आज राज्यभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती दिवस उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्ताने मुंबईतील चैत्यभूमीवर आंबेडकरी अनुयायांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी सकाळी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तर दुसरीकडे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर आंबेडकर जयंतीनिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी आदर व्यक्त करताना तरुण पिढीला काही सल्ला देण्याचा प्रयत्न केला आहे. महापुरुषांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करताना केवळ मिरवणुका काढण्यापेक्षा त्यापेक्षा पुढे जाऊन त्यांच्या वारशाचा आणि विचारांचा विचार केला पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांचं या देशासाठी दिलेलं योगदान अतुलनीयच आहे आणि या देशाच्या येणाऱ्या पिढ्या त्याबद्दल त्यांच्या ऋणात राहतील. पण आज जागतिक आणि देशांतर्गत घटनांमुळे रुपया जेंव्हा कमकुवत होत आहे त्यावेळेस, ‘प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्युशन्स’ सारखा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहणारे, फक्त सामाजिक नाही तर अतिउत्तम आर्थिक समज असणारे बाबासाहेब आठवतात. ब्रिटिशांच्या धोरणांमुळे भारतीय रुपयाचं अवमूल्यन कसं झालं आणि त्याचा सामान्य भारतीयांच्या आयुष्यावर कसा खोल परिणाम झाला हे त्यांनी या ग्रंथात विशद केलं. यात त्यांनी मांडलेल्या सूचना या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेचा पाया आहेत. स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांना फक्त देशाला स्वातंत्र्य मिळायला हवं इतकीच आस नव्हती तर हे स्वातंत्र्य समाजाच्या तळापर्यंतच्या माणसाला लाभदायक झालं पाहिजे आणि त्याचा आर्थिक विकास देखील झाला पाहिजे. थोडक्यात सामाजिक दृष्टी आणि अर्थशास्त्राचा देखील त्यांचा उत्तम अभ्यास होता. बाबासाहेब हे त्या पिढीतले याबाबतीतले अग्रणी नेते. छत्रपती शिवाजी महाराज , बाबासाहेब आंबेडकर , महात्मा ज्योतीबा फुले , लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अशा कितीतरी महान नेत्यांचे नुसते पुतळे उभे करणे, त्यांना जातीत पातीत विभागणे , त्यांच्या नावाने जाती धर्मात फूट पाडणे , त्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश्य डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढणे या सारख्या गोष्टींमधून हे राज्य आणि राजकारणी बाहेर येतील तेव्हाच या महान लोकांना आपण श्रद्धांजली अर्पण करू शकतो ! नाहीतर ह्या महान व्यक्ती फक्त जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना हार घालण्यापूरतेच उरतात आणि त्यांचा वारसा, त्यांचे विचार आपण आत्ताच्या सत्तापूपीसू राजकारण्यांसाठी पायदळी तुडवत राहू ! विकास म्हणजे सरकारी मदत, उड्डाणपूल आणि रस्ते इतकी मर्यादित कल्पना आत्ताची सरकारं रुजवत असताना, या सगळ्या वरवरच्या विकासाचा यत्किंचित फायदा नसलेला खूप मोठा वर्ग भारतात आहे. आज प्रखर सामाजिक आणि आर्थिक भान असणाऱ्या बाबासाहेबांसारख्या महामानवाची, त्यांच्या समग्र दृष्टीची उणीव वारंवार भासत आहे !
बाबासाहेबांच्या स्मृतीस पुन्हा एकदा विनम्र अभिवादन. राज ठाकरे ।







