Home Blog Page 30

विधान परिषदेच्या 17 पैकी 17 उमेदवारांची यादी तयार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित झाल्याचे वृत्त आहे. प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे-प्रतिदाव्यानंतर 17 जागांसाठी तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाले आहे. अंतिम फॉर्म्युलानुसार भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. यामध्ये भाजपकडून 11 उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. तर शिवसेनेचे 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 उमेदवारांची नावंही जवळपास निश्चित झाले आहेत.

भाजपच्या 11 उमेदवारांची यादी-
वर्धा चंद्रपूर गडचिरोली- अरुण लखाणी
भंडारा-गोंदिया- अविनाश ब्राह्मणकर
अमरावती- प्रवीण पोटे
सोलापूर- राजेंद्र राऊत
सांगली सातारा- धैर्यशील कदम
अहिल्यानगर- प्राजक्त तनपुरे
छत्रपती संभाजीनगर-जालना- सुहास शिरसाट
नांदेड – अमर राजूरकर
धाराशिव बीड लातूर- बसवराज पाटील
जळगाव- नंदकिशोर महाजन
नागपूर- राजीव पोतदार
शिवसेनेच्या 4 उमेदवारांची यादी-
ठाणे- रवींद्र फाटक
नाशिक- नरेंद्र दराडे
परभणी-हिंगोली- सईद खान
यवतमाळ- दुष्यंन्त चतुर्वेदी, किरण पांडव,सलीम खातून (संभाव्य)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 उमेदवारांची यादी-
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग- अनिकेत तटकरे
पुणे- विक्रम काकडे (संभाव्य उमेदवार)

दलित पँथर चळवळीचा इतिहास समाजासमोर येणे गरजेचे – रामदास आठवले

पुणे — दलित पँथर चळवळीने फार मोठा इतिहास निर्माण केला आहे .अमेरिकेत जशी ब्लॅक पँथर होती तशी भारतात दलित पँथर होती या चळवळीने दलित समाजावरील अन्याय अत्याचाराला वाचा फोडली .त्याच चळवळीचा इतिहास आजच्या युवकांना व समाजाला समजण्यासाठी पँथर चळवळीचा इतिहास समाजासमोर येणे गरजेचे असल्याचे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले .कवी, चित्रकार, शिल्पकार, लेखक, दलित पँथर चळवळीचे नेते, माजी गृहनिर्माण मंत्री दयानंद मस्के यांचा नागरी सत्कार व ग्रंथ प्रकाशन समारंभ प्रसंगी ते बोलत होते .
पुढे ते म्हणाले की ,माझ्या सामाजिक ,राजकीय प्रवासात पुण्यातील पँथर चळवळीतील कार्यकर्त्यांचे योगदान मोलाचे आहे. तसेच लेखक व पँथर नेते दयानंद मस्के यांचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले

शाहीर संभाजी भगत यांनी सिद्धार्थ वसतिगृहातील आठवणी सांगितल्या तसेच आज चळवळीचा विचार संपवण्याचे षडयंत्र चालू आहे ते थांबविणे गरजेचे आहे
राजकिय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येत आंबेडकरी विचार टिकवला पाहिजे असे आवाहन यावेळी शाहिर संभाजी भगत यांनी केले .
दलित पँथरचे संस्थापक ज.वि.पवार आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की ,आज आंबेडकरी चळवळीची परिस्थिती भयानक आहे या परिस्थितीला आपणच जबाबदार आहोत .आज आपण वर्षांतून दोनच दिवस आंबेडकरवादी असतो ,ते म्हणजे १४ एप्रिल आंबेकर जयंती व ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन होय.आज आंबेडकरी विचार पुढे घेऊन जाण्यासाठी कायम त्या विचारावर काम करणे गरजेचे असल्याचे सांगितले .यावेळी त्यांनी लेखक दयानंद मस्के यांचे पँथर चळवळीतील योगदान व त्याकाळातील आठवणींना उजाळा दिला .

यावेळी दयानंद मस्के लिखित आत्मचरित्र माझा बाप जगन्नाथ या ग्रंथाचे प्रकाशन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
या समारंभास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले ,आंबेडकरी लोकशाहीर संभाजी भगत ,कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक ,विचारवंत व दलित पँथर चे संस्थापक ज. वि. पवार,रिपब्लिकन पक्षाचे नेते असित गांगुर्डे,शैलेंद्र चव्हाण तसेच या समारंभाचे आयोजक प्रेरणानंदताई गायकवाड ,आर्ष प्रकाशन चे प्रकाशक दिलीप चव्हाण ,साहित्यिक सुरेंद्र जोंधळे ,प्रा.डॉ.राजाभाऊ भैलुमे,कॉम्रेड सुबोध मोरे,गंगाधर आंबेडकर,दलित पँथर चे नेते दिलीप जगताप ,जेष्ठ पत्रकार महावीर जोंधळे यासह पुणे शहरातील आंबेडकरी चळवळीतील अनेक प्रमुख नेते ,साहित्यिक ,विचारवंत व युवक कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते .

पुणे स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

एकूण ८६७ मतदारांचा समावेश; ४४१ पुरुष व ४२६ महिला मतदार

पुणे, दि. ३१ मे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी आज (दि. ३१ मे) प्रसिद्ध करण्यात आली. अंतिम यादीत एकूण ८६७ मतदारांचा समावेश असून त्यामध्ये ४४१ पुरुष व ४२६ महिला मतदारांचा समावेश असल्याची माहिती पुणे स्थानिक प्राधिकारी मतदार संघ नोंदणी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली.

