Home Blog Page 31

पुणे विषारी दारू प्रकरणातील पीडित कुटुंबियांची मंत्री गिरीश महाजन यांची भेट

पुणे, दि.३०: पुण्यातील दापोडी व फुगेवाडी या परिसरात विषारी दारूच्या सेवनामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुःखद घटना घडली असून याबाबत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांची आज आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री गिरीश महाजन यांनी भेट घेऊन सांत्वन केले आहे. तसेच विषारी दारूच्या सेवनाने अत्यवस्थ झालेल्या रुग्णांची यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची माहिती घेऊन संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.

सदर घटना घडलेल्या परिसरात भेट देऊन नागरिकांसोबत संवाद साधला. दारू हे समाजाला लागलेले ग्रहण आहे, हे ग्रहण सोडवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया असे यावेळी आवाहन केले. तसेच, माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाला या प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आपल्या बांधवांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या प्रत्येक गुन्हेगाराला कठोर शासन होईल हा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

यावेळी आमदार उमा खापरे, अमित गोरखे, शंकर जगताप, महापौर रवी लांडगे, सभागृह नेते प्रशांत शितोळे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

विषारी दारू प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा द्या; मृत कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी शासनास्तरावर पाठपुरावा करणार – आ.डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे
फुगेवाडी व हडपसर परिसरात घडलेल्या विषारी दारू प्रकरणामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून, या घटनेला जबाबदार असलेल्या नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा देऊन फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार, डॉ. गोऱ्हे यांनी रविवारी फुगेवाडी परिसरात जाऊन अनेक मृतांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. तसेच शिवसेनेच्या वतीने पीडित कुटुंबांना रोख तातडीची आर्थिक मदत सुपूर्द केली. याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, इरफानभाई सय्यद, महिला जिल्हा प्रमुख मनिषा परांडे , निलेश हाके, संजय काटे, मनीषा करंडे, अविनाश जाधव, ब्रिजेश नागदेवते, बाबू बापूर, श्रीकांत शेवाळे, करण काळे, सचिन खलसे, शैलेश हाके, गणेश आयाळी, यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

१३ कुटुंबांना शिवसेनेचा आधार
या दौऱ्यादरम्यान फुगेवाडी येथील अक्षय अशोक अवसरमल, विजय प्रकाश राठोड, राजेंद्र प्रकाश राठोड, आनंद काशिनाथ निकाळजे, आनंद पांडेराव देसाई, अकबर अझीमखान पठाण, राजेश शांताराम राजपूत, सचिन रामचंद्र नेटके आणि बाबा सैय्यद हुसेन शेख यांच्या शोकाकुल कुटुंबांना भेटून मदत देण्यात आली. हडपसरयेथील चार परिवीरांना ३०मे रोजी आ.नीलम गोर्हे यांनी मदत केली आहे. ऊर्वरित हडपसर येथील व फुगेवाडीतील उर्वरित पीडित कुटुंबांनाही लवकरच अॅानलाईन पद्बमदत दिली जाईल, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. आतापर्यंत दोन्ही भागांतील जवळपास १३ कुटुंबांना मदत करण्यात आली आहे.

केस स्टडी: कर्ते पुरुष गेले, मागे उरला फक्त निराशेचा अंधार!

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी फुगेवाडीतील पीडित कुटुंबांची प्रत्यक्ष भेट घेतली असता, या दुर्घटनेची अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक बाजू समोर आली आहे:

अल्पशिक्षित महिला आणि रोजगाराचा प्रश्न: या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले बहुतेक सर्वजण कुटुंबातील एकमेव कमावते (कर्ते) पुरुष होते. अनेक घरांमध्ये आता केवळ महिला, लहान मुले आणि वृद्ध सदस्यच उरले आहेत. महिलांचे शिक्षण कमी असल्याने त्यांना तात्काळ रोजगार मिळणे कठीण झाले असून, उद्यापासून घर कसे चालवायचे, हा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर आहे.

मुलांचे शिक्षण धोक्यात: वडिलांचे छत्र हरपल्यामुळे लहान मुलांच्या शालेय शिक्षणावर, आरोग्यावर आणि दैनंदिन उदरनिर्वाहावर मोठे संकट कोसळले आहे.

वृद्ध आणि दिव्यांगांचे हाल: काही कुटुंबांमध्ये वृद्ध आई-वडील किंवा दिव्यांग सदस्य आहेत, ज्यांना सांभाळणारे आता कोणीही राहिलेले नाही.

निष्कर्ष: यावरून स्पष्ट होते की, केवळ एकवेळची आर्थिक मदत देऊन या कुटुंबांचे प्रश्न सुटणारे नाहीत.’दीर्घकालीन पुनर्वसन पॅकेज’ आणि प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला शाश्वत रोजगार मिळणे अत्यंत गरजेचे आहे.

“केवळ हातभट्टी नव्हे, विषारी पुरवठा साखळीचा तपास व्हावा”
माध्यमांशी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “महाराष्ट्रात अशा घटना घडल्यानंतर प्रत्येक वेळी विधिमंडळात चर्चा होते. मात्र, अशा घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा हवी. हा केवळ एका हातभट्टीचा प्रश्न नसून मिथेनॉलसारख्या घातक रसायनांचा पुरवठा कुठून झाला, याची संपूर्ण ‘सप्लाय चेन’ शोधणे आवश्यक आहे. रासायनिक तपासणी अहवाल तातडीने समोर यायला हवेत आणि सक्षम सरकारी वकील नियुक्त करून खटला जलदगती न्यायालयात चालवला पाहिजे.”

