HCMTR आणि ‘इनर रिंग रोड’ प्रकल्पांना गती; भूसंपादनातील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय

Date:

HCMTRच्या मार्गात १२ बदल; पीएमआरडीएच्या ८३ किलोमीटर रिंग रोडची रुंदी ६५ मीटर निश्चित

पुणे : पुणे महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित ‘हाय कॅपॅसिटी मास ट्रान्झिट रूट’ (HCMTR) आणि पीएमआरडीएच्या ‘इनर रिंग रोड’ प्रकल्पांना गती देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कार्यकारी समितीची पहिली बैठक महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. भूसंपादनातील अडथळे दूर करणे, मार्गांचे ड्रोन सर्वेक्षण करणे आणि प्रकल्पांच्या कामासाठी स्वतंत्र विशेष कक्ष स्थापन करण्याचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले.

बैठकीला पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.

HCMTRच्या संरेखनात १२ महत्त्वाचे बदल

पुणे महापालिकेच्या विकास आराखड्यातील ३६ किलोमीटर लांबीच्या ‘उच्च क्षमता सामूहिक वाहतूक मार्ग’ अर्थात HCMTR प्रकल्पाचे सुधारित सादरीकरण बैठकीत करण्यात आले. जुन्या विकास आराखड्यामुळे निर्माण होणाऱ्या भूसंपादनाच्या अडचणी कमी करण्यासाठी नवीन संरेखनात १२ महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

सुधारित आराखड्यानुसार आता केवळ १५ टक्के खासगी जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. एकूण मार्गापैकी सुमारे ५० टक्के मार्ग अस्तित्वातील रस्त्यांवरून जाणार असून, ३५ टक्के जागा शासकीय मालकीची आहे. त्यामुळे प्रकल्पासाठी आवश्यक खासगी भूसंपादनाचा भार मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे.

शासकीय जमिनींचा सविस्तर आढावा घेऊन त्या तातडीने ताब्यात घेण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. तसेच संबंधित विभागांनी पुढील २० दिवसांत भूसंपादनाच्या सर्व प्रस्तावांचे सर्वेक्षण पूर्ण करून ते जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावे, असेही आदेश देण्यात आले.

उपलब्ध शासकीय आणि अन्य जमिनींचा विचार करून लवकरात लवकर निविदा प्रक्रिया राबविण्याबाबतही बैठकीत सूचना देण्यात आल्या आहेत.

४४ गावांमधून जाणार पीएमआरडीएचा रिंग रोड

पीएमआरडीएच्या आयुक्तांनी बैठकीत प्रस्तावित ८३ किलोमीटर लांबीच्या ‘इनर रिंग रोड’ प्रकल्पाची सद्यस्थिती मांडली. भविष्यातील वाहनांची वाढती संख्या आणि सेवा रस्त्यांची आवश्यकता लक्षात घेऊन रिंग रोडची रुंदी ६५ मीटर निश्चित करण्यात आली आहे.

हा रिंग रोड एकूण ४४ गावांमधून जाणार आहे. या संपूर्ण मार्गाचे नकाशे आणि संबंधित माहिती एकत्रित करून भूसंपादनाचे प्रस्ताव तातडीने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले.

भूसंपादन सल्लागारांच्या माध्यमातून रिंग रोडचे अंतिम संरेखन तातडीने निश्चित करून त्याला कायदेशीर मान्यता मिळविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. भूसंपादनाची कार्यवाही वेगाने करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

दोन्ही मार्गांचे होणार ड्रोन सर्वेक्षण

HCMTR आणि इनर रिंग रोड मार्गातील अडथळे, सध्याची भौगोलिक स्थिती आणि प्रत्यक्ष जागेची माहिती मिळविण्यासाठी दोन्ही मार्गांचे संपूर्ण ड्रोन सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

घोले रस्त्यावर ४० अभियंत्यांचा ‘विशेष कक्ष’

HCMTR, इनर रिंग रोड आणि प्रस्तावित भूमिगत बोगदे या महत्त्वाच्या प्रकल्पांची वेगाने अंमलबजावणी करण्यासाठी पुणे महापालिकेच्या ४० अभियंत्यांचा समावेश असलेला स्वतंत्र ‘विशेष कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे.

या कक्षाचे कामकाज घोले रस्त्यावरील महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधून चालणार आहे. पुणे महापालिका आणि पीएमआरडीए यांच्यात योग्य समन्वय राहावा, यासाठी पीएमआरडीएनेही आपल्या अधिकाऱ्यांची या कक्षात नियुक्ती करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

पुणेकरांचा प्रवास अधिक सुलभ करणे आणि वाहतूक कोंडीवर दीर्घकालीन उपाय निर्माण करण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी युद्धपातळीवर काम करून नियोजित कालावधीत प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत २८,८४० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार !

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ दहा वर्षांत सुमारे चार कोटी नव्या...

आदिनाथ कोठारे-ऊर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट

परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय; मुलगी जिजाच्या संगोपनाची जबाबदारी...

उपसभापती सचिन अहिरांना बंगला मिळेना; ‘रायगड’ चव्हाणांकडे, तर ‘पुरंदर’ बनसोडेंना

सामान्य प्रशासन विभागाकडून चर्चगेटमधील फ्लॅट मंजूर; अद्याप स्वीकारला नसल्याची...

मतदार याद्या अद्यावत करण्यासाठी तुडुंब गर्दी: कर्मचाऱ्यांसह नागरिकांचीही ससेहोलपट

जिल्हाधिकारी यांनी अनेकदा राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना या कामासाठी मदत...