- अपघातप्रवण व तीव्र उताराच्या ठिकाणी सुविधा उभारण्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे मागणी
पुणे : देशातील राष्ट्रीय महामार्गांवर जड वाहनांच्या वाढत्या वाहतुकीमुळे होणाऱ्या गंभीर अपघातांना आळा घालण्यासाठी अपघातप्रवण तसेच तीव्र उताराच्या ठिकाणी ‘Runaway / Escape Ramp’ उभारण्यात यावेत, अशी मागणी भाजप पुणे शहर सरचिटणीस व पुणे महानगरपालिका नगरसेवक रविंद्र साळेगावकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणावर जड वाहनांची वाहतूक होत असते. प्रवासादरम्यान वाहनांचे अचानक ब्रेक निकामी होणे, तांत्रिक बिघाड होणे किंवा तीव्र उतारावर वाहनाचा वेग नियंत्रणाबाहेर जाणे अशा कारणांमुळे गंभीर अपघात घडण्याची शक्यता असते. अशा आपत्कालीन परिस्थितीत चालकाला वाहन मुख्य मार्गापासून सुरक्षितपणे बाजूला घेऊन नियंत्रित पद्धतीने थांबविण्यासाठी ‘Runaway / Escape Ramp’ महत्त्वाची सुरक्षा सुविधा ठरू शकते, असे साळेगावकर यांनी म्हटले आहे.विशेषतः पुणे परिसरातील काही अपघातप्रवण ठिकाणी ब्रेक निकामी झालेली किंवा उतारावरून वेगाने येणारी जड वाहने तसेच वाहतूक कोंडी यामुळे गंभीर अपघात घडत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा ठिकाणांची तांत्रिक पाहणी करून आवश्यकतेनुसार एस्केप रॅम्पची सुविधा उभारणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.देशातील राष्ट्रीय महामार्गांचे सुरक्षा ऑडिट आणि तांत्रिक सर्वेक्षण करून अपघातप्रवण तसेच तीव्र उतार असलेली ठिकाणे निश्चित करावीत. त्यानंतर गरजेनुसार त्या ठिकाणी ‘Runaway / Escape Ramp’ उभारण्यासाठी केंद्र सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी साळेगावकर यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे केली आहे.या सुविधेमुळे ब्रेक निकामी झालेल्या किंवा तांत्रिक बिघाड झालेल्या जड वाहनांना सुरक्षितपणे थांबविण्यास मदत होऊ शकते. परिणामी गंभीर अपघातांचा धोका कमी करून वाहनचालक, प्रवासी आणि इतर नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.“नागरिकांच्या जीविताची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता असून, राष्ट्रीय महामार्गांवरील अपघात कमी करण्यासाठी आधुनिक आणि प्रभावी सुरक्षा उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. Runaway / Escape Ramp ही त्यासाठी महत्त्वाची सुविधा ठरू शकते,” असे रविंद्र साळेगावकर यांनी सांगितले.