या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण ११ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये पुढील मतदान केंद्रांचा समावेश आहे :
१) श्री शिवाजी प्रिपेरेटरी मिलिटरी स्कूल, जुनी दगडी (हेरिटेज) इमारत, शिवाजीनगर, पुणे
२) पिंपरी चिंचवड महानगरपालिका पब्लिक स्कूल, प्राथमिक शाळा, खराळवाडी, पिंपरी चिंचवड
३) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मंचर
४) महात्मा गांधी विद्यालय, राजगुरुनगर
५) विद्याधाम प्रशाला, शिरूर
६) नवीन प्रशासकीय इमारत (तहसील कार्यालय), दौंड
७) महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हायस्कूल, मुलींची शाळा, बारामती
८) एमईएस वाघिरे हायस्कूल, सासवड
९) श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कन्याशाळा, भोर
१०) न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा, वडगाव मावळ
११) रयत शिक्षण संस्थेचे साधना प्राथमिक विद्यालय, माळवाडी, हडपसर

मतदानासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पात्र सदस्यांना मतदानाचा अधिकार राहणार आहे. पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपंचायत तसेच कॅन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील पात्र सदस्यांचा मतदार म्हणून समावेश करण्यात आला आहे.

अंतिम मतदार यादी जिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी, जिल्हा परिषद, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती तसेच सर्व कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या निवडणूक विभाग कार्यालयांमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा – सुनेत्रा पवार

0

मुंबई दि. ३१ मे – स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले इत्यादींच्या पुरोगामी विचारांच्या वारशामुळेच हे शक्य झाले असे सांगतानाच आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा कार्य करत आहे, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज चौंडी येथे व्यक्त केल्या.

अखंड भारताच्या कल्याणाचा ध्यास घेणाऱ्या, न्याय, त्याग आणि कर्तृत्वाचे प्रतीक असणाऱ्या, पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी आज सुनेत्रा अजित पवार या नतमस्तक झाल्या.

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने श्री क्षेत्र चौंडी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार या उपस्थित राहिल्या.

अहिल्यादेवी होळकर यांनी २८ वर्षे राज्यकारभार केला. त्यांनी केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात क्रांती घडवली. त्यांनी आदर्श न्यायदानाची व्यवस्था भक्कमपणे उभी केली. अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले. घाट, मंदिरे बांधताना, दानपुण्य करताना सरकारी तिजोरीतून खर्च न करता स्वतःच्या संपत्तीतून खर्च केला. महिला सैनिकांची स्वतंत्र तुकडी निर्माण करणाऱ्या त्या पहिल्या महिला शासक होत्या असेही सुनेत्रा अजित पवार यांनी म्हटले आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या ३०० व्या जयंतीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार या स्वतः चौंडीला आल्या होत्या. राज्याची पहिली महिला उपमुख्यमंत्री म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना वंदन करण्याचा योग आला त्याबद्दल सुनेत्रा अजित पवार यांनी समाधान व्यक्त केले.

अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त ‘गोदावरी ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रे’चा भव्य शुभारंभही नुकताच करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे विचार, वारसा आणि विकास हा त्रिसूत्री मंत्र घेऊन ही यात्रा सुरू झाल्याचे सुनेत्रा अजित पवार यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री महोदयांनी यावर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये पात्र शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या योजनेला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ असे नाव देण्यात आले आहे. आदरणीय अजितदादांच्या प्रयत्नाने बारामतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय सुरू झाले आहे. या महाविद्यालय आणि रुग्णालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आले आहे. चौंडी येथील विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली.

नवकार आर्ट फाऊंडेशन आयोजित कला प्रदर्शनाला सुरुवात

0

कला ही समाजाला जोडण्याचे आणि परिवर्तनाचे माध्यम : विलासजी राठोड

पुणे : नवकार आर्ट फाऊंडेशन आयोजित आणि महाराष्ट्रातील सर्जनशील युवा-ज्येष्ठ ६५ चित्रकारांचा सहभाग असलेल्या कलाकृतींच्या प्रदर्शनाला आज (दि. ३१) बालगंधर्व कलादालनात सुरुवात झाली. कला ही समाजाला जोडण्याचे आणि परिवर्तनाचे माध्यम आहे, असे मत पुणे सकल जैन संघाचे अध्यक्ष विलास राठोड यांनी उद्‌घाटनप्रसंगी व्यक्त केले.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील कलाकारांना त्यांची कलाकृती रसिकांसमोर सादर करण्याची संधी गेल्या ११ वर्षांपासून नवकार आर्ट फाऊंडेशन उपलब्ध करून देत आहे. फाऊंडेशनच्या या उपक्रमाला प्रत्येकवर्षी प्रतिसाद वाढत आहे. या वर्षीच्या प्रदर्शनात संपूर्ण महाराष्ट्रातून ६५ चित्रकारांनी सहभाग नोंदविला असून यात २० बालकलाकार आणि ३५ महिला कलाकारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे वय वर्षे सात पासून ते ७० वर्षे वय असलेल्या कलाकारांनी आपल्या आकर्षक कलाकृती प्रदर्शनात मांडल्या आहेत. कलाकृतींची निवड प्रक्रिया मार्च २०२६ पासून सुरू करण्यात आली. या निवड प्रक्रियेत ९० प्रवेशिकांमधून प्रमाणबद्धता, रंगसंगती आणि तंत्राच्या आधारे १२५ उत्कृष्ट चित्रांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य संयोजक मनसुख छाजेड, प्रेरणा नहार यांनी प्रास्ताविकात दिली.

प्रदर्शनाचे उद्‌घाटन नवकार महामंत्राच्या पठणाने आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आले. सुरेश लोणकर, संदीप भंडारी, नगरसेविका सपना छाजेड, मनिषा चोरबेले, सूर्यदत्ता ग्रुपचे प्रमुख संजय चोरडिया, ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी, मल्लिकार्जुन सिद्धगी, यशजी कलवणकर, मुकीम तांबोळी, शंकर गोर्जे आदी उपस्थित होते.

