अक्षय शिंदे, कादीर शेख आणि अमोल गायकवाड यांना बातमीदाराकडून एक अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली. लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात पाहिजे असलेला रेकॉर्डवरील आरोपी साजिद उर्फ डिजे मोहम्मद शेख (वय २०, रा. कामराजनगर, येरवडा) हा त्याच्या राहत्या घरी येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती.मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उमेश गिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिंगाडे, रविकांत नंदनवार आणि त्यांच्या पथकाने कामराजनगर येथील आरोपीच्या घराभोवती सापळा रचला.

खिडकीतून पळण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी पकडले

पोलिसांनी आरोपीच्या घराचा दरवाजा वाजवला असता आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पोलिसांनी योग्य त्या बळाचा वापर करून घरात प्रवेश केला. पोलिसांची चाहूल लागताच घरात असलेले दोन इसम पहिल्या मजल्याच्या खिडकीतून पाईपच्या सहाय्याने खाली उतरून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, दबा धरून बसलेल्या पोलिसांनी अत्यंत शिताफीने पाठलाग करून दोघांनाही ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेले आरोपी:
१. साजिद उर्फ डिजे मोहम्मद शेख (वय २०, रा. अंधु चायनीज समोरील गल्ली, कामराजनगर, येरवडा, पुणे) – (हा मूळ गुन्ह्यातील पाहिजे असलेला मुख्य आरोपी आहे).

  1. शुभम राजेंद्र क्षीर (वय २६, रा. सर्व्हे नं. ४७, ढवळे वस्ती, भारत फोर्ज रोड, गणपती मंदिरा जवळ, घोरपडी गाव, पुणे).

गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त

अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची अंगझडती घेतली असता, पोलिसांना त्यांच्याकडे एक बनावटी लोखंडी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस मिळून आले. पोलिसांनी हे बेकायदेशीर हत्यार तात्काळ जप्त केले असून दोघांवरही गुन्हा दाखल करून त्यांना पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

ही उल्लेखनीय कारवाई पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अप्पर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, पोलीस उपायुक्त (परिमंडळ ४) विजयकुमार मगर आणि येरवडा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

मान्सून 2-3 दिवसांत केरळममध्ये पोहोचेल:देशभरातील उष्णतेची लाट संपली

0

भारतीय हवामान विभागाने (IMD) सांगितले आहे की, नैऋत्य मान्सून पुढील 2 ते 3 दिवसांत केरळममध्ये दाखल होऊ शकतो. साधारणपणे मान्सून 1 जूनच्या आसपास केरळममध्ये दाखल होतो, परंतु यावेळी त्याचा वेग थोडा मंद राहिला आहे.हवामान विभागाच्या मते, अरबी समुद्र, लक्षद्वीप, केरळम आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्ये मान्सूनच्या प्रगतीसाठी हवामान अनुकूल बनले आहे. यासोबतच बंगालच्या उपसागरातील अनेक भागांमध्येही मान्सून पुढे सरकू शकतो.IMD ने यापूर्वी मान्सून 26 मे रोजी केरळममध्ये दाखल होईल असा अंदाज वर्तवला होता, परंतु नंतर त्यात विलंब झाला आणि विभागाने सांगितले की, त्याची सुरुवात जूनच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, देशभरात सध्या उष्णतेच्या लाटेची (हीटवेव) स्थिती संपली आहे. राजस्थानमधील अजमेर, नागौर आणि चित्तौडगडमध्ये सोमवारी गारपीट झाली. मध्य प्रदेशातील 4 जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर सुरू आहे.उत्तर प्रदेशातील झाशी आणि ललितपूरमध्ये जोरदार पाऊस झाला. राज्यातील 63 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बिहारमधील सासाराममध्ये दुपारनंतर जोरदार पाऊस झाला.

तर झारखंड, छत्तीसगड, हरियाणा आणि पंजाबसह 27 राज्यांमध्ये हलक्या ते जोरदार पावसाचा इशारा आहे.

