‘मागील १२ वर्षांपासून लाल किल्ल्यावरून खोटी आश्वासने; आधीच्या घोषणांचे काय झाले?’ काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा सवाल
मुंबई : देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला; मात्र स्वातंत्र्य चळवळीत ज्यांचा कोणताही सहभाग नव्हता, त्याच विचारांच्या शक्ती आज केंद्र आणि राज्यात सत्तेवर आहेत, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. या शक्ती संविधान मानत नाहीत आणि राष्ट्रध्वज तिरंग्यालाही अनेक वर्षे विरोध करत होत्या, असा आरोप करत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर निशाणा साधला.
प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवन मुख्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश सरचिटणीस गुरुचरणसिंग बच्छर, राजन भोसले, राजेश शर्मा, धनंजय शिंदे, श्रद्धा ठाकूर, जोजो थॉमस यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सपकाळ म्हणाले की, स्वातंत्र्य चळवळीत सहभाग नसल्याबद्दल संबंधित शक्तींनी देशाची माफी मागावी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संविधान स्वीकारावे, संघाची नोंदणी करावी आणि संघाला मिळणाऱ्या देणग्यांचा हिशोब देशासमोर मांडावा, अशी मागणीही त्यांनी केली.
राहुल गांधींच्या लढ्याचा उल्लेख
देशात संविधान आणि लोकशाहीच्या मूल्यांना धक्का दिला जात असल्याचा आरोप करत सपकाळ यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भूमिकेचे समर्थन केले. संविधानाला अभिप्रेत भारत घडविण्यासाठी राहुल गांधी संघर्ष करत असून विशेषतः तरुणांमध्ये त्यांच्या नेतृत्वाबद्दल विश्वास वाढत असल्याचा दावा त्यांनी केला.
राहुल गांधी यांना विविध प्रकारे त्रास देण्याचा आणि बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, तरी त्यांनी आपली भूमिका सोडलेली नाही, असे सपकाळ म्हणाले. त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या लढ्यात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
‘जात-धर्माच्या नावावर भेदभाव शोभणारा नाही’
स्वातंत्र्याच्या ८० वर्षांनंतरही देशात जात आणि धर्माच्या नावावर भेदभाव होत असल्याबद्दल सपकाळ यांनी चिंता व्यक्त केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या रॅलीनंतर झालेल्या कथित ‘शुद्धीकरणा’चा उल्लेख करत त्यांनी संबंधितांवर अद्याप कारवाई झाली नसल्याचा आरोप केला.
देशात जातीय आणि धार्मिक वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत, अशा राजकारणाला काँग्रेस विरोध करेल, असे त्यांनी सांगितले.
गावपातळीपर्यंत काँग्रेस संघटन बांधणी
चालू वर्ष काँग्रेससाठी संघटन बांधणीचे वर्ष असल्याचे सांगत सपकाळ यांनी राज्यभर ग्रामशाखा स्थापन करणे तसेच मंडळ, ब्लॉक, प्रभाग आणि वॉर्ड अध्यक्षांच्या नियुक्त्या पूर्ण करण्याचा संकल्प असल्याचे सांगितले.
‘लाल किल्ल्यावरून केलेल्या जुन्या घोषणांचे काय झाले?’
पंतप्रधानांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना सपकाळ यांनी मागील १२ वर्षांत करण्यात आलेल्या घोषणांची अंमलबजावणी कितपत झाली, याचा हिशोब सरकारने द्यावा, अशी मागणी केली.
“आज पुन्हा तरुण पिढीला डोळ्यासमोर ठेवून घोषणा करण्यात आल्या; पण मागील १२ वर्षांत दिलेल्या आश्वासनांचे काय झाले?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महिला आरक्षणाबाबत बोलताना, महिला आरक्षणाला काँग्रेसचा पूर्वीपासून पाठिंबा असून २०२३ मध्ये संसदेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले, मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही, असे सपकाळ म्हणाले. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर जनतेची दिशाभूल करू नये, अशी मागणीही त्यांनी केली.