तक्रारी होऊनही कारवाईत ढिलाई का? पोलिसांवर प्रश्नचिन्ह!
पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर तीव्र नाराजी व्यक्त करत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “स्थानिक शिवसैनिकांनी यापूर्वी लेखी निवेदने दिली होती. खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) बैठकीतही हा विषय लावून धरला होता. तरीही पोलिसांचा धाक का निर्माण झाला नाही? छापे टाकल्यानंतरही या हातभट्ट्या पुन्हा सुरू कशा होतात, याची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे. केवळ खालच्या अधिकाऱ्यांचे निलंबन करून भागणार नाही, तर यामागील आर्थिक हितसंबंध शोधून दोषींवर कडक कारवाई व्हावी.”

शासकीय मदतीसोबतच शाश्वत पुनर्वसनासाठी पाठपुरावा
राज्य शासनाने मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपये आणि महानगरपालिकेने १ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. यासाठी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. या मदतीचे स्वागत करतानाच डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले की, “हातवर पोट असणाऱ्या या कुटुंबांना तात्पुरती मदत मिळेल, पण पुढच्या जगण्याच्या लढाईसाठी ठोस व्यवस्थेची गरज आहे. शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही या महिलांना रोजगार आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहोत.”

शिवसेना शेवटपर्यंत पाठीशी राहणार!

“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना या संपूर्ण परिस्थितीची कल्पना दिली आहे. शिवसेना या पीडित कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आगामी विधिमंडळ आणि संसदेच्या अधिवेशनातही या प्रकरणाचा आवाज उठवून दोषींना फाशीची शिक्षा मिळेपर्यंत आणि पीडितांना पूर्ण न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील,” अशी ग्वाही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शेवटी दिली.

आरक्षण उपवर्गीकरणाचा हट्ट मातंग नेत्यांनी सोडावा

त्यामुळे समाजाचे अतोनात नुकसानच होणार: राहुल डंबाळे

  • ‘लहुजी वस्ताद साळवे आयोग’ पूर्णतः एकतर्फी आणि राजकीय हेतूने प्रेरित!
  • गेल्या २० वर्षांत कोणत्याही आयोगाने मातंग समाजाला अप्रगत ठरवलेले नाही.
  • सरकारी नोकरभरतीच नसताना उपवर्गीकरणाचा फटका विद्यार्थ्यांना का? समाजबांधवांनी विचार करावा.

पुणे: “अनुसूचित जातीच्या (SC) आरक्षणातील उपवर्गीकरणामुळे दलित आणि वंचित घटकांमध्ये अंतर्गत वाद निर्माण होऊन समाजाचे अतोनात नुकसान होणार आहे. त्यामुळे मातंग समाजाच्या नेत्यांनी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा आपला हट्ट तातडीने सोडून द्यावा,” असे परखड आवाहन आरक्षण उपवर्गीकरण पुनर्विलोकन समितीचे संयोजक राहुल डंबाळे यांनी येथे केले आहे.

पुण्यात आयोजित बैठकीत ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत देशभरात विविध मतप्रवाह समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल डंबाळे यांनी आपली आणि समितीची सविस्तर भूमिका स्पष्ट केली.

यावेळी बोलताना राहुल डंबाळे म्हणाले की, “आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी सातत्याने ‘क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे आयोगाचा’ हवाला दिला जातो. परंतु, हा आयोग पूर्णतः एकतर्फी आणि राजकीय हेतूने प्रेरित होऊन, चुकीच्या माहितीच्या आधारे तयार करण्यात आला होता हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. वस्तुस्थिती ही आहे की, गेल्या वीस वर्षांत देशातील किंवा राज्यातील कोणत्याही अधिकृत समितीने अथवा आयोगाने मातंग समाजाला ‘अप्रगत’ ठरवलेले नाही. असे असताना केवळ राजकीय स्वार्थासाठी हा चुकीचा अहवाल पुढे केला जात आहे.”

ते पुढे म्हणाले की, “सध्याच्या काळात शासकीय क्षेत्रातील नोकरभरती जवळपास बंद आहे. मुळात नोकरभरतीच शिल्लक नसताना, केवळ आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा घाट घातल्यामुळे याचा अत्यंत गंभीर आणि विपरीत परिणाम शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मातंग समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांवर होणार आहे. शैक्षणिक प्रवेशाच्या वेळी या वर्गीकरणामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होईल.”

“आज जे पुढारी आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी अडून बसले आहेत, ते केवळ नोकऱ्या आणि शिक्षणापुरतेच उपवर्गीकरण का मागत आहेत? ते विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ‘राजकीय उपवर्गीकरणाची’ (Political Sub-categorization) मागणी का करत नाहीत? तिथेही मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय प्रतिनिधित्व मिळायला हवे, अशी मागणी हे नेते का करत नाहीत? याचा सखोल विचार आता सर्वसामान्य समाजबांधवांनी करणे अत्यंत आवश्यक आहे,” असेही डंबाळे यांनी आवर्जून नमूद केले.

आरक्षणाचे उपवर्गीकरण करणे हे मूळ घटनात्मक आरक्षणाच्या तत्त्वाला धक्का लावणारे ठरू शकते. यामुळे उपेक्षित घटकांमध्ये ऐक्य राहण्याऐवजी आपापसात फूट पडेल. मातंग समाजाच्या खऱ्या प्रगतीसाठी दर्जेदार शिक्षण, रोजगार आणि विशेष आर्थिक पॅकेजची गरज आहे. त्यामुळे नेत्यांनी हा हट्ट मागे घेऊन समाजाची दिशाभूल थांबवावी, असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

पुरुषांचा विद्वेष करणे म्हणजे स्त्रीवाद नव्हे

रमाई साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदावरून विद्रोही कवयित्री रमणी सोनवणे यांचे प्रतिपादन

पुणे –

पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये मुजोर असलेल्या सत्ता आणि संस्कृतीने स्त्रीला विविध नात्यांच्या आणि परंपरांच्या चौकटीत अडकवून टाकले असले तरी देखील केवळ विद्वेष करणे म्हणजे स्त्रीवाद नाही, असे प्रतिपादन विद्रोही कवयित्री आणि पहिल्या रमाई साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष रमणी सोनवणे यांनी केले.

महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक यांच्या वतीने रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनाच्या आणि राष्ट्रीय स्मारकाच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त प्रथमच आयोजित करण्यात माता रमाई साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी संमेलनाध्यक्ष म्हणून रमणी सोनवणे बोलत होत्या.

संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, रंगत संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, साहित्य आणि संस्कृती क्षेत्रामध्ये कार्य करणारे सचिन इटकर, माजी नगरसेविका लता राजगुरू, संमेलनाचे मुख्य आयोजक विठ्ठल गायकवाड, ॲड नितीन घोडके, प्रशांत खिस्ती आदी मान्यवर उपस्थित होते.

भारतीय संविधानाने आपली बौद्धिक भूक भागवण्याचे कार्य केले. त्याचप्रमाणे एक स्त्री म्हणून समाजात समानतेचे स्थान देण्याचे कार्य केले. संविधानाच्या अंमलबजावणीपूर्वी समाजामध्ये पुरुष सत्ता संस्कृती मजूर होती. स्त्रीला नात्यांच्या आणि जबाबदारीच्या चौकटीत गुरफटून टाकण्यात आले होते. मात्र, केवळ पुरुषांना विरोध करणे म्हणजेच स्त्रीवाद नसून स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क आणि जबाबदाऱ्या प्रधान करणे हे समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे रमणी सोनवणे यांनी यावेळी नमूद केले.
विविध विचारांची साहित्य संमेलन आहे म्हणजे विचारांचे मंथन असून त्या माध्यमातून विचारांची देवाण-घेवाण होणे समाजासाठी पोषक असल्याचे मत श्रीपाल सबनीस यांनी यावेळी व्यक्त केले साहित्य संमेलना सारखे उपक्रम म्हणजे विचारांची बेरीज असून समाजासाठी पोषक असल्याचे त्यांनी नमूद केले. आपले विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य घेत असताना इतरांच्या श्रद्धा दुखावू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार पुढे घेऊन जाणाऱ्या संमेलनाध्यक्षा रमणी सोनवणे या समाजासाठी आश्वासक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
या एक दिवसीय रमाई साहित्य संमेलनात दिवसभर सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक कवी संमेलन, परिसंवाद आणि सांगितिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

जिल्हा न्यायालयाची दिशाभूल करून विकास लवांडे यांना अटक, पोलीस उपनिरीक्षक अमोल काळे यांच्या विरोधात विभागीय चौकशीची मागणी.

पुणे- वाघोली पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अमोल काळे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयाची जाणीवपूर्वक दिशाभूल करून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास सदाशिव लवांडे यांना अटक केल्याचा गंभीर आरोप करत पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात, पोलीस उपनिरीक्षक अमोल काळे यांच्या विरुद्ध पुणे पोलीस आयुक्तां कडून विभागीय कारवाई, खुलासा व न्यायालयीन कार्यवाही सुरू करण्याबाबत अर्ज विकास लवांडे यांचे वकील अ‍ॅड.मिलिंद दत्तात्रय पवार यांच्या कडून दाखल करण्यात आला आहे.

अर्जात नमूद करण्यात आले आहे की, सत्र न्यायालयाने सुरुवातीला विकास लवांडे यांना अटकपूर्व अंतरिम संरक्षण मंजूर केला होता. मात्र, सुनावणी दरम्यान वाघोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल काळे यांनी न्यायालयासमोर चुकीची व दिशाभूल करणारी माहिती सादर केली. त्यावर विश्वास ठेवून मा. सत्र न्यायालयाने पूर्वी मंजूर केलेला अंतरिम संरक्षण रद्द केले होते.

त्यानंतर लगेचच दिनांक २१/०५/२०२६ रोजी उपनिरीक्षक अमोल काळे यांनी विकास लवांडे यांना पुणे जिल्हा न्यायालय परिसरातच बेकायदेशीर रित्या अटक केली. अर्जात असा आरोप करण्यात आला आहे की, ही अटक भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील अनिवार्य नोटीस न देता करण्यात आली.

अर्जात पुढे नमूद करण्यात आले आहे की, संबंधित पोलीस अधिकाऱ्याने नंतर न्यायालयीन कार्यवाही दरम्यान चुकीचा गुन्हा क्रमांक ‘नजरचुकी’ मुळे नमूद झाल्याचे मान्य केले. तथापि, लवांडे यांच्या मते हे केवळ निष्काळजीपणाचे व नजरचुकीचे प्रकरण नसून न्यायालयाची जाणीवपूर्वक दिशाभूल करून अटकपूर्व संरक्षण निष्फळ करण्याचा प्रयत्न होता.

अर्जात उपनिरीक्षक अमोल काळे यांच्या वर्तनास न्यायप्रक्रियेचा गैरवापर, न्यायदान प्रक्रियेत हस्तक्षेप व वैयक्तिक स्वातंत्र्यावर आघात असे संबोधण्यात आले असून मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्यामार्फत कठोर विभागीय चौकशी सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच, जर अशा प्रकारे न्यायालयांची दिशाभूल करून सामान्य नागरिकांविरुद्ध कारवाई होत राहिली तर न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कमी होईल, अशी गंभीर बाबही अर्जात मांडण्यात आली आहे.

श्री. लवांडे यांच्या अर्जावर सरकार पक्षास म्हणणे दाखल करण्याचे निर्देश पुणे जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश श्री.एस.आर. साळुंके यांनी दिले असून पुढील सुनावणी २ जुन २०२६ या तारखेस होणार आहे.

पुणे माझी कर्मभूमी; पुरस्कार कौतुकाची थाप : अमृता खानविलकर

नटरंग ॲकॅडमी आयोजित कलागौरव, सामाजिक कृतज्ञता पुरस्कारांचे वितरण

पुणे : पुणे ही माझी कर्मभूमी आहे. मी पुण्यात आले नसते तर कलेच्या क्षेत्रातही आले नसते. यासाठी पुणेकरांना मानाचा मुजरा करते. नटरंग प्रतिष्ठानचा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी घरच्या मंडळींनी पाठीवर दिलेली कौतुकाची थाप आहे. माझ्या कलाक्षेत्रातील कार्याला मिळालेली पोचपावती पुढच्या वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरेल, अशा भावना लोकप्रिय अभिनेत्री, नृत्यांगना अमृता खानविलकर यांनी व्यक्त केल्या.

नटरंग ॲकॅडमीतर्फे दिल्या जाणाऱ्या ३२व्या स्व. शाहीर मधू कडू स्मृती नटरंग प्रतिष्ठान कलागौरव पुरस्काराने अमृता खानविलकर तर चौथ्या स्वर्गीय गिरीश बापट स्मृती नटरंग प्रतिष्ठान सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने गणेशभक्त, सामाजिक कार्यकर्ते शिरीष मोहिते यांचा आज (दि. २९) गौरव करण्यात आला. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना खानविलकर बोलत होत्या. पुरस्कारांचे वितरण आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते झाले.

उपमहापौर परशुराम वाडेकर, नटरंग ॲकॅडमीच्या अध्यक्षा, नगरसेविका स्वरदा बापट, कार्याध्यक्ष जतिन पांडे, अभिनेत्री प्राजक्ता माळी, दीपक मानकर, राघवेंद्र मानकर, कुणाल टिळक, ललित जैन, नितीन पंडित, विजय कडू, राजेश येनपुरे, दत्ता सागरे आदी उपस्थित होते. बालगंधर्व रंगमंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाल, श्रीफळ, तुळशीचे रोप, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, मानाचा फेटा आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते.

पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्ताने नटरंग कला ॲकॅडमीच्या १२५ गुणवान कलाकारांचा नृत्य, संगीत आणि विनोदावर आधारित ‘नृत्यरंग’ हा बहारदार कार्यक्रम सादर झाला. रसिकांनी भरभरून दाद देत कार्यक्रमाचा आनंद घेतला.

शिरीष मोहिते म्हणाले, गणेश मंडळासाठी कार्य करीत असताना मी सामाजिक क्षेत्रात रमलो. परमेश्र्वराची साथ मिळाल्याने माझ्या हातून समाजकार्य घडत आहे. नटरंग संस्थेच्या माध्यमातून कला क्षेत्रात उत्तम पिढी घडविण्याचे कार्य होत आहे, हे कौतुकास्पद आहे. सामाजिक कार्यकर्ता या नात्याने मिळालेला पुरस्कार माझ्या गणेश मंडळातील सर्व कार्यकर्त्यांना कुटुंबियांना समर्पित करतो आहे. गिरीश बापट यांच्या सामाजिक कार्याविषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

आमदार हेमंत रासने म्हणाले, शिरीष मोहिते हे गणेश मंडळाच्या व्यासपीठाद्वारे सामाजिक कार्यात ठसा उमटविण्याचे काम करीत आहेत, त्याचप्रमाणे कलेच्या माध्यमातून रसिकांवर मोहिनी घालण्याचे काम अमृता खानविलकर करीत आहेत. नटरंग संस्थेतर्फे दिल्या गेलेल्या पुरस्काराने त्यांच्या कार्याला न्याय दिला गेला आहे.

दीपक मानकर यांनी सांगितले की, अमृता खानविलकर कलेच्या क्षेत्रातून समाजाच्या अंतर्मनात अमृत पोहोचवित आहेत. तर शिरीष मोहिते सामाजिक वसा जपणारे कार्यकर्ते असून गणेश मंडळाच्या मार्फत समाजाचे दु:ख दूर करत त्यांचे हित जपण्याचे मोलाचे कार्य करीत आहेत. नटरंगच्या माध्यमातून जतिन पांडे गेली ३२ वर्षे सातत्याने समाजाला दिशा दर्शवित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम करीत आहेत.

प्राजक्ता माळी यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागतपर प्रास्ताविकात जतिन पांडे यांनी संस्थेच्या कार्याविषयी तसेच पुरस्कारांविषयी माहिती दिली. आभार स्वरदा बापट यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय गोगले यांनी केले. मान्यवरांचे स्वागत स्वरदा बापट, जतिन पांडे यांनी केले.

वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणे आयोजित श्री भागवत सप्ताहाचा समारोप

पुणे : वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणेतर्फे अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्री भागवत सप्ताहाचा आज (दि. ३०) समारोप झाला. युवा पिढीतील अभ्यासू प्रवचनकार वेदमूर्ती सुदर्शन जोशी-बेलगावकर यांनी ओघवत्या भाषेतील निरूपणाद्वारे भागवत पुराणाविषयी विवेचन केले.

वेदशास्त्रोत्तेजक सभा सभागृह, सारसबागेजवळ येथे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. भागवत पुराणावर प्रवचन करताना वेदमूर्ती सुदर्शन जोशी-बेलगावकर यांनी शास्त्रग्रंथातील सिद्धांत सांगून ते श्रोत्याने सहजतेने समजण्यासाठी सोपे-सोपे दृष्टांत दिले. त्याच प्रमाणे ज्ञानेश्र्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा आदि संतवाङ्‌मयातील ओव्या देखील उधृत केल्या. भागवत पुराणातील परिचित कथांमागील तात्विक विचार, आध्यात्मिक चिंतन त्यांनी सहजसोपे दाखले देऊन श्रोत्यांपर्यंत पोहोचविले.

सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पुरुषोत्तम यागात ऋग्वेदातील पवमानसूक्ताने हवन करण्यात आले. त्यानंतर पूर्णाहुती व वसोर्धारा होमाने यागाचे अनुष्ठान पूर्णत्वास नेण्यात आले.

सभेचे माजी पदवीधर स्मार्तचूडामणी वेदमूर्ती दत्तात्रय जोशी आणि सहकारी पुरोहितांनी या यागाचे अनुष्ठान पूर्णत्वास नेले.

वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणेतर्फे वेदमूर्ती सुदर्शन जोशी-बेलगावकर यांचा चंद्रशेखर बापट, श्रद्धा परांजपे, विनया देव, भगवंत ठिपसे, श्रीकांत फडके यांनी पुष्पगुच्छ व ग्रंथभेट देऊन सन्मान केला.

काँग्रेसच्या सोशल मीडिया, ओबीसी, एससी व अल्पसंख्यांक विभागाच्या नवनियुक्त तालुकाध्यक्षांची कार्यशाळा संपन्न.

कार्यशाळेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांसह विविध विषयातील तज्ञांचे मार्गदर्शन..

मुंबई, दि. ३० मे २०२६.

राज्यात काँग्रेसची पक्ष संघटना अधिक सक्षम आणि सक्रिय करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या संघटन सृजन अभियानांतर्गत सात हजार नविन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरु आहे. या नवनियुक्त पदाधिका-यांसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने पक्षाचे मुख्यालय दादरच्या टिळक भवनमध्ये दिनांक २६ मे ते ३० मे २०२६ या कालावधीत ओबीसी, अल्पसंख्याक, एस.सी. व सोशल मीडिया विभागासाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत संघटनात्मक बांधणी, पक्षविस्तार, जनसंपर्क, सोशल मीडिया संवाद, बूथस्तरीय नियोजन आणि विविध समाजघटकांशी समन्वय यांसारख्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनीही यावेळी पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले.

या कार्यशाळेला प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड. गणेश पाटील, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, एस. सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष अनिरुद्ध वनकर, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश शेट्टी, सरचिटणीस गुरबिंदर बच्चर, अभिजित सपकाळ, सोशल मीडिया विभागाचे प्रदेशाध्यक्ष हृषिकेश पाटील, प्रवक्ते हनुमंत पवार आदी उपस्थित होते. प्रदेश काँग्रेसच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख आशुतोष शिर्के, निमिष साने, यांच्या पुढाकाराने या कार्यशाळांचे नियोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध R.J. संग्राम खोपडे यांनीही मार्गदर्शन केले..

आरक्षण उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करा; अन्यथा तीव्र आंदोलन

 अनुसूचित जातींमधील ५९ घटकांना न्याय्य पद्धतीने आरक्षणाचा लाभ मिळावा – पुणे शहर जिल्हा मातंग समाजाची मागणी

पुणे : अनुसूचित जातींमधील ५९ घटकांना न्याय्य पद्धतीने आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली. तसेच कोणत्याही समाजातील महापुरुषांविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.या पत्रकार परिषदेला माजी मंत्री दिलीप कांबळे, सुभाष जगताप, आमदार अमित गोरखे, अविनाश बागवे, विष्णू कसबे, शंकर तडाखे, पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे सचिव दीपक कसबे यांच्यासह समाजाच्या कोअर कमिटीचे सदस्य विकास सातारकर, भास्कर नेटके, डॉ. संपत जाधव, सुनील खंडागळे, सचिन जोगदंड, शंकर शेंडगे, ॲड. महेश सकट, संजय केंजळे, दयानंद आढागळे, लक्ष्मण तांदळे आणि समाजातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी बोलताना आमदार अमित गोरखे यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यास मान्यता दिली असून त्यामुळे आरक्षणाचा लाभ सर्व घटकांपर्यंत अधिक समतोल आणि न्याय्य पद्धतीने पोहोचू शकतो. मात्र, शासनाकडून अद्याप या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याने समाजामध्ये नाराजी वाढत आहे. त्यामुळे शासनाने याबाबत तातडीने निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.माजी मंत्री दिलीप कांबळे यांनी आपल्या भाषणात समाजातील महापुरुषांचा अवमान करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. अशा घटनांमुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.दरम्यान, आरक्षण उपवर्गीकरणाच्या अंमलबजावणीबाबत शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न घेतल्यास पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने राज्यव्यापी आणि तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

“हडपसरमधील अवैध दारू हातभट्ट्यांवर शिवसेनेचा हल्लाबोल..!!”

प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वात शेकडो लिटर बनावट गावठी दारूचा साठा उध्वस्त

पुणे- पुणे शहरात विषारी दारूमुळे १५ नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळलेली असतांना शिवसेनेने हडपसर परिसरातील अवैध दारू व्यवसायाविरोधात थेट रस्त्यावर उतरून आक्रमक कारवाई केली. हडपसर मतदारसंघातील कृष्णानगर, तरवडे वस्ती पोलीस चौकीच्या अगदी पाठीमागे तसेच साठे वस्ती परिसरात खुलेआम सुरू असलेल्या गावठी व बनावट दारूच्या हातभट्ट्यांवर शिवसेनेने तुफान हल्लाबोल चढवत धडक मोहीम राबवली.

शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी अवैध दारूभट्ट्यांवर कारवाई करत हातभट्ट्या फोडून टाकल्या आणि बनावट गावठी दारूचा शेकडो लिटरचा अवैध साठा उध्वस्त केला. यावेळी प्रमोद नाना भानगिरे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, “सर्वसामान्य नागरिकांना या अवैध दारू हातभट्ट्या आणि त्यावरील राजरोसपणे सुरू असलेले व्यवहार स्पष्टपणे दिसतात, मग पुणे पोलिसांना ते का दिसत नाहीत?” असा थेट सवाल उपस्थित केला.

भानगिरे यांनी पुढे आरोप केला की, शहरातील अनेक भागांमध्ये वर्षानुवर्षे सुरू असलेले हे अवैध धंदे पोलिसांच्या माहितीसहच सुरू आहेत अशी जनतेमध्ये भावना निर्माण झाली आहे. पोलिसांच्या वरदहस्ताशिवाय अशा प्रकारे खुलेआम दारूभट्ट्या चालू शकत नाहीत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. विषारी दारूमुळे निष्पाप नागरिकांचे जीव जात असताना संबंधित यंत्रणा नेमकी काय करत होती, याचे उत्तर पुणे पोलिसांनी जनतेसमोर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

हडपसर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्री, हातभट्ट्या आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात शिवसेना सातत्याने आवाज उठवत असून विषारी दारूकांडात १५ नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतरही अवैध दारू विक्री सुरू राहणे ही अत्यंत गंभीर बाब असून यापुढे अशा दारू माफियांना कोणतीही दया दाखवली जाणार नाही, असा इशारा शिवसेनेने दिला,पुणे शहरात अवैध दारू व्यवसाय कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही आणि नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या दारू माफियांविरोधात अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या कारवाईवेळी प्रमोद नाना भानगिरे यांच्यासमवेत शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, शाखाप्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेच्या या धडक कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अवैध दारू व्यवसायाविरोधातील लढा आणखी तीव्र होण्याचे संकेत मिळाले आहेत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंती दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावरील

सांस्कृतिक कार्यक्रमाचे 31 मे रोजी रवींद्र नाट्यमंदिरात आयोजन

मुंबई, दि. ३० : लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य संचालनालयांच्या वतीने रविवार, ३१ मे २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता मिनी थिएटर, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे करण्यात आले आहे.

भारतीय इतिहासातील आदर्श राज्यकर्त्या, न्यायप्रिय प्रशासक आणि लोककल्याणासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनातील विविध प्रेरणादायी प्रसंग, त्यांचे सामाजिक कार्य, धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन, स्त्रीशक्तीचे दर्शन घडविणारे नेतृत्व तसेच राष्ट्रनिर्मितीतील त्यांचे योगदान या कार्यक्रमातून प्रभावीपणे उलगडण्यात येणार आहे.

नृत्य, संगीत, अभिनय आणि दृश्यरचनांच्या माध्यमातून साकारण्यात येणाऱ्या या भव्य प्रस्तुतीतून प्रेक्षकांना अहिल्यादेवींच्या जीवनसंघर्षाचा, प्रशासन कौशल्याचा आणि जनकल्याणकारी कार्याचा अनुभव घेता येणार आहे. ऐतिहासिक आशय आणि कलात्मक सादरीकरण यांचा संगम साधणारा हा कार्यक्रम सर्व वयोगटातील रसिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.

या कार्यक्रमाचे दिग्दर्शन आणि नृत्यदिग्दर्शन सुप्रसिद्ध कलावंत शशीन मेस्त्री (नृत्येश्वर) यांनी केले असून, नेपथ्य, वेशभूषा, प्रकाशयोजना आणि कलासादरीकरणाच्या माध्यमातून अहिल्यादेवींच्या जीवनाचा वैभवशाली प्रवास रंगमंचावर साकारण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे.

या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ रसिक, इतिहासप्रेमी, विद्यार्थी तसेच सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत

अहिल्यानगर-माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शनिवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते विजय चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन, माध्यम विभाग प्रमुख गोविंद येतयेकर आदी उपस्थित होते. श्री. तनपुरे हे 2019 मध्ये राहुरी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये श्री. तनपुरे राज्यमंत्री होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले, राहुरी मतदारसंघातील नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीच्या वेळी मी माझ्या सहकाऱ्यांसोबत प्राजक्त तनपुरे यांच्यासोबत चर्चा केली तेव्हा त्या विधानसभा मतदार संघातील तिन्ही तालूक्यातील अनेक महत्वाचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची तयारी त्यांनी दर्शवली. त्यांना जनतेच्या प्रश्नांची उत्तम जाण आहे. वर्षानुवर्षे समाजातील अनेक घटकांसोबत त्यांनी काम केले आहे. ज्या विश्वासाने श्री. तनपुरे यांनी भाजपात प्रवेश केला आहे त्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही. भाजपा संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहील, अशी ग्वाहीही श्री. चव्हाण यांनी दिली .
यावेळी प्राजक्त तनपुरे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून या मतदारसंघातील वीज, शेती आणि पाण्याच्या प्रश्नाची सोडवणूक होईल. पक्ष भविष्यात जी काही जबाबदारी सोपवेल ती उत्तमप्रकारे पार पाडेन.
यावेळी राहुरी नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, अहिल्यानगर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, राहुरी उपनगराध्यक्ष गजानन सातभाई, युवक तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर वाचकर, राहुरी तालुका युवक शहर अध्यक्ष संतोष आघाव, पाथर्डी उपाध्यक्ष जालिंदर वामन, अंबादास डमाळे, राहुरी पंचायत समिती माजी उपसभापती बाळासाहेब लटके, राहुरी पंचायत समिती माजी उपसभापती रवींद्र आढाव, किसनराव जवरे, प्रभाकर गाडे, नंदराज पाटील, अजय जाधव, गोरखनाथ पवार, महेश पानसरे, महेश उदावंत, ओंकार कासार, चंद्रकांत पानसंबळ, सोहम प्राजक्त तनपुरे, अनेक नगरसेवक आणि असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.

रात्री दहा नंतर पब,बार देखील बंद ठेवा: आम आदमी पार्टी

पुणे:
जवळपास ऐंशी लाख लोकसंख्येच्या पुणे शहर व परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे.गुनहेगारी रोखण्यासाठी रात्री दहा नंतर पब,बार, रेस्टॉरंट हाँटेल बंद ठेवण्याचा निर्णय पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी घेतला आहे. या निर्णयास पुणे शहर आम आदमी पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे.

आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांच्या नेतृत्वाखाली महासचिव सुभाष करांडे, महासचिव सुनील सवदी, सागर झा, मिलिंद सरोदे, अविनाश भाकरे, उमेश दीक्षित, अनिकेत शिंदे, महिला आघाडीच्या ज्योती जोगदंड आणि मनोज ओझा यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची पोलीस मुख्यालयात भेट घेऊन त्यांना हा निर्णय कायमस्वरूपी लागु करण्यात यावा असे साकडे घातले..
आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले,
कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी शहरात दोन आठवडे जमावबंदी जारी केली आहे.
याच बरोबर रात्री दहा नंतर सर्व पब, बार, रिसॉर्ट आदी बंद ठेवण्याची अमंलबजावणी सुरू केली. सिंहगड रोड,वारजे माळवाडी धायरी नऱ्हे, कात्रज आंबेगाव धनकवडी बिबवेवाडी हडपसर आदी ठिकाणी संघटित गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय आहेत. राजकीय वरदहस्तामुळे मध्यरात्री पासुन पहाटे पर्यंत गुन्हेगारी टोळ्या मद्यपान पार्टी करुन मुख्य रस्ते सोसायट्या लोकवस्त्यांत अशा सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालुन दहशत निर्माण करत आहेत. टोळी युध्दात अनेक गुन्हेगार ठार झाले आहेत त्यामुळे नागरिकांत प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे रात्री घरी परत जाणे तसेच घराबाहेर पडणे धोक्याचे झाले आहे. त्यामुळे रात्री दहा नंतर सर्व पब हाँटेल ,बार बंद ठेवण्याचा निर्णय समाजाच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा आहे.
यावेळी मिरवणुकांमुळे निर्माण होणारे ट्राफिक जॅम, रुग्णवाहिकांना होणारा अडथळा, ध्वनीप्रदूषण तसेच महिला, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास याबाबत पोलीस आयुक्तांना आम आदमी पक्षाच्या सविस्तर निवेदन देण्यात आले. नागरिकांच्या शांतता, सुरक्षितता आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

जनगणना कर्मचाऱ्यावर झालेली मारहाण म्हणजे शासन व्यवस्थेवर हल्ला – आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करा : आम आदमी पार्टी

पुणे : जनगणना कर्मचाऱ्यावर झालेली मारहाण म्हणजे शासन व्यवस्थेवर हल्ला असून आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई कराअशी मागणी आम आदमी पार्टीचे पुणे शहर महासचिव – सुभाष कारंडे तसेच निरंजन मधुकर अडागळे यांनी केली आहे.