उत्तराखंडमधील नैनितालसह 6 जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. खराब हवामानामुळे पिथौरागढमध्ये 12वी पर्यंतच्या सर्व शाळा बंद राहिल्या. केदारनाथ यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली. तर चंपावतमध्ये दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत अडकलेल्या 50 हून अधिक भाविकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
हवामान विभागाने म्हटले आहे की, यावर्षी देशात मान्सूनदरम्यान सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. संपूर्ण हंगामात पाऊस दीर्घकालीन सरासरी (LPA) च्या सुमारे 90% राहण्याचा अंदाज आहे.

LPA म्हणजे लॉन्ग पीरियड ॲव्हरेज (दीर्घकालीन सरासरी) म्हणजे एखाद्या प्रदेशात 30 ते 50 वर्षांच्या कालावधीत झालेल्या सरासरी पावसाला म्हणतात. भारतात 1971 ते 2020 पर्यंतच्या आकडेवारीनुसार मान्सूनची सरासरी पर्जन्यवृष्टी 87 सेंटीमीटर मानली जाते.

जर एखाद्या वर्षी पाऊस LPA च्या 90% पेक्षा कमी राहिला, तर त्याला सामान्यपेक्षा कमी पावसाच्या श्रेणीत ठेवले जाते.

अल निनो कारण बनू शकते

IMD चे म्हणणे आहे की, यावर्षी कमी पावसाचे एक मोठे कारण अल निनो असू शकते. अल निनो ही एक हवामानाची स्थिती आहे, ज्या दरम्यान प्रशांत महासागरातील पाणी सामान्यपेक्षा जास्त गरम होते. याचा परिणाम भारताच्या मान्सूनवर होतो आणि अनेकदा पाऊस कमी पडतो.

सध्या प्रशांत महासागरातील स्थिती हळूहळू अल निनोच्या दिशेने सरकत आहे. हवामान विभागाचा अंदाज आहे की, जूनमध्ये अल निनो कमकुवत राहू शकते, परंतु सप्टेंबरपर्यंत ते मध्यम किंवा मजबूत रूप धारण करू शकते.

कोथरूडमध्ये मोठ्या बांधकाम प्रकल्पाला PMC कडून काम थांबवण्याचे आदेश; फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुणे : कोथरूडमधील एका मोठ्या निवासी प्रकल्पावर पुणे महानगरपालिकेने कामबंद नोटीस बजावत बांधकाम तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत. प्रकल्पाच्या मंजुरीसाठी आधारभूत ठरलेला जमीन मोजणीचा नकाशा जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षकांनी रद्द केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात विकासकांनी जमिनीसंदर्भातील वादाची माहिती लपवून ग्राहकांकडून कोट्यवधी रुपये स्वीकारल्याचा आरोप होत असून, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपचे नेते तथा माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी केली आहे.दरम्यान या बांधकाम प्रकल्पाला नाव ट्रायडेंट आणि यशोदा डेव्हलपर्स अशी दोन नावे वापरण्यात आल्याने जाणून बुजून गोंधळ निर्माण केल्याचे पुढे येते आहे.

किरण दगडे पाटील यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करत विकासकांविरोधात फौजदारी गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, जमिनीसंदर्भातील कायदेशीर वाद आणि मोजणी प्रक्रियेतील गंभीर अडचणींची माहिती असतानाही विकासकांनी सदनिकांची विक्री सुरू ठेवली. तसेच प्रकल्पाशी संबंधित महत्त्वाची माहिती घरखरेदीदारांपासून लपवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे स्वीकारण्यात आले.असेही त्यांनी म्हटले आहे .


महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग, झोन क्रमांक ३ कडून जारी करण्यात आलेल्या नोटीशीनुसार, कोथरूड येथील सर्व्हे क्रमांक ७९/४/५अ/१ या मिळकतीवर यशोदा डेव्हलपर्सकडून निवासी प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी विकासक अनिकेत रामदास ढोरे यांनी वास्तुविशारद साची अरोरा यांच्यामार्फत महापालिकेकडून बांधकाम परवानगी मिळवली होती.प्रत्यक्षात जागेवर मात्र TRIDENT WORLD या नावाचा फलक लावून हे बांधकाम सुरु करण्यात आले . महापालिकेच्या परवानगीचा आधार म्हणून ५ फेब्रुवारी २०२४ रोजी भूमी अभिलेख विभागाने तयार केलेला जमीन मोजणी नकाशा सादर करण्यात आला होता.मात्र, या मोजणीविरोधात दाखल करण्यात आलेल्या अपीलावर सुनावणी करताना जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक, पुणे यांनी ६ मे २०२६ रोजी संबंधित मोजणी नकाशा रद्द करण्याचे आदेश दिले. परिणामी, या नकाशाच्या आधारे मिळालेल्या बांधकाम मंजुरीची वैधता वादात सापडली.

भूमी अभिलेख विभागाचा निर्णय समोर आल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने प्रकल्पाची पाहणी केली. त्यावेळी बांधकाम पार्किंग स्तरापर्यंत पोहोचल्याचे आढळून आले. त्यानंतर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २६७ (१) आणि महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम (एमआरटीपी) १९६६ मधील कलम ५४ अन्वये कामबंद नोटीस बजावण्यात आली. आदेशाचे उल्लंघन केल्यास पोलिसांच्या मदतीने कामगारांना हटवून कारवाईचा खर्च विकासकांकडून वसूल करण्यात येईल, असा इशाराही महापालिकेने दिला आहे.


कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील करिअरसाठी ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचा नवा उपक्रम

कृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्र शिक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता व डेटा विज्ञान अभ्यासक्रमांना प्रवेश सुरू; उद्योगाभिमुख शिक्षणावर भर

पुणे : एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाने (एमआयटी-एडीटी) ‘स्कूल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एसओएआय) स्थापनेची घोषणा केली आहे. विद्यापीठाच्या राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्टतेच्या प्रवासातील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. उद्योग आणि समाजामध्ये परिवर्तन घडवून आणणारे नैतिक, सर्जनशील आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ घडविणे हे या स्कूलचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

स्कूल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स अंतर्गत बी.टेक (कृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्र शिक्षण) आणि बी.टेक (कृत्रिम बुद्धिमत्ता व डेटा विज्ञान) हे चार वर्षांचे पदवी अभ्यासक्रम उपलब्ध करण्यात आले आहेत. कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगच्या मजबूत पायावर आधारित या अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील विविध विशेष शाखांमध्ये प्राविण्य मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. डीप लर्निंग, कॉम्प्युटर व्हिजन, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता (Generative AI), डेटा अॅनालिटिक्स आणि इंटेलिजंट सिस्टिम्स डिझाईन यांसारख्या अत्याधुनिक क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना सखोल ज्ञान दिले जाणार आहे.

एमआयटी-एडीटी विद्यापीठातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी आणि अधिष्ठाता डॉ. गणेश पाठक यांनी याबाबतची माहिती दिली.

यावेळी प्रा. डॉ. राजेश एस. म्हणाले, “या स्कूलचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची कृत्रिम बुद्धिमत्ता-केंद्रित शिक्षण पद्धती. पहिल्याच सत्रापासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगांमधील समस्यांवर आधारित प्रकल्प, वास्तववादी डेटा संच (डेटासेट्स) आणि आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांसह काम करण्याची संधी मिळणार आहे. तसेच ‘कृत्रिम बुद्धिमत्ता प्रॅक्टिस स्कूल’ मॉडेलअंतर्गत विद्यार्थ्यांना उद्योगांमध्ये दीर्घकालीन इमर्शन प्रोग्रामद्वारे प्रत्यक्ष कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्पांवर काम करण्याचा अनुभव दिला जाणार आहे.”

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (एनईपी २०२०) शी सुसंगत असा हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून, हेल्थकेअर, फिनटेक, अ‍ॅग्रीटेक, निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्वायत्त कृत्रिम बुद्धिमत्ता (Agentic AI) यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये विशेष अभ्यासाची सुविधा उपलब्ध असेल. क्लाउड कॉम्प्युटिंग, ब्लॉकचेन, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि ह्युमन-कॉम्प्युटर इंटरॅक्शन यांसारख्या बहुआयामी विषयांमुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान अधिक व्यापक होणार आहे.

