जोगेश्वरीतील ‘लँडमार्क कार्स’मध्ये मुंबईतील सर्वात मोठे लक्झरी सर्व्हिस सेंटर; ७ वर्षांपेक्षा जुन्या गाड्यांसाठी ‘Service Select’ योजना
मुंबई : मर्सिडीज-बेंझ इंडियाने ग्राहकांचा लक्झरी कार मालकीचा अनुभव अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी नवीन सर्व्हिस उपक्रमांची घोषणा केली आहे. मुंबईतील जोगेश्वरी येथील ‘लँडमार्क कार्स’ सर्व्हिस सेंटरमध्ये कंपनीने भारतातील पहिला AI-संचालित ऑटोमेटेड ‘वेहिकल स्कॅनर’ सुरू केला असून, याचबरोबर ७ वर्षांपेक्षा जुन्या मर्सिडीज-बेंझ कार्सच्या देखभालीचा खर्च कमी करण्यासाठी ‘Service Select’ योजना जाहीर केली आहे.
हा AI-आधारित स्कॅनर वाहन चालू असतानाच त्याचा ३६० अंशांचा डिजिटल रेकॉर्ड तयार करतो. हाय-रिझोल्युशन कॅमेऱ्यांच्या मदतीने गाडीच्या बाहेरील भागावरील स्क्रॅच, नुकसान तसेच टायरची स्थिती तपासली जाते. ही माहिती थेट डिजिटल रिपोर्टमध्ये उपलब्ध होत असल्याने ग्राहकांना वाहनाची स्थिती तत्काळ पाहता येते आणि सर्व्हिस प्रक्रियेत वेळेची बचत होते.
मर्सिडीज-बेंझच्या माहितीनुसार, अशा प्रकारचे वेहिकल स्कॅनर जर्मनी, इटली, कोरिया, नेदरलँड्स, स्वित्झर्लंड आणि तुर्की यांसारख्या देशांत आधीपासून वापरात आहेत. भारतात कार कंपनीकडून अशा प्रकारच्या AI-संचालित ऑटोमेटेड स्कॅनरची ही पहिलीच सुरुवात असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
५८ हजार चौरस फुटांत सर्व्हिस सेंटर
जोगेश्वरीतील नव्या ‘लँडमार्क कार्स’ 2S लक्झरी सर्व्हिस सेंटरचे क्षेत्रफळ सुमारे ५८ हजार चौरस फूट आहे. अवघ्या सहा महिन्यांत उभारण्यात आलेल्या या केंद्रात नियमित देखभाल आणि दुरुस्तीसाठी १६ बे, बॉडी व पेंटसाठी ९ बे आणि इतर कामांसाठी ९ सपोर्टिंग बे उपलब्ध आहेत. स्पेअर पार्ट्ससाठी सुमारे ६ हजार चौरस फुटांचे स्वतंत्र क्षेत्र असून सुमारे ९५ प्रशिक्षित तज्ज्ञांची टीम येथे कार्यरत आहे.
मुंबईतील हे मर्सिडीज-बेंझचे १४ वे लक्झरी सेंटर असून कंपनीने ते शहरातील सर्वात मोठे लक्झरी सर्व्हिस सेंटर असल्याचे म्हटले आहे.
जुन्या मर्सिडीजच्या देखभालीत २५ टक्क्यांपर्यंत बचत
‘Service Select’ ही योजना सात वर्षांपेक्षा जुन्या मर्सिडीज-बेंझ वाहनांसाठी असून निवडक पार्ट्सवर २५ टक्क्यांपर्यंत बचत, बदललेल्या पार्ट्सवर दोन वर्षांची वॉरंटी तसेच ‘Mobilio Lite’चे फायदे देण्यात येणार आहेत. अधिकृत देखभाल केल्याने वाहनाची पुनर्विक्री किंमत टिकवून ठेवण्यासही मदत होईल, असा कंपनीचा दावा आहे.
मर्सिडीज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ संतोष अय्यर यांनी कंपनी विक्रीनंतरच्या सेवेत AI आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करत असल्याचे सांगितले. नवीन स्कॅनरमुळे सर्व्हिस प्रक्रियेत पारदर्शकता, विश्वास आणि वेग वाढेल, तर ‘Service Select’मुळे जुन्या वाहनांच्या देखभालीचा खर्च कमी करण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.
देशभरात ९० हून अधिक सर्व्हिस टचपॉइंट्स
कंपनीच्या माहितीनुसार, भारतात मर्सिडीज-बेंझचे ९० पेक्षा अधिक सर्व्हिस टचपॉइंट्स, १२०० पेक्षा अधिक सर्व्हिस बे आणि ४२०० पेक्षा अधिक कर्मचारी आहेत. वर्षअखेरीपर्यंत आणखी २० ‘MAR 20X’ टचपॉइंट्स वाढविण्याची योजना असून फ्रेंचायझी पार्टनर्सकडून पुढील विस्तारासाठी ४५० कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे

