एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचा प्रवाशांचा दावा; एअरलाइनकडून ‘ऑपरेशनल कारणांमुळे’ वेळापत्रक बदलल्याची माहिती
नवी दिल्ली : थायलंडची राजधानी बँकॉक येथे तब्बल 28 तासांहून अधिक काळ अडकलेल्या सुमारे 200 भारतीय प्रवाशांना घेऊन एअर इंडियाचे विमान शनिवारी सकाळी दिल्लीत दाखल झाले. गुरुवारी रात्रीपासून विमानतळ आणि हॉटेलदरम्यान प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना अखेर शुक्रवारी रात्री दिल्लीसाठी रवाना करण्यात आले.
प्रवाशांच्या माहितीनुसार, बँकॉकहून दिल्लीला येणारे विमान गुरुवारी उड्डाणासाठी धावपट्टीपर्यंत गेले होते. मात्र काही वेळाने ते पुन्हा परत आणण्यात आले. याबाबत विचारणा केल्यानंतर केबिन क्रूकडून विमानात तांत्रिक समस्या असल्याचे सांगण्यात आल्याचा प्रवाशांचा दावा आहे.
प्रवाशांना सुरुवातीला रात्री उशिरा विमान पुन्हा उड्डाण करेल असे सांगण्यात आले. मात्र नंतर उड्डाण पुढील दिवसापर्यंत रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर एअर इंडियाने प्रवाशांसाठी हॉटेलची व्यवस्था केली.
दुसऱ्या दिवशीही उड्डाणाला विलंब
शुक्रवारी प्रवाशांना पुन्हा विमानतळावर बोलावण्यात आले. एअर इंडियाकडून AI4335 हे विमान संध्याकाळी 7.15 वाजता दिल्लीसाठी रवाना होणार असल्याचे कळविण्यात आले होते. मात्र नियोजित वेळेत विमान उड्डाण करू शकले नाही.
रात्री सुमारे 8 वाजता बोर्डिंग सुरू झाले आणि सुमारे अडीच तासांच्या प्रतीक्षेनंतर रात्री 10.30 च्या सुमारास विमान दिल्लीसाठी रवाना झाल्याचे प्रवाशांनी सांगितले. काही प्रवासी त्यापूर्वीच अन्य विमानांद्वारे भारतात परतले होते.
इंदूरच्या प्रवासी दिव्या माहेश्वरी यांनी सांगितले की, त्या थायलंडला पर्यटनासाठी गेल्या होत्या. परतीच्या प्रवासात विमान धावपट्टीवर गेल्यानंतर अचानक परतल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला.
महिला आणि लहान मुलांची गैरसोय
दीर्घ प्रतीक्षेमुळे महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ प्रवाशांना मोठी गैरसोय सहन करावी लागल्याचे प्रवाशांनी म्हटले आहे. विमानाच्या वेळेबाबत वारंवार बदलणारी माहिती मिळत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी होती.
वेळेवर पर्यायी विमानाची व्यवस्था झाली नाही तसेच उड्डाणाबाबत स्पष्ट माहिती मिळत नसल्याची तक्रारही काही प्रवाशांनी केली.
एअरलाइन म्हणते ‘ऑपरेशनल कारणे’
दरम्यान, एअर इंडियाने प्रवाशांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये विमानाच्या वेळापत्रकात ‘ऑपरेशनल कारणांमुळे’ बदल झाल्याचे नमूद केले होते. मात्र विमान धावपट्टीवरून परत आल्यानंतर क्रू सदस्यांनी तांत्रिक बिघाडाचे कारण सांगितल्याचा प्रवाशांचा दावा आहे.
अखेर जवळपास दीड दिवसाच्या प्रतीक्षेनंतर भारतीय प्रवाशांना घेऊन विमान दिल्लीला पोहोचल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.