उद्योग क्षेत्राशी मजबूत संबंध हे ‘एसओएआय’ मॉडेलचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. अग्रगण्य तंत्रज्ञान कंपन्यांसोबत भागीदारी करून उद्योगतज्ज्ञांकडून सहशिक्षण, AWS Academy, Coursera आणि edX यांसारख्या जागतिक प्लॅटफॉर्म्ससोबत संयुक्त प्रमाणपत्र अभ्यासक्रम तसेच उद्योग-प्रायोजित कॅपस्टोन प्रकल्प राबविण्याची योजना विद्यापीठाने आखली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला शैक्षणिक मार्गदर्शकासोबत उद्योग मार्गदर्शकाचीही साथ मिळणार असून, शिक्षण आणि व्यावसायिक अनुभव यांमधील दरी कमी करण्यावर भर दिला जाणार आहे.

लोणी काळभोर येथील एमआयटी-एडीटी विद्यापीठाच्या विस्तीर्ण आणि अत्याधुनिक कॅम्पसमध्ये हे स्कूल कार्यरत राहणार आहे. सुमारे १५ लाख चौरस फूट परिसरात अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयोगशाळा, आयसीटी-सक्षम स्मार्ट क्लासरूम्स, GPU (ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट) आणि TPU (टेन्सर प्रोसेसिंग युनिट) आधारित संगणकीय सुविधा तसेच संशोधन आणि इनक्युबेशन स्पेसेस उपलब्ध असतील.


जबाबदारीने नेतृत्व करणारे विद्यार्थी घडविणार – डॉ. पुजेरी
प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी म्हणाले, “एसओएआयमध्ये नैतिकता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील समाजोपयोगी संशोधनाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. स्पष्टीकरणक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता, कृत्रिम बुद्धिमत्ता गव्हर्नन्स, निष्पक्षता-जागरूक मॉडेलिंग आणि डेटा गोपनीयता यांसारखे विषय अभ्यासक्रमाचा अविभाज्य भाग असतील. केवळ सक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली निर्माण करणारे नव्हे, तर त्यांच्या सामाजिक परिणामांची जाणीव ठेवून जबाबदारीने नेतृत्व करणारे विद्यार्थी घडविण्याचा विद्यापीठाचा संकल्प आहे.”


“स्कूल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही पुढील पिढीतील तांत्रिकदृष्ट्या सक्षम, नैतिक मूल्यांनी समृद्ध आणि मानवी संवेदनशीलता जपणारे कृत्रिम बुद्धिमत्ता नेतृत्व घडविण्याची आमची बांधिलकी आहे. नवोपक्रम आणि जबाबदारी यांचा संगम साधणारी शिक्षणव्यवस्था उभी करून देश आणि जगासाठी सकारात्मक बदल घडविणारे विद्यार्थी घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
– प्रा. डॉ. मंगेश कराड
कार्याध्यक्ष तथा प्र-कुलपती,
एमआयटी-एडीटी विद्यापीठ, पुणे

शहारात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा – सुनील माने

बोपोडीत मध्यरात्री चंदनचोरी ; नागरिक भयभीत

औंध : विद्येचे माहेरघर मानले जाणाऱ्या पुण्यात गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढली असून शहरात कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. औंध -बोपोडी भागातील अतिशय प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या शांतानिकेतन सोसायटीमध्ये शुक्रवारी मध्यरात्री, सशस्त्र प्रवेश करत येथील चंदनाचे झाड चोरट्यांनी कापून चोरून नेले. या घटनेने नागरिक भयभीत झाले असून या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, प्रवक्ते सुनील माने यांनी केली आहे.

याबाबत बोलताना ते म्हणाले, पुणे शहरात कायदा सुव्यवस्थेची स्थिती अतिशय चिंताजनक बनत चालली आहे. अनेक ठिकाणी दिवसा गुन्हे होत आहेत. शुक्रवारी (दि. २९) पहाटे औंध बोपोडी भागातील अतिशय प्रतिष्ठित असलेल्या शांतानिकेतन सोसायटीत पहाटे २ ते ३ च्या दरम्यान कोयते, कुऱ्हाडी, तलवारी, चाकू या स्वरूपाची घातक शस्त्रे त्यांच्याकडे होती. ही सोसायटी या भागातील प्रमुख निवासी सोसायट्यांपैकी एक आहे. सोसायटीच्या शेजारी आय.टी. पार्क तसेच सभोवताली अनेक निवासी सोसायट्या असून हा भाग दाट लोकवस्तीचा बनला आहे. अशा निवासी वस्तीत गुन्हेगार मध्यरात्रीच्या वेळी निर्धास्तपणे सोसायटीमध्ये प्रवेश करून कोणत्याही भीतीशिवाय चोरी करत आहेत हे चिंताजनक आहे.

पोलिस रात्री गस्त घालत नाहीत. पंतप्रधानांच्या आवाहनाला अनुसरून, पेट्रोल डिझेल वाचवण्यासाठी पोलिसांची रात्रीची गस्त शहरात कमी झाली की काय अशी परिस्थिती आहे. लोक चिंताग्रस्त आहेत. या गुन्हेगारीला आळा घालण्याचे काम मा. पोलिस आयुक्तांनी तातडीने हाती घेतले पाहिजे. पोलिसांची जरब बसवली पाहिजे. चोरी, खून यासारख्या गुन्हेगारीच्या घटनांना आळा घालण्याचे काम पोलिसांनी तातडीने हाती घेतले पाहिजे अशी मागणी सुनील माने यांनी केली आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; मिसिंग लिंक तासभर बंद, दोघांचा मृत्यू

0

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खालापूर फूड मॉलजवळ पहाटे झालेल्या भीषण अपघातामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. दोन अवजड वाहनांमध्ये झालेल्या जोरदार धडकेत दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून, मागून आलेल्या इर्टिगा कारने अपघातग्रस्त वाहनाला धडक दिल्याने आणखी दोघे जखमी झाले आहेत.

या दुर्घटनेमुळे मुंबईकडे जाणारा मिसिंग लिंक मार्ग काही काळासाठी बंद ठेवावा लागला. त्यामुळे लोणावळ्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक द्रुतगती मार्ग आणि जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वळवण्यात आली. जवळपास दोन तास वाहतूक विस्कळीत राहिल्यानंतर अपघातग्रस्त वाहने हटवून मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. सुदैवाने मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या वाहतुकीवर या घटनेचा कोणताही परिणाम झाला नाही.

विधान परिषदेत महायुतीचे संख्याबळ वाढणार; निवडणूक बिनविरोध झाल्यास अधिक चांगले वातावरण निर्माण होईल : शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे

0

पुणे.दि.१: पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार विक्रम काकडे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार दिलीप वळसे पाटील, डॉ. नीलम गोऱ्हे, सुनील शेळके, अनिल पाटील, शंकर मांडेकर, पुणे महापौर मंजुषा नागपुरे, आरपीआयचे उपमहापौर परशुराम वाडेकर व जय पवार यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि आरपीआय पक्षाच्या नेतृत्वाखाली महायुतीने विक्रम काकडे यांना उमेदवारी दिली आहे. महायुतीचे उमेदवार निश्चितपणे विजयी होतील, असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. ही निवडणूक बिनविरोध झाली तर आणखी चांगले वातावरण निर्माण होईल. जागावाटपाबाबत समाधानकारक चर्चा झाली असून विधान परिषदेमध्ये महायुतीचे संख्याबळ वाढून अधिक प्रभावीपणे काम करता येईल.”

याप्रसंगी, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार दिलीप वळसे पाटील आणि जय पवार यांनीही महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला.

मराठी रंगभूमीवर प्रथमच नाटकाच्या गाण्यांचा भव्य म्युझिक लाँच सोहळा!

‘जोडीचा मामला’चा अनोखा प्रयोग; अवधूत गुप्तेंकडून नाटकाच्या टीमचे कौतुक

मराठी रंगभूमीच्या इतिहासात प्रथमच एखाद्या नाटकातील गाण्यांचे स्वतंत्रपणे म्युझिक लाँच करण्याचा मान मिळवणाऱ्या ‘जोडीचा मामला’ या नाटकाचा भव्य म्युझिक लाँच सोहळा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याला प्रसिद्ध गायक-संगीतकार अवधूत गुप्ते, अभिनेते योगेश सोहोनी, एकविरा म्युझिकच्या चेअरमन-डायरेक्टर गिरीजा गुप्ते, यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

‘जोडीचा मामला’ या नाटकाच्या टीमने केलेला हा प्रयोग अत्यंत नावीन्यपूर्ण असून नाजूक विषय मांडण्याचे धाडस केलं आहे  त्यासाठी संपूर्ण टीमचे कौतुक करत गायक अवधूत गुप्ते यांनी नाटकाला शुभेच्छा दिल्या. ‘या नाटकाद्वारे पुण्यातील १३ कलाकार आज स्वतःचे स्थान निर्माण करत आहेत, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. विशेष म्हणजे हे सर्व कलाकार नवखे आहेत, असे त्यांच्या अभिनयावरून अजिबात जाणवत नाही,’ असे मत अवधूत गुप्ते यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाची सुरुवात ‘जोडीचा मामला’ या नाटकाच्या प्रयोगाने झाली. प्रेक्षकांनी नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यानंतर नाटकातील गाण्यांच्या म्युझिक लाँचचा विशेष सोहळा पार पडला.या नाटकाचे गीतकार आणि संगीत दिग्दर्शक चैतन्य कुलकर्णी ह्यांनी कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन केले. त्यांच्या मनोगतातून नाटकातील संगीतनिर्मितीचा प्रवास आणि गाण्यांमागील संकल्पना उलगडून सांगण्यात आली. लगबत हे नाटकाच्या विषयाचे ‘संकल्पना गीत आणि धुंदसे चांदणे हे नाविन्यपूर्ण प्रेमगीत अशी दोन गाणी या नाटकात असून यातील ‘लगबत’ गाण्याला अवधूत गुप्ते तर धुंदसे चांदणे गाण्याला श्रद्धा आपटे-केळकर यांचा स्वर लाभला आहे. युगंधर देशमुख ह्यांनी संगीत संयोजन केले आहे.

‘दृष्टी’ आणि ‘अद्वैत थिएटर्स’ निर्मित ‘जोडीचा मामला’ या  नाटकात योगेश कदम, प्राची कात्रे, पायल साळुंके, वैभव महाले, विशाल दुराफे, अश्विनी माळी, विनायक जाधव, प्रदीप कसबे, श्वेता काजळे, अभिजीत पाटसकर, आकाश राठोड, दुर्गेश लांडगे आणि श्रेयस इंदापूरकर हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. नाटकाचे लेखक आणि संगीतकार चैतन्य कुलकर्णी असून दिग्दर्शनाची धुरा श्रेयस इंदापूरकर यांनी सांभाळली आहे. नाटकाची निर्मिती श्रेयस इंदापूरकर आणि राहुल भंडारे यांनी केली आहे. नेपथ्य संदेश बेद्रे, प्रकाशयोजना शीतल तळपदे, नृत्य दिग्दर्शन ऋषीकेश देसाई यांनी केले आहे. रंगभूषा उलेश खंदारे  तर वेशभूषा प्राची कात्रे आणि श्रद्धा हांडे यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संजय काकडे व विक्रम काकडे यांचा पक्षप्रवेश, पुण्यातून विक्रम काकडे यांनाच उमेदवारी

0

पुणे-पुण्यातील जिजाई निवासस्थानी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये श्री संजय काकडे व श्री विक्रम काकडे यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. युवा नेते तथा खासदार श्री पार्थ अजितदादा पवार व श्री जय अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झाला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार, विविध पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षाच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत श्री संजय काकडे व श्री विक्रम काकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

या पक्षप्रवेशामुळे पुणे शहर व जिल्ह्यात पक्ष संघटनेला अधिक बळ मिळणार असल्याचा विश्वास उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला. तसेच आगामी काळात पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची यादी

