‘गांधी विचार हा राष्ट्रीय एकात्मतेचा विचार’चा संदेश;अहिंसा, सामाजिक सलोख्याच्या घोषणांनी परिसर दुमदुमला
पुणे, दि. २ : महात्मा गांधी जयंती आणि जागतिक अहिंसा दिनानिमित्त महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल महाराष्ट्र यांच्या वतीने गुरुवारी डेक्कन येथील मक्केशाह मस्जिद व पांचाळेश्वर मंदिर ते कोथरूड येथील गांधी भवन दरम्यान शांती मार्च काढण्यात आला. या मार्चमध्ये विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षक तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले. तिरंगा आणि गांधी विचारांचे फलक हातात घेतलेल्या तरुण-तरुणींनी दिलेल्या घोषणांमुळे परिसर दुमदुमून गेला.
शांती मार्चच्या प्रारंभी ‘शिवराय ढोल-ताशा पथका’च्या वादकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत ढोल-ताशांच्या गजरात मानवंदना दिली. त्यानंतर मार्चला सुरुवात झाली. महात्मा गांधी यांच्या वेशभूषेतील नीलकंठ लिगाडे, सोहम खांगटे आणि पुंडलिक शेळके यांनी लक्ष वेधून घेतले. नागरिकांनी त्यांच्यासोबत सेल्फीही घेतले.
‘हम सब एक हैं’, ‘महात्मा गांधी अमर रहे’, ‘गांधींचा विचार, राष्ट्रीय एकात्मतेचा विचार’, ‘गोली नही, बोली चाहिये’, ‘नफरत छोडो, भारत जोडो’, ‘युद्ध नको, बुद्ध हवा’, ‘दंगलमुक्त समाजासाठी, दंगलमुक्त पुण्यासाठी’ आणि ‘प्रांतभेद छोडो, भारत जोडो’ अशा घोषणांतून विद्यार्थ्यांनी शांतता, अहिंसा आणि सामाजिक सलोख्याचा संदेश दिला. महर्षी कर्वे पुतळ्याजवळ श्रीमंत गर्जना ढोल-ताशा पथकाने वादन करून सहभागींचा उत्साह वाढविला. गांधी भवन येथे दोन्ही ढोल-ताशा पथकांनी वादन करत मार्चचे स्वागत केले.
यावेळी भारती विद्यापीठ महाविद्यालय, आबेदा इनामदार महाविद्यालय, विश्र्वशांती एमआयटी विद्यापीठ, जाधवर महाविद्यालय, एसएनडीटी महाविद्यालय, आझम कॅम्पस एमसीएस महाविद्यालय, सर्वोदय, माहेर संस्था तसेच युवक क्रांती दलातील विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते.
गांधी भवन येथे झालेल्या कार्यक्रमात शुभांगी मुळे व सहकलाकारांनी प्रार्थना आणि भजने सादर केली. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष तथा भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, विश्वस्त सचीव अन्वर राजन, सीए एम. एस. जाधव, प्रवीण सप्तर्षी, रमेश आढाव, जांबुवंत मनोहर, ॲड. गोपाल गुणाले, श्रीराम टेकाळे, आप्पा अनारसे, तेजस भालेराव, सूरज कुलकर्णी, सचिन चौहान, रवींद्र धनक, कमलाकर शेटे, हर्षवर्धन जाधव, जयदीप भालेराव, ॲड. स्वप्निल तोंडे आदी उपस्थित होते.
गांधी विचार पुढे नेणे ही जबाबदारी – कदम
डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, ‘‘गेल्या १५ वर्षांपासून गांधी सप्ताहाचे आयोजन केले जात असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गांधी अजरामर असून त्यांचे विचार पुढे नेणे आवश्यक आहे. सर्वसामान्य माणूस ते राष्ट्रपिता हा त्यांचा प्रवास समजून घेणे गरजेचे आहे. तरुणांमधील ऊर्जा योग्य दिशेने वळविणे आवश्यक असून विद्यार्थ्यांनी स्वतःचे नेतृत्व सिद्ध करावे.’’
भारती विद्यापीठाचा विद्यार्थी श्रीनिवास गवरे म्हणाला, ‘‘शांतीयात्रेचा उद्देश समाजात जागृती निर्माण करणे हा आहे. गांधींच्या विचारांचा केंद्रबिंदू आचार आणि विचारांवर नियंत्रण ठेवणे हा होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्याचे चारित्र्यहनन करणे सोपे आहे; मात्र चारित्र्य घडविणे महत्त्वाचे आहे. तांत्रिक प्रगतीसोबत नैतिक प्रगल्भताही आवश्यक आहे.’’
विद्यार्थिनी अनिका रावत म्हणाली, ‘‘गांधी केवळ २ ऑक्टोबरला आठवण्याची व्यक्ती नाहीत. वर्षातील प्रत्येक दिवशी त्यांच्या विचारांचे आचरण करण्याची गरज आहे.’’
‘सत्याग्रही’ मासिकाच्या वाटचालीबाबत अभय देशपांडे यांनी सांगितले की, डॉ. कुमार सप्तर्षी यांनी गेली ३५ वर्षे हे मासिक चालविले. गांधी विचारांचा प्रसार करण्यासाठी हे मासिक पुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे.
अन्वर राजन म्हणाले, ‘‘महात्मा गांधी आणि जेन-झीं यांच्यात पूल निर्माण करणे हे आमचे काम आहे. अन्यायाचा प्रतिकार करण्याची गांधींची भूमिका होती. समाजात जात-धर्माच्या आधारावर द्वेष निर्माण करण्याच्या प्रयत्नांपासून समाजाला दूर ठेवून एकसंध वाटचालीवर भर देत आहोत.’’ पुण्यातील विविध महाविद्यालयांत गांधी दर्शन शिबिरे घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अखेरीस प्रतिकात्मक गांधी नीलकंठ लिगाडे यांनी जातीयता निर्मूलनाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भाष्य करणारी कविता सादर केली. सूत्रसंचालन अभय देशपांडे आणि सूरज कुलकर्णी यांनी केले.

