परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय; मुलगी जिजाच्या संगोपनाची जबाबदारी दोघेही एकत्र पार पाडणार
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकार आदिनाथ कोठारे आणि ऊर्मिला कानेटकर यांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत दोघांनी आपल्या वैवाहिक नात्याला पूर्णविराम देत असल्याची अधिकृत माहिती दिली. जवळपास १५ वर्षांच्या संसारानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे.
आदिनाथ आणि ऊर्मिला यांनी आपल्या निवेदनात, खूप विचारविनिमय केल्यानंतर सामंजस्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. पती-पत्नी म्हणून त्यांचा प्रवास संपत असला, तरी एकमेकांविषयीचा आदर कायम राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मुलगी जिजासाठी एकत्र राहणार
विभक्त झाल्यानंतरही मुलगी जिजाच्या संगोपनाची जबाबदारी दोघेही संयुक्तपणे स्वीकारणार आहेत. जिजाला आई-वडिलांचे प्रेम, सुरक्षित वातावरण आणि आवश्यक पाठिंबा मिळावा, यासाठी सहपालकत्वाची जबाबदारी पूर्णपणे पार पाडणार असल्याचे आदिनाथ आणि ऊर्मिला यांनी सांगितले आहे.
खाजगीपणाचा आदर करण्याचे आवाहन
या निर्णयासंदर्भात चाहत्यांनी आणि माध्यमांनी आपल्या खाजगीपणाचा आदर करावा, अशी विनंतीही दोघांनी केली आहे. या विषयावर हेच त्यांचे अधिकृत आणि अंतिम निवेदन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आजवर मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल त्यांनी चाहत्यांचे आभार मानले आहेत.

२०११ मध्ये बांधली होती लग्नगाठ
आदिनाथ कोठारे आणि ऊर्मिला कानेटकर यांनी डिसेंबर २०११ मध्ये विवाह केला होता. दोघांना जिजा नावाची मुलगी आहे. गेल्या काही काळापासून त्यांच्या वैवाहिक आयुष्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, त्या वेळी दोघांनीही यावर स्पष्ट प्रतिक्रिया दिली नव्हती. आता संयुक्त निवेदनातून त्यांनी विभक्त होण्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक म्हणून आदिनाथ आणि ऊर्मिला यांच्याकडे पाहिले जात होते. त्यामुळे त्यांच्या विभक्त होण्याच्या निर्णयाची मनोरंजन क्षेत्रात आणि चाहत्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.


