‘बदलते समाजमन – एक मंथन’ विषयावर करम प्रतिष्ठानतर्फे प्रा. मिलिंद जोशी यांची मुलाखत
पुणे : दिवसेंदिवस आपण समाज म्हणून अधिक कडवे होत चाललो आहोत. क्षुल्लक गोष्टींमुळे समाजाच्या भावना दुखावतात. धर्म, जात, प्रांत, भाषा हे भेद विसरून आपण देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलो; मात्र आता त्याच्याच आधारे आपण एकमेकांशी लढतो आहोत. भावनिक उष्मांक वाढलेल्या आजच्या समाजात संवेदनांचा दुष्काळ आहे, असे मत ज्येष्ठ लेखक आणि वक्ते प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. समाजात विवेक निर्माण करण्याची आज गरज असून आशावादाची ज्योत तेवत ठेवण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
करम प्रतिष्ठानतर्फे ‘बदलते समाजमन – एक मंथन’ या विषयावर प्रा. मिलिंद जोशी यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम रविवारी (दि. १८) आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. वैशाली माळी, अश्र्विनी देशपांडे यांनी प्रा. जोशी यांची मुलाखत घेतली. करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर, भालचंद्र कुलकर्णी मंचावर होते. सदाशिव पेठेतील अक्षरवेल सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, समाजाच्या नैतिक आणि भौतिक जीवनात मोठी दरी निर्माण झाल्यामुळे सांस्कृतिक मांद्य (कल्चरल लॅग) वाढले आहे. त्यामुळे बधीरताही वाढली आहे. विवेकबुद्धी हरवल्यामुळे व्यक्तीपूजेचे स्तोम वाढले आहे. विद्वत्ता, सदवर्तन आणि चारित्र्य हे पूर्वी प्रतिष्ठेचे निकष होते. दिखावूपणा वाढलेल्या समाजात भौतिक निकषांवरून माणसांचे आज मूल्यमापन केले जात आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रात झपाट्याने सपाटीकरण सुरू आहे, त्यामुळे गुणवत्तेचा ऱ्हास होत आहे. अन्नामुळे कुपोषित झालेल्या समाज जसा अपेक्षित नाही तसाच स्वत्व आणि सत्व हरवल्यामुळे भावनिक दृष्ट्या कुपोषित होत चाललेला असंवेदनशील समाजही अपेक्षित नाही. एकीकडे भौतिक संपन्नतेचा भास निर्माण केला जात असला तरी दुसरीकडे किळसवाणे वैचारिक दारिद्र्य आहे. परिवर्तनासाठी शिक्षणाची भूमिका महत्त्वाची असते. अभ्यासापलिकडेही जग आहे. त्या जगात टिकण्यासाठी मुले तयार करण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. वैचारिक भूमिकेतून साहित्यिक समाजात बलद घडवून आणू शकतात. मा त्र त्यांनी कुठल्याही गटा-तटात सामिल न होता सत्याचा शोध घेतला पाहिजे, अशी अपेक्षा प्रा. जोशी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात व्यक्त केली.
मुक्ता भुजबले यांनी मनोगत व्यक्त केले. वासंती वैद्य यांनी विषयाधारित कविता सादर केल्या तर भालचंद्र कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात करम प्रतिष्ठानच्या उपक्रमांची माहिती दिली. प्राजक्ता वेदपाठक आणि वैजयंती आपटे यांनी सूत्रे सांभाळली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विषयाधारित कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

