आक्षेप घेण्यात आलेली क्षेत्रीय कार्यालये-विश्रांतवाडी व धानोरी (प्रभाग क्रमांक १ व २): हा भाग नैसर्गिकरीत्या येरवडा क्षेत्रीय कार्यालयाजवळ असताना, त्यांना दूर अंतरावरील नगर रस्ता कार्यालयाला जोडण्यात आले आहे.
-खराडी-वाघोली (प्रभाग क्रमांक ४) येथील नागरिकांना नगर रस्ता कार्यालय जवळ असताना, त्यांना ते ओलांडून तीन किलोमीटर दूर असलेल्या येरवडा कार्यालयात जावे लागणार आहे.पुणे महापालिकेतील क्षेत्रीय कार्यालये व प्रभागरचना बदलण्याचा निर्णय हा प्रशासनाच्या नावाखाली करण्यात आलेली राजकीय खेळी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. महापालिका प्रशासनाने घाईघाईत तयार केलेल्या या क्षेत्रीय रचनेमुळे अनेक प्रभागांतील नागरिकांना पूर्वी जवळ असलेली क्षेत्रीय कार्यालये दूर गेल्याची तक्रार करण्यात आली होती. याचा थेट परिणाम महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांवर होत असून, दैनंदिन कामांसाठी त्यांना अधिक अंतरावरील कार्यालयांमध्ये जावे लागणार आहे, असे ‘राष्ट्रवादी’चे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी महापालिकेला दिलेल्या निवेदनात नमूद केले होते.

पुणे: पुणे महापालिका प्रशासनाने शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालये आणि परिमंडळ विभागांच्या केलेल्या पुनर्रचनेवर थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतलेल्या आक्षेपांवर तातडीने खुलासा करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिकेला दिला आहे. या संदर्भातचा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाला सादर करण्यात यावा, असे आदेशात म्हटले आहे.

महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेल्या १५ क्षेत्रीय कार्यालये आणि परिमंडळांच्या रचनेमध्ये काही त्रुटी आढळून आल्या आहेत. या प्रक्रियेत भौगोलिक सलगता आणि नैसर्गिक अंतराचा विचार न केल्यामुळे पुणेकरांना दैनंदिन कामांसाठी घरापासून लांब असलेल्या क्षेत्रीय कार्यालयात जावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर या रचनेला स्थगिती देऊन नवीन प्रभागरचना करावी, अशी विनंती सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती.

विश्रांतवाडी व धानोरी या क्षेत्रीय कार्यालयाला पूर्वीप्रमाणे कळस-धानोरी, फुलेनगर-नागपूर चाळ आणि येरवडा हे प्रभाग जोडणे अपेक्षित होते. यापूर्वीच्या तीन निवडणुकांमध्ये याच प्रमाणे क्षेत्रीय कार्यालयाची रचना होती. या वेळी या क्षेत्रीय कार्यालयांत भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष बसविण्यासाठी कळस-धानोरी, फुलेनगर-नागपूर चाळ आणि लोहगाव विमाननगर हे प्रभाग जोडण्याची खेळी खेळली गेली. या राजकारणामुळे वाघोली येथील नागरिकांना रामवाडी जवळ असतानाही येरवड्यात यावे लागणार आहे. तर, कळस येथील नागरिकांना नगर रस्ता येथे जावा लागणार असल्याचा ‘राष्ट्रवादी’चा आक्षेप आहे.

प्रशासकीय सुसंगततेसाठी प्रभाग क्रमांक १, २ व ६ हे येरवडा क्षेत्रीय कार्यालयास आणि प्रभाग ३, ४ व ५ हे नगर रोड क्षेत्रीय कार्यालयास जोडणे अधिक सयुक्तिक ठरेल. अशा प्रकारच्या विसंगत रचनेमुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग व्यक्तींना नाहक प्रवास व मनस्ताप सहन करावा लागणार आहे. ही रचना अत्यंत एकांगी असून, त्यामध्ये भौगोलिक सुसंगतता व लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेतलेले दिसत नाही. तरी, जनहिताच्या दृष्टीने पुणे महापालिका प्रशासनाच्या सदर प्रभागरचनेस तत्काळ स्थगिती देऊन नवीन सुधारित प्रभागरचना करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत, अशी विनंती उपमुख्यमंत्री पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.



