सामान्य प्रशासन विभागाकडून चर्चगेटमधील फ्लॅट मंजूर; अद्याप स्वीकारला नसल्याची माहिती
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला रामराम करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले आणि त्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झालेले सचिन अहिर आता शासकीय निवासस्थानामुळे चर्चेत आले आहेत. उपसभापतीपदासाठी अपेक्षित असलेला शासकीय बंगला उपलब्ध न झाल्याने त्यांना चर्चगेटमधील ‘सुनीती’ इमारतीत फ्लॅट मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, अहिर यांनी अद्याप या फ्लॅटचा ताबा घेतलेला नाही.
‘रायगड’ बंगला रवींद्र चव्हाणांकडेच
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन अहिर यांच्यासाठी सुरुवातीला मंत्रालयासमोरील ‘रायगड’ (ए-६) बंगला निश्चित करण्यात आला होता. मात्र, हा बंगला माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या ताब्यात असल्याने अहिर यांना त्याचे वाटप होऊ शकले नाही. त्यामुळे ‘रायगड’ बंगल्याचे प्रस्तावित वाटप मागे घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
‘पुरंदर’ बंगला अण्णा बनसोडेंना
‘रायगड’नंतर अहिर यांनी ‘पुरंदर’ (सी-३) या बंगल्याची मागणी केल्याची माहिती आहे. हा बंगला यापूर्वी विधान परिषदेच्या तत्कालीन उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे होता. मात्र, सचिन अहिर यांनी उपसभापतीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वीच ‘पुरंदर’ बंगला विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना देण्यात आला. त्यामुळे अहिर यांच्यासमोरील दुसरा पर्यायही बंद झाला.
शिंदेंकडे मांडणार निवासस्थानाचा प्रश्न?
मुंबईत उपसभापतींसाठी योग्य शासकीय बंगला उपलब्ध नसल्याने सामान्य प्रशासन विभागाने अहिर यांना ‘सुनीती’ इमारतीमधील फ्लॅट मंजूर केला आहे. अहिर यांनी अद्याप या फ्लॅटमध्ये स्थलांतर केलेले नाही. शासकीय निवासस्थानाचा हा विषय ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे.
वरळीतील राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चर्चा
सचिन अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून बाहेर पडून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने वरळीतील राजकीय समीकरणे बदलली आहेत. वरळीमध्ये संघटनात्मक ताकद असलेल्या अहिर यांच्या पक्षांतराला आदित्य ठाकरे यांच्यासाठी राजकीय धक्का मानले जात आहे. पक्षप्रवेशाच्या दुसऱ्याच दिवशी अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली होती.