त्यांनी म्हटले आहे कि ,’जनगणना करण्यासाठी अधिकृत शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचाऱ्यावर झालेली मारहाण ही केवळ एका व्यक्तीवरील हिंसा नसून संपूर्ण शासन व्यवस्थेवर केलेला भ्याड हल्ला आहे. कायद्याचा धाक संपला आहे का? असा प्रश्न आता सामान्य नागरिक विचारत आहेत.
देशाच्या महत्त्वाच्या प्रशासकीय प्रक्रियेसाठी घराघरात जाऊन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणे, धमकावणे आणि शासकीय कामात अडथळा निर्माण करणे हा गंभीर आणि अक्षम्य गुन्हा आहे. अशा प्रवृत्तींना राजकीय किंवा स्थानिक दबावाखाली संरक्षण मिळत असेल तर ते आणखी धोकादायक आहे.
आम आदमी पार्टीच्या वतीने संबंधित आरोपींवर कठोर कलमान्वये तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. तसेच या प्रकरणातील पोलिस व प्रशासनाच्या भूमिकेचीही चौकशी झाली पाहिजे.
जर शासकीय कर्मचारीच सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेची हमी कोण देणार? प्रशासनाने या घटनेकडे हलक्यात पाहू नये. दोषींना त्वरित अटक झाली पाहिजे

१३ जण सस्पेंड ,६४५ लिटर मिथेनॉल मिश्रीत गावठी दारु जप्त-राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

पुणे-दापोडी व हडपसर येथे घडलेल्या घटनेची वस्तुस्थिती व त्याअनुषंगाने केलेली उपाययोजना याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने मैती प्रसारी केली असून यात म्हटले आहे की,’
दि. २६/०५/२०२६ ते २८/०५/२०२६ दरम्यान संजयनगर, फुगेवाडी, दापोडी येथील काही व्यक्तींना विषबाधेसदृश लक्षणांमुळे विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. त्यापैकी ०५ व्यक्तींचा मृत्यू झाला. माहिती प्राप्त होताच राज्य उत्पादन शुल्क विभागाने तात्काळ अधिकाऱ्यांची पथके रुग्णालये व घटनास्थळी पाठवून माहिती संकलन व तपासाची कार्यवाही सुरू केली.
दापोडी पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र. ११४/२०२६ दाखल करण्यात आला असून तपासादरम्यान कर्नल सिंग बिरका व गुरुमंगतसिंग बिरका यांना अटक करण्यात आली. प्राथमिक तपासात मिथेनॉल मिश्रित गावठी दारू सेवनामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
हडपसर येथील पांढरेमळा परिसरातही अशाच प्रकारच्या घटनेत ०४ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली असून दोन्ही घटना परस्पर संबंधित असल्याचे तपासात दिसून आले.
तपासादरम्यान योगेश व्हानकडे उर्फ सिकंदर राठोड याने संबंधित आरोपींना प्रथमदर्शनी मिथेनॉल मिश्रीत विषारी गावठी दारूचा पुरवठा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी पोलीस विभागाच्या स्वाधीन केले. तसेच चौकशीत राधेश्याम उर्फ राजू प्रजापती याच्याकडून गावठी दारूचा पुरवठा होत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेऊन त्यालाही पोलीस विभागाच्या ताब्यात देण्यात आले.
मुख्य सुत्रधार योगेश व्हानकडे याच्या चौकशीतून प्रथमदर्शनी मिथेनॉल मिश्रीत गावठी दारु वितरीत झालेल्या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभागाद्वारे दि.२९/०५/२०२६ रोजी मध्यरात्री तात्काळ कारवाई करुन आकाश जाधव, पांढरेमळा, हडपसर याचेकडून ७० लि, इरफान कुरेशी, पवार वस्ती, दापोडी याचेकडून १५५ लि व आर्यन धोत्रे, वडारवाडी, गोखलेनगर याचेकडून ४२० लि. असा एकूण ६४५ लिटर प्रथमदर्शनी मिथेनॉल मिश्रीत गावठी दारु जप्त करण्यात आली असून संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आरोपो योगेश व्हानकडे विरुद्ध ०३, आकाश जाधव विरुद्ध ०४, कर्नेल सिंग विरका विरुद्ध ०१ व राधेश्याम प्रजापती विरुद्ध ०४ असे गुन्हे नोंद आहेत तसेच त्यांच्या विरुध्द प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव सक्षम प्राधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे.
संबंधित घटनेच्या पार्श्वभूमीवर कार्यक्षेत्रीय एकुण ९ अधिकारी व ४ कर्मचाऱ्यांना मा. आयुक्त यांच्या आदेशानुसार तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाद्वारे नियमितपणे विशेष मोहिमा राबवून सन २०२५-२०२६ या वर्षामध्ये एकुण ६४६२ इतके गुन्हे नोंद केले असून त्यामध्ये एकुण रु. २९.७४ कोटी इतका मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच एकुण ५ हातभट्टी व्यवसाय करणाऱ्या आरोपींविरुध्द एम.पी.डी.ए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आलेली आहे. घटनेच्या गांभीर्यता लक्षात घेता अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी व्यापक तपास व प्रतिबंधात्मक कारवाई सुरू असुन कार्यक्षेत्रामधील सर्व अधिकारी यांना सतर्क राहुन हातभट्टी निर्मिती, वाहतुक व बिक्री विरुध्द विशेष मोहिम राबवून संबंधितांबर कठोर कारवाई करण्यात येत आहे.