प्रदर्शनातील कलाकृतींची पाहणी करताना मान्यवरांनी कलाकृतींची संकल्पना, मांडणी आणि विविध तंत्रांविषयी कलाकारांशी संवाद साधला.

सुरेश लोणकर यांनी कार्यक्रमाचे आणि कलाकारांनी रेखाटलेल्या कलाकृतीच्या गुणवत्तेचे विशेष कौतुक केले. संदीप भंडारी यांनी कलेचे मूल्य अधोरेखित करण्यासाठी प्रदर्शन आयोजित केल्याबद्दल फाऊंडेशनचे आभार मानले.

सपना छाजेड यांनी चित्रांमधील तंत्रांचे कौतुक करत या उपक्रमाचा विस्तार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. मनिषा  चोरबेले म्हणाल्या, जैन समाजाकडे केवळ व्यापारी म्हणून बघणाचा समाजाचा दृष्टिकोन या उपक्रमामुळे निश्चित बदलेल यात शंका नाही.

युवा तसेच ज्येष्ठ कलाकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन म्हणजे परिवर्तनाची प्रक्रिया असल्याचे संजय चोरडिया म्हणाले. कलेच्या माध्यमातून मानसिक आरोग्य चांगले राखता येते हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केल.

मुरली लाहोटी आणि मल्लिकार्जुन सिद्धगी यांनी नवीन पिढीतील कलाकारांना घडवण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे सांगितले. उपक्रमाबद्दल यशजी कलवणकर यांनी संयोजक मनसुख छाजेड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी समर्पणाच्या भावनेतून सुरू केलेल्या उपक्रमाची प्रशंसा केली. मुकीम तांबोळी आणि शंकर गोर्जे यांनी कलाकारांच्या मेहनतीचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक बाफना यांनी केले. प्रदर्शन दि. २ जूनपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत सर्वांसाठी खुले आहे.

निरामय संगीत सभेत प्रभातकालीन रागांची रंगली मैफल

पुणे : युवा पिढीतील आश्वासक गायिका श्रुती विश्वकर्मा, सुप्रसिद्ध गायक जयंत केजकर आणि ज्येष्ठ गायिका विदुषी मधुवंती देव यांनी गायलेल्या प्रभातकालीन रागांचा आनंद रसिकांनी भरभरून घेतला. निमित्त होते डॉ. प्रकाश कुलकर्णी आयोजित निरामय संगीत सभेचे!

सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधन मंडळातील वि. का. राजवाडे सभागृहात रविवारी (दि. ३१) मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. मैफलीच्या सुरुवातीस संयोजक डॉ. प्रकाश कुलकर्णी यांनी ‘परम विमल तुझे स्मरण’ हे स्तवन सादर केले.

श्रुती विश्वकर्मा यांनी आपल्या मैफलीची सुरुवात राग अहिर भैरवमधील बडा ख्यालने केली. आपले परात्पर गुरू पंडित लक्ष्मणराव बोडस यांनी रचलेली ‘तोरे करतार करो बेडा पार’ ही रचना ऐकवून त्याला जोडून गुरू केदार बोडस यांची मध्यलय तीन तालातील ‘कल ना परे मोहे तुम बिन’ ही रचना प्रभावीपणे ऐकविली. त्यानंतर ‘हु दोम तनन दोम’ हा तराणा दमदार स्वरात सादर केला.

या नंतर जयंत केजकर यांची मैफल रंगली. राग गुजरीतोडी सादर करताना त्यांनी ‘बन रे घर आज’ ही बंदिश ऐकवून करून त्याला जोडून द्रुत लयीत ‘जग के पालन हार’ ही रचना ऐकविली. ‘ए मापी संग खेले बन बन आज ऋत बसंत’ ही रचना प्रभावीपणे सादर करून वसंत ऋतुतील वैशिष्ट्ये साकारली.

मैफलीची सांगता सुप्रसिद्ध गायिका विदुषी मधुवंती देव यांनी केली. त्यांनी राग देसकार ऐकविताना ‘जब परदेस गवन’ ही पारंपरिक बंदिश सादर करून द्रुत लयीत ‘झांझरीया झनके झनके’ ही पारंपरिक बंदिश ऐकविली. त्यानंतर गुरू राजाभाऊ देव यांनी रचलेल्या ‘ना मोहे आस धन सुख जस’ या अर्थपूर्ण बंदिशीने मैफलीची सांगता केली.

एकाहून एक सरस कलाकारांनी साकारलेल्या प्रभातकालीन रागांच्या सादरीकरणाने रसिक आनंदीत झाले.

कलाकारांना सुयोग कुंडलकर, कन्हैया भोसले (संवादिनी), चारुदत्त फडके, श्रीपाद शिरवळकर, अभिजित जायदे (तबला) यांनी साथसंगत केली. सुरुवातीस डॉ. प्रकाश कुलकर्णी यांनी मैफलीविषयी माहिती विशद केली. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ऋतुजा फुलकर यांनी केले.

सामुदायिक वैगुण्यामुळे महाराष्ट्राची स्थिती बिहारसारखी : डॉ. राजा दीक्षित

अ. भा. मराठी प्रकाशक संघातर्फे अनिल टांकसाळे यांचा जीवनगौरव तर डॉ. न. म. जोशी यांचा साहित्यसेवा पुरस्काराने गौरव

पुणे : आज महाराष्ट्राची स्थिती बिहारसारखी झाली आहे. यात कुणी एक सरकार, राजकीय शक्ती जबाबदार नसून हे सामुदायिक वैगुण्य आहे. सर्व समाजच या स्थितीला जबाबदार आहे. समाजजीवन तसेच राजकारणाची आज अवनिती झाली असून सर्व वातावरण गढुळलेले आहे. समाजात गुन्हेगारी वाढीस लागली आहे; कोयतेशाही सुरू झाली आहे, अशी परखड टीका इतिहास तज्ज्ञ डॉ. राजा दीक्षित यांनी केली. बिघडलेल्या सामाजिक परिस्थितीत विचार हेच शस्त्र, सदाचार हाच मार्ग आणि मानवता हाच धर्म आशादायी ठरणार आहे. साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांच्या माध्यमातूनच समाजप्रबोधन होऊ शकेल त्यामुळे अशा स्वरूपाचे उपक्रम हे आशेचा किरण ठरत आहेत, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे जीवनगौरव पुरस्काराने अनिल बुक एजन्सीचे संचालक अनिल टांकसाळे तर साहित्यसेवा पुरस्काराने ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी, ज्येष्ठ लेखिका डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी यांचा स्नेहनिहार पुरस्कराने तर ज्येष्ठ मुद्रितशोधक विजय सरदेशपांडे यांचा आज (दि. ३०) विशेष सन्मान करण्यात आला. पुरस्कारांचे वितरण इतिहासतज्ज्ञ डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, उपाध्यक्ष दत्तात्रट पाष्टे, प्रमुख कार्यवाह पराग लोणकर मंचावर होते. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, टिळक रोड येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीसाठी आणि दिवाळी अंक निर्मितीसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले. शाल, श्रीफळ, मानपत्र आणि सन्माचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

डॉ. राजा दीक्षित पुढे म्हणाले, अनिल टांकसाळे यांच्या व्यवसायात निष्ठेची जोड असल्याने त्यांच्या ग्रंथविक्री कार्याचा उचित गौरव झाला आहे. डॉ. न. म. जोशी हे माझ्यासाठी पितृतुल्य असून त्यांनी साहित्यक्षेत्रात विविधांगी साहित्यनिर्मिती करून सेवा केली आहे. खडतर प्रवासातून त्यांनी कर्तृत्व घडविले आहे. संशोधकीय, साहित्यिक, ललित लेखनासह बोधकथा हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. नर्मविनोदाचे अंग असलेल्या डॉ. न. म. जोशी यांनी साहित्य क्षेत्रात प्रसन्नतेचा शिडकावा केला आहे. स्नेहसुधा कुलकर्णी या फक्त प्रकाशिका नव्हेत तर लेखिका-कवयित्री आणि संपादिका देखील आहेत. प्रकाशन व्यवसायात कर्तृत्व गाजविणाऱ्या महिलेचा हा अर्थपूर्ण सत्कार आहे. मुद्रितशोधक हा अक्षरवाङ्‌मय वाचकांपर्यंत पोहाचविणारा दुवा असतो. त्यामुळे विजय सरदेशपांडे यांचा सत्कार होणे अभिनंदनीय आहे. प्रकाशक संघाच्या उपक्रमशील कार्याचे डॉ. दीक्षित यांनी कौतुक केले.

सत्काराला उत्तर देताना अनिल टांकसाळे म्हणाले, मी माझा व्यवसाय प्रामाणिकपणे केला आहे, आणि आजही करतो आहे. साहित्याची नगरी, पंढरी, माहेरघर असलेल्या पुण्यात माझा सन्मान होणे आनंददायी आहे. आज पुस्तकविक्री क्षेत्रात आयाम बदललेले आहेत. दुकाने, ग्रंथालये ओस पडत आहेत, वाचकांपर्यंत पुस्तके पोहोचविणे दुरापास्त होत आहे. अशा परिस्थितीत या पुरस्काराच्या माध्यमातून नेटाने, जोमाने कार्य करण्यास मला प्रोत्साहन मिळाले आहे तसेच प्रकाशक संघाचे सहकार्य लाभत आहे.

कृतज्ञता शब्दाला प्रकाशक संघाने मान्यता दिली आहे, असे सांगून डॉ. न. म. जोशी म्हणाले, ज्या प्रकाशकांकडे माझी पुस्तके प्रकाशित झाली नाहीत त्यांनीही मला लेखक म्हणून आज स्वीकारले आहे. बदललेल्या सामाजिक काळात मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी उर्जादायक आहे.

डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.

स्वागतपर प्रास्ताविकात राजीव बर्वे यांनी पुरस्कारांविषयी माहिती सांगून प्रकाशक संघाच्या कार्याविषयी अवगत केले.

मानपत्राचे वाचन किरण आचार्य यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुर बर्वे यांनी केले तर आभार नितीन हिरवे यांनी मानले.

‘देठ त्याचा अजूनही प्रदीप हिरवाच आहे’….

पुरस्कार वितरण समारंभानिमित्त प्रदीप निफाडकर यांच्या गझलांचा कार्यक्रम रंगला. त्या वेळी डॉ. न. म. जोशी यांच्याविषयी ‘हे उन्हाने वाळलेले पान आहे, वृद्ध नाही अनुभवांचे रान आहे’ अशा ओळी त्यांनी उद्‌धृत केल्या. या ओळीचा संदर्भ घेऊन डॉ. न. म. जोशी यांनी ज्येष्ठ गझलकार सुरेश भट माझ्याविषयी काय म्हटले असते असे सांगताना ‘हे उन्हाने वाळलेले पान आहे; देठ त्याचा अजूनही प्रदीप हिरवाच आहे’ अशा शब्दात निफाडकर यांच्या गझलेला उत्स्फूर्तपणे उत्तर दिले.  

 तरुणांमधील  व्यसने रोखण्यासाठी सतत प्रयत्न आवश्यक  – डॉ. कल्याण गंगवाल 

पुणे : “देशाच्या प्रगतीसाठी युवा पिढी निरोगी व व्यसनमुक्त असणे आवश्यक आहे. तंबाखू, सिगारेट आणि अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यातून तरुणांना बाहेर काढण्यासाठी सातत्याने जनजागृती करणे काळाची गरज आहे. त्या दृष्टीने  दीप्ती चवधरी यांनी पुढाकार घेऊन काँग्रेस भवन येथे  आयोजित केलेला ‘ व्यसनांची  होळी’ उपक्रम प्रेरणादायी आहे,  असे प्रतिपादन सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे अध्यक्ष व व्यसनमुक्ती चळवळीचे जनक डॉ. कल्याण गंगवाल यांनी केले.