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे

पुणे – विक्रम काकडे

https://www.facebook.com/share/v/18p9YgbFVz

शिवसेनेच्या उमेदवारांची यादी

ठाणे – रवींद्र फाटक

नाशिक – नरेंद्र दराडे

परभणी-हिंगोली – सईद खान

यवतमाळ – दुष्यंत चतुर्वेदी

भाजपच्या वाट्याला मागील वेळेपेक्षा 3 अधिक जागा

मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपचा वाटा यावेळी वाढला आहे. यापूर्वी 17 पैकी 8 जागांवर भाजपचे सदस्य होते. आता पक्ष 11 जागांवर उमेदवार देत आहे. अहिल्यानगर, सातारा-सांगली आणि नांदेड यांसारख्या ठिकाणी यापूर्वी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य होते. मात्र बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे या जागांवर भाजपने आपले उमेदवार उतरवले आहेत. त्यामुळे भाजपच्या वाट्याला मागील वेळेपेक्षा 3 अधिक जागा आल्या आहेत. दुसरीकडे शिवसेनेकडे पूर्वी 5 जागा होत्या, मात्र यावेळी ती 4 जागांवर निवडणूक लढवत आहे. छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघ भाजपकडे गेला असून नाशिक, परभणी-हिंगोली, ठाणे आणि यवतमाळ या जागा शिवसेनेकडे राहिल्या आहेत.

रात्री दीड वाजता विक्रम काकडेंचं नाव पक्कं,पण सकाळ उजाडली तरी एबी फॉर्म मिळाला नाही, पुण्याचा सस्पेन्स पुन्हा वाढला

मुंबई-राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस असतानाच पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून एक अत्यंत नाट्यमय घडामोड समोर येत आहे. रविवारी रात्री पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात तब्बल पाच तास सुरु असलेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर रात्री दीड वाजता विक्रम काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा होती. मात्र, आज सकाळ उजाडली तरी विक्रम काकडे यांच्यापर्यंत पक्षाचा अधिकृत ‘एबी फॉर्म’ पोहोचलेला नाही. त्यामुळे पुणे विधानपरिषदेच्या जागेचा सस्पेन्स पुन्हा एकदा वाढला आहे.
सध्या पुण्याचे अंतिम नाव अजूनही गुलदस्त्यात असल्यामुळे पुण्यातील ‘जिजाई’ या निवासस्थानी सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला आमदार सुनील शेळके आणि माजी आमदार विलास लांडेउपस्थित आहेत. आज दुपारी 3 वाजेपर्यंतच उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम वेळ असल्याने नेत्यांची धाकधूक वाढली आहे.

या जागेवरून लढण्यासाठी अजितदादा गटातील अनेक नेते इच्छुक होते. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहावी, यासाठी स्थानिक नेते प्रचंड आग्रही होते, तर दुसरीकडे भाजपचे नेतेही या जागेसाठी गळ टाकून बसले होते. अखेर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका फोननंतर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला जाईल हे स्पष्ट झाले. मुख्यमंत्र्यांकडून विक्रम काकडे यांच्या नावाला ‘ग्रीन सिग्नल’ मिळाल्यानंतर काल रात्री 8:30 वाजता सुरू झालेल्या बैठकीत त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची चर्चा रंगली होती. या बैठकीला माजी खासदार संजय काकडेहे देखील उपस्थित होते. मात्र, विक्रम काकडे यांच्यापर्यंत पक्षाकडून अद्याप AB फॉर्म पोहोचलेला नाही, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता पुणे विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादी उमेदवार नक्की कोण असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विक्रम काकडे हे हाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू, माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव असून अजित पवारांचे निष्ठावंत कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे ते उत्तम बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांनी 4 वर्ष स्टेट शुटींग चॅम्पियन, राष्ट्रीय पातळीवरील संघात देखील सहभाग घेतलेला आहे .आंतरराष्ट्रीय पातळीवर इटली, फ्रान्स जर्मनी, थायलंड येथील थाय ओपन स्पर्धेतदेखील सहभाग घेतलेला आहे.