    व्यसनाच्या जाहिराती दाखवून तरुणांची दिशाभूल करून त्यांना व्यसनग्रस्त केले जात आहे त्यामुळेच व्यसना विरोधात लढा देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. काँग्रेस भवन येथे  ते बोलत होते.

      31 मे – जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त  पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पश्चिम विभागच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी यांनी आयोजित केलेल्या  कार्यक्रमात बोलताना दीप्ती चवधरी म्हणाल्या की, देशाचे भविष्य असलेली आपली युवा पिढी जर व्यसनाच्या विळख्यात अडकली, तर देशाची प्रगती खुंटेल. सशक्त आणि बलशाली भारताच्या निर्मितीसाठी सर्वप्रथम आपली तरुण पिढी निरोगी, सुदृढ आणि व्यसनमुक्त असणे अत्यंत आवश्यक आहे. आज  आपण सर्वांनी मिळून तंबाखू, सिग्रेट आणि ड्रग्ज यांसारख्या आरोग्यास घातक असणाऱ्या व कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या व्यसनांना  समाजातून हद्दपार करण्याचा संकल्प केला पाहिजे. पुणे काँग्रेसच्या वतीने केवळ आजच्या दिवसापुरते मर्यादित न राहता, भविष्यातही शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी व्यसनमुक्तीसाठी सातत्याने जनजागृतीपर उपक्रम राबवले जातील, असे त्या म्हणाल्या.

 काँग्रेस भवन पटांगणात  तंबाखू, सिगारेट व अंमली पदार्थांची ‘होळी’ करण्यात आली.  

यावेळी डॉ. कल्याण गंगवाल यांनी सर्वांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चौधरी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पुणे मनपा काँग्रेस पक्षाचे गटनेते एडवोकेट रामचंद्र उर्फ  चंदूशेठ कदम यांनी भूषवले. प्रारंभी दीप्ती चवधरी यांनी  डॉ. कल्याण गंगवाल यांचा स्वागत व सत्कार केला.

    एडवोकेट  रामचंद्र उर्फ चंदू शेठ कदम म्हणाले, शालेय  विद्यार्थी व तरुणांना  व्यसनाकडे आकर्षित करण्यात येत आहे, ही चिंतेची बाब आहे. पुणे शहरात अमली पदार्थ फोफावत  असून हे शहर ड्रग्स मुक्त करण्यासाठी काँग्रेस पक्ष कायम लढा देत राहील असे त्यांनी सांगितले.

   यावेळी “सशक्त भारताचा एकच नारा, तंबाखूला देऊ नका थारा” तसेच “तंबाखू, सिगारेट, ड्रग्जला द्या झटका, युवा पिढी वाचवा” अशा घोषणांनी काँग्रेस भवन  पटांगण दुमदुमून गेले. तंबाखू सेवनामुळे होणारे गंभीर आजार, कर्करोगाचा धोका आणि व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम दर्शविणारे फलक व जनजागृतीची पोस्टर लावण्यात आली होती.

     यावेळी हृदय रोग तज्ञ डॉ. राहुल सावंत,  द. स. पोळेकर, बाळासाहेब आमराळे, दत्ता जाधव, राजाभाऊ कदम, अविनाश अडसूळ, राहुल वंजारी, सुरेश नागरे, दिलीप लोळगे, एडवोकेट  फैयाज शेख, राजेंद्र भुतडा, वेदिका सकपाळ, किशोर मारणे, शिवाजी सोनार, कान्होजी जेधे, हर्षद हांडे,  युवक काँग्रेसचे राहुल सावंत  यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या, युवक काँग्रेसचे सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

‘तंबाखूला नकार, आरोग्याला स्वीकार’; व्यसनमुक्त समाजासाठी सर्वांनी पुढे यावे – डॉ. कल्याण गंगवाल

पुणे : 31 मे रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक तंबाखूमुक्त दिनानिमित्त सर्व जीव मंगल प्रतिष्ठानतर्फे तंबाखूविरोधी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यंदाच्या दिनाची संकल्पना तंबाखू आणि निकोटीन उत्पादनांच्या खोट्या आकर्षणामागील सत्य समोर आणून व्यसनाला आळा घालण्याची आहे.सर्वमंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी सांगितले की, आधुनिक विपणन तंत्रांचा वापर करून तंबाखू कंपन्या युवकांना लक्ष्य करत आहेत. आकर्षक जाहिराती, रंगीत पॅकेजिंग आणि विविध फ्लेवर्सच्या माध्यमातून तंबाखूजन्य पदार्थांचे आकर्षण वाढवले जात आहे. परिणामी अनेक तरुण व्यसनाच्या गर्तेत ओढले जात आहेत.तंबाखूचे सेवन केवळ व्यक्तीच्या आरोग्यावरच नव्हे तर संपूर्ण कुटुंबावर परिणाम करते. कर्करोग, हृदयविकार, श्वसनाचे विकार आणि स्ट्रोक यांसारख्या गंभीर आजारांमुळे उपचारांचा मोठा आर्थिक बोजा निर्माण होतो. त्यामुळे तंबाखूमुक्त समाज निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.जागतिक तंबाखूमुक्त दिनानिमित्त प्रत्येक नागरिकाने “मी तंबाखूपासून दूर राहीन आणि इतरांनाही तिच्या दुष्परिणामांविषयी जागरूक करीन” हा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले. तसेच शाळा, महाविद्यालये, पालक आणि सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे युवकांना तंबाखूच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.“व्यसनमुक्ती हीच खरी देशभक्ती आहे. चला, आजच तंबाखूला कायमचा निरोप देऊन निरोगी आणि सुदृढ समाज घडवूया,” असा संदेश देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

नेपाळचे PM म्हणाले- आम्हीही भारतीय जमिनीवर कब्जा केला

काठमांडू – नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी रविवारी सांगितले की, भारताने केवळ नेपाळी भूमीवरच कब्जा केलेला नाही, तर नेपाळने काही भारतीय भूभागही बळकावला आहे.

पंतप्रधान झाल्यानंतर दोन महिन्यांनी बालेन पहिल्यांदाच नेपाळी संसदेला संबोधित करत होते. ‘काठमांडू पोस्ट’च्या वृत्तानुसार, एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना याबद्दल समजले. दोन्ही देशांनी या प्रकरणाची संयुक्तपणे चौकशी केली पाहिजे.

लिपुलेख आणि लिम्पियाधुरा मार्गावरील भारत-चीन व्यापाराबाबत शाह म्हणाले की, हा वाद राजनैतिक संवादातून सोडवला जाईल. नेपाळने या विषयावर भारताला एक राजनैतिक पत्र पाठवले असून भारताकडून प्रतिसादही मिळाला आहे.

शाह म्हणाले की, लिपुलेख वाद ब्रिटिश भारताच्या काळापासूनचा आहे. त्यामुळे नेपाळने या विषयावर केवळ भारत आणि चीनसोबतच नव्हे, तर ब्रिटनसोबतही चर्चा केली आहे.
नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी रविवारी नेपाळी संसदेला संबोधित केले. या वर्षी मार्चमध्ये झालेल्या निवडणुकांनंतर सत्तेवर आल्यापासून पंतप्रधान शाह यांनी संसदेत बोलण्याची ही पहिलीच वेळ आहे.

खरं तर, विरोधी पक्षाचे खासदार पंतप्रधानांनी संसदेत येऊन देशासमोरील महत्त्वाच्या समस्यांवर बोलावे अशी मागणी करत होते. यानंतर, बालेन शाह यांनी संसदेला संबोधित केले आणि खासदारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

मार्च २०२६ मध्ये बालेन शाह पंतप्रधान झाल्यापासून, भारत आणि नेपाळ यांच्यातील पारंपरिक राजनैतिक आणि सामरिक संबंधांमध्ये लक्षणीय बदल आणि अस्वस्थता दिसून आली आहे.

म्हाळुंगे -आळंदीत गावठी दारू गुत्यांवर छापे

पुणे- आळंदी पोलिसांनी चऱ्होली खुर्द परिसरात कारवाई करत १०५ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली असून एका महिलेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९३/२०२६ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अन्वये नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई ३० मे २०२६ रोजी सकाळी सुमारे ७.२० वाजण्याच्या सुमारास मौजे चऱ्होली खुर्द, ता. खेड, जि. पुणे येथील ज्ञानसागर मंगल कार्यालयाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस शिपाई रामदास शेवराव दहिफळे (बकल क्रमांक २०१२), नेमणूक आळंदी पोलीस ठाणे, यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी निर्मला संभा रजपत (वय ५८, रा. वडगाव रोड, ज्ञानसागर मंगल कार्यालयामागे, चऱ्होली खुर्द, ता. खेड, जि. पुणे) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून सुमारे ९ हजार २५० रुपये किमतीची १०५ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू तीन कॅनमध्ये आढळून आली. बेकायदेशीररीत्या दारू साठवून ठेवल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दूधमल पोडवा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सिग्मा चौकात ५० लिटर गावठी दारू जप्तदाखल
महाळुंगे परिसरातील सिग्मा चौक येथे बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीवर दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र पोलिसांची चाहूल लागताच संबंधित आरोपी घटनास्थळावरून फरार झाल्याने त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.

दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४५५/२०२६ महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. ३० मे) सायंकाळी सुमारे ५.२० वाजण्याच्या सुमारास सिग्मा चौक, महाळुंगे येथे करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस शिपाई रविकिरण सूर्यकांत जगताप यांनी फिर्याद दिली असून दुरेश रमेश राठोड (वय ३३, रा. सिग्मा चौक, महाळुंगे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररीत्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करत होता. त्याच्याकडे सुमारे ५० लिटर गावठी दारू आढळून आली असून तिची किंमत अंदाजे पाच हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी कारवाईसाठी धाड टाकताच आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले.

दरम्यान, परिसरात अवैध दारू विक्री व हातभट्टी व्यवसायाविरोधात पोलिसांनी मोहीम तीव्र केली असून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके कार्यरत करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.

हातभट्टीची दारू कायमस्वरूपी हद्दपार होणे गरजेचे – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

अनुसूचित जाती उपवर्गीकरण 2027 च्या जनगणनेच्या आधारे झाले पाहिजे


पुणे : केवळ राज्यातच नव्हे तर देशभरात सर्रास विक्री जाणारी हातभट्टीची दारू अत्यंत घातक असून ती कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावी, अशी सूचना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी रसायनयुक्त विषारी दारू घेतल्यामुळे तब्बल 22 जणांचा मृत्यू झाला आहे. आठवले यांनी काही मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. मुलांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून पाच लाख रुपये तर महापालिकेकडून एक लाख रुपये मदत देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मृतांच्या वारसांना नोकरी मिळावी अशी कुटुंबीयांची मागणी असून त्यादृष्टीने महापालिका आयुक्त चर्चा केल्याचेही आठवले यांनी सांगितले. यानंतर पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. यावेळी आरपीआयचे पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेवक निलेश आल्हट, महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, मोहन जगताप, अशोक गायकवाड, सलीम सय्यद, बसवराज गायकवाड, उमेश कांबळे, संदीप धांडोरे, सोनू निकाळजे, हबीब सय्यद, सुनील गवळी आदी उपस्थित होते.

मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरात आर्थिक संकट उभे राहिले आहे. देशात या संकटाची व्याप्ती कमी करण्यासाठी सरकारला नाईलाजाने इंधन दरात वाढ करावी लागली आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रात महागाई वाढली असून त्याची झळ सर्वसामान्य नागरिकांना पोहोचत आहे. मात्र, युद्ध समाप्ती दृष्टिक्षेपात असून त्यानंतर इंधनाचे दर निश्चितपणे कमी केले जातील. अर्थातच महागाईला आळा बसण्यास मदत होईल, अशी ग्वाही आठवले यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘महागाई मॅन’ असल्याचा लोकसभेतील विविरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांचा आरोप पूर्णपणे बिनबुडाचा असल्याचा दावा आठवले यांनी केला. वास्तविक मोदी हे विकास मॅन आणि देशाची शान असल्याचे त्यांनी नमूद केले.

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला काही जातींचा पाठिंबा आहे तर काही जातींचा विरोध आहे. याबाबत आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करताना आठवले म्हणाले की, सन 2027 मध्ये होणाऱ्या जनगणनेच्या आधारे 59 हा अनुसूचित जातींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे, अशी आपली भूमिका आहे.

मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतल्याबद्दल आठवले यांनी त्यांचे आभार मानले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे. केंद्र सरकारने मराठा समाजाला दहा टक्के इडब्ल्यूएस आरक्षण दिलेले आहे राज्यातही ते मिळावे या दृष्टीने राज्य सरकारने पावले उचलावी. कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाज घटकांना इतर मागास प्रवर्गातून आरक्षण देण्यास हरकत नाही. मात्र, सरसकट मराठा समाजाला या प्रवर्गातून आरक्षण दिल्यास सर्वोच्च न्यायालयाकडून ते नाकारले जाईल, असे आठवले यांनी स्पष्ट केले.

रिपब्लिकन पक्षाला सत्तेत वाटा मिळालाच पाहिजे

पुरेशा संख्याबळाअभावी रिपब्लिकन पक्षाने विधान परिषदेत उमेदवारीसाठी दावा केलेला नाही. मात्र, रिपब्लिकन पक्षाला विधान परिषदेची एक जागा देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच दिले आहे. त्यानुसार या निवडणुकीत पक्षाला एक जागा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, ती मिळालेली नाही. आगामी काळात पाच जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला एक जागा मिळेल, अशी आशा असल्याचे आठवले यांनी सांगितले. त्याचप्रमाणे दोन शासकीय महामंडळाचे अध्यक्षपद देखील पक्षाला मिळावे अशी आपली मागणी असून त्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. रिपब्लिकन पक्ष हा छोटा असला तरी देखील तो महायुतीचा घटक पक्ष आहे याची जाणीव मित्र पक्षांनी ठेवावी आणि रिपब्लिकन पक्षाला सत्तेत योग्य तो वाटा मिळावा, असेही आठवले यांनी सुनावले.

किमान १० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही

0

१ जून पासून वादळी पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

मुंबई, दि ३१ मे: सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे, आणि १ जून पासून सुरु होणाऱ्या आठवड्यात हवामानात अजून बदल होईल. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपार नंतरचे ढग आणि काही प्रमाणात वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कोकणात देखील काही प्रमाणात पावसाचा अंदाज आहे. याच बरोबर मे महिन्याच्या तुलनेत राज्यातील कमाल तापमानात घट होईल, मात्र विदर्भातील काही भागांमध्ये, प्रामुख्याने पूर्व विदर्भ, कमाल तापमान ४० अंशाच्या वर कायम राहील. आगामी वादळी पावसाचा मान्सूनशी काहीही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळात पोहोचलेला नाही. सध्याच्या स्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान १० जून पर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही.

कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांकडून शेतकऱ्यांना आणि लोकांना आवाहन करण्यात येत आहे की, संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी:

  • शेतकऱ्यांनी वादळी पावसावर अवलंबून राहून आणि मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी पेरणीची घाई करू नये
  • ⁠विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे

पुण्यातील दहशतवादी स्लीपर सेलचा मोबाईल शॉप उध्वस्त करा अन्यथा भीम आर्मी कडून नेस्तनाबूत करण्याचा इशारा.

पुणे, दि. ३१ मे २०२६ : पुण्यातील कॅम्प परिसरातील ए. के. मोबाईल हे दहशतवादी स्लीपर सेल चा अड्डा असून ते उध्वस्त करा अशी मागणी भीम आर्मी कडून प्रशासनाला करण्यात आली आहे. तसेच १० जुने २०२६ पर्यंत बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा, १९६७ अन्वेय गुन्हा दाखल करून सदरील दुकान बंद करा अन्यथा भीम आर्मी कडून नेस्तनाबूत करण्याचा इशारा भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक भाऊ कांबळे यांनी दिला आहे.
कांबळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,’ ए. के. मोबाईल शॉपचे मालक व चालक फय्याज युसुफ खान, अयाज युसुफ खान व साद फय्याज खान, यांच्याबाबत स्थानिक स्तरावर काही गंभीर स्वरूपाची माहिती समोर आली आहे. तसेच फय्याज युसुफ खान याच्याविरुद्ध आंबेडकरी महिला कार्यकर्तीचा विनयभंग केल्याप्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३९६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल असून सदर प्रकरणाचा तपास संबंधित पोलीस यंत्रणेमार्फत सुरू आहे.
तसेच संबंधित आरोपी कुटुंबीयांविषयी गंभीर गुन्हे व दहशतवादविरोधी तपासाशी संबंध समोर आलेले आहेत. आरोपी फय्याज युसुफ खान, त्याचा मुलगा साद व त्याचा सख्खा भाऊ अयाझ हे मोबाईल शॉप चालवून व्यवसाय करीत आहे.
सदर व्यवसायाचा कोणत्याही बेकायदेशीर अथवा राष्ट्रविरोधी कारवायांशी संबंध आहे किंवा नाही, याची सक्षम तपास यंत्रणेमार्फत सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच आरोपी फय्याज युसुफ खान याचा सख्खा भाऊ अयाज युसुफ खान हा यापूर्वी मोबाईल व्यवसायाशी संबंधित असल्याचे समजते. त्याच्याविरुद्ध बंदी घालण्यात आलेल्या Students Islamic Movement of India (SIMI) व Indian Mujahideen या संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपावरून एटीएसकडून अटक करण्यात आल्याचे विविध वृत्तांतांमधून समोर आले आहे. अहमदाबाद सिरीयल बॉम्बस्फोट प्रकरण, जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरण तसेच बनावट भारतीय चलनी नोटांशी संबंधित प्रकरणांमध्ये त्याची चौकशी व कारवाई झाल्याचेही वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याच्यावर दहशतवादी कारवायांसाठी मोबाईल फोन, सिमकार्ड व इतर साहित्य पुरविल्याचे आरोप करण्यात आले होते. तसेच तपासादरम्यान त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात दारुगोळा, ग्रेनेड, शस्त्रे व इतर आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आल्याचेही विविध वृत्तांतांमधून समोर आले आहे. वरील बाबींच्या पार्श्वभूमीवर सदर प्रकरणाची तसेच संबंधित व्यक्तींच्या सध्याच्या हालचाली, संपर्क व व्यावसायिक व्यवहारांची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.
तसेच फय्याज युसुफ खान याचा दुसरा सख्खा भाऊ फिरोज युसुफ खान उर्फ फिरोज खान (टोटला) हा गंभीर संघटित गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे तसेच मुंबई बॉम्बस्फोट तपासाशी संबंधित आरोपी असल्याचे सांगितले जाते. त्याचा नंतर एन्काऊंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर यांच्या पथकाकडून झालेल्या पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला होता. विजय साळसकर हे स्वतः २६/११ मुंबई दहशतवादी अजमल कसाब व इतर दहशतवादी साथीदारांच्या हल्ल्यात एटीएस प्रमुख हेमंत करकरे, अशोक कामटे व इतर पोलीस अधिकाऱ्यांसह शहीद झाले होते. वरील सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर संबंधित व्यक्तींच्या हालचाली, संपर्क, आर्थिक व्यवहार व व्यवसायाची सक्षम यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे..
वरील बाबींच्या पार्श्वभूमीवर, संबंधित व्यक्ती फय्याज युसुफ खान, त्याचा मुलगा साद फय्याज खान व अयाज युसुफ खान हे आजही मोबाईल शॉपचा व्यवसाय करीत असल्याचे समजते. त्यामुळे संबंधित व्यक्तींच्या हालचाली, संपर्क, आर्थिक व्यवहार तसेच सदर व्यवसायाची सक्षम यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी. उपलब्ध माहिती व पूर्वी समोर आलेल्या आरोपांच्या अनुषंगाने सदर व्यवसायाचा कोणत्याही बेकायदेशीर, राष्ट्रविरोधी अथवा दहशतवादी कारवायांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आहे किंवा नाही, याची कसून पडताळणी करणे आवश्यक आहे. चौकशीदरम्यान कोणतेही बेकायदेशीर कृत्य, संशयास्पद व्यवहार अथवा कायद्याचे उल्लंघन आढळून आल्यास संबंधित व्यक्ती व व्यवसायाविरुद्ध लागू कायद्यांनुसार तात्काळ व कठोर कारवाई करण्यात यावी, अशी देखील मागणी करण्यात आली आहे.
आरोपीच्या कुटुंबाची गंभीर गुन्हेगारी व दहशतवादी पार्श्वभूमी लक्षात घेता सदर आरोपींवर तात्काळ बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) अधिनियम (UAPA) तसेच इतर लागू कायद्यांनुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी व आवश्यकतेनुसार त्यांना अटक करण्यात यावी तसेच १० जुने २०२६ पर्यंत सदरील मोबाईल शॉप हे जप्त करून सील करण्यात यावा अन्यथा भीम आर्मी कडून सदरील दुकान हे दहशतवादी कृत्यास मदत करून देश विरोधी विघातक कृत्यांमध्ये मदत करीत असल्यामुळे ते भीम आर्मी कडून १० जून २०२६ रोजी फोडण्यात येईल असा इशारा शासन प्रशासनाला भीम आर्मी कडून देण्यात आला आहे.

लोकमाता अहिल्यादेवींचा वारसा कृतीतून जपणे हीच खरी आदरांजली : आमदार सत्यजीत तांबे

चाळीसगावमध्ये अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भव्य बाईक रॅली; पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन

चाळीसगाव, दि. ३१ मे : लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त चाळीसगाव येथे आयोजित भव्य बाईक रॅलीत आमदार सत्यजीत तांबे यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

यावेळी आमदार तांबे यांनी अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. लोककल्याणकारी राज्यकारभार, न्यायप्रियता, सुशासन आणि समाजसेवेच्या माध्यमातून अहिल्यादेवींनी उभा केलेला आदर्श आजही प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्यातून समाजहिताला सर्वोच्च प्राधान्य देत जनतेच्या कल्याणासाठी आयुष्य समर्पित केले. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा केवळ स्मरणात न ठेवता तो प्रत्यक्ष कृतीतून जपणे आणि समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे मत आ. तांबे यांनी यावेळी व्यक्त केले.

या भव्य बाईक रॅलीत मोठ्या संख्येने युवक, नागरिक आणि अहिल्यादेवींचे अनुयायी सहभागी झाले होते. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या रॅलीमुळे चाळीसगाव शहरात जयंती उत्सवाला विशेष रंगत प्राप्त झाली.