पुणे : धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण आपल्या ध्येयामागे धावत असतो; मात्र या धावपळीतून वेळ काढून समाजासाठी विधायक कार्य करणारे हाताची बोटावर मोजण्याइतकेच असतात. कोणाकडून कौतुकाची अपेक्षा न ठेवता केलेल्या कार्याचे समाधान वेगळे असते. आपल्या कार्याची दखल कोणी घेतली नाही तरी परमेश्वर ते पाहत असतो, अशी भावना मनात ठेवून काम करत राहिले पाहिजे, असे मत राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.
अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट तर्फे मंडईतील बुरूड आळी येथे म्हसोबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये शिवनाद नृत्य महोत्सवांतर्गत नृत्य वैभव पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव आदी उपस्थित होते.
नृत्य वैभव पुरस्कार सुप्रसिद्ध नृत्यांगना मानसी नाईक यांना प्रदान करण्यात आला. तर, युवा नृत्य वैभव पुरस्कार कथकमध्ये मनीषा नृत्यालयाच्या वल्लरी आपटे, भरतनाट्यम मध्ये स्वरदा नृत्य संस्थेच्या स्वरदा भावे, ओडिसी प्रकारात आकांक्षा ओडिसी नृत्यालयाच्या रसिका गुमास्ते, सत्रिय प्रकारात आदी स्कूल आॅफ डान्सच्या डॉ.देविका बोरठाकूर आणि भरतनाट्यममध्ये नटरंग अकॅडमीच्या प्रणव कडेकर यांना प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, महावस्त्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
दत्तात्रय भरणे म्हणाले, मी मंत्री असलो तरी शेतकऱ्यांना आपल्या कामातून जास्तीत जास्त मदत कशी करता येईल, यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतो. हे विधायक कार्य करताना आपले मार्गदर्शक स्वर्गीय अजितदादा यांची प्रकर्षाने आठवण येते. माणूस मोठा असो वा लहान, नेहमी सत्याची बाजू घेणारा तो खरा नेता होता. अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात असतात; मंत्री म्हणून काम करताना मलाही त्या आहेत. मात्र हार न मानता अडचणींवर मात करून पुढे जाणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. मानसी नाईक यांनी देखील मनोगत व्यक्त केले. शिवनाद नृत्य महोत्सवात पुण्यातील प्रख्यात कलाकारांनी शास्त्रीय नृत्याची अभिजात कला सादर केली.
वेंकीज उद्योग समूहाचे संचालक बालाजी राव आणि माणिकचंद उद्योग समूहाचे चेअरमन प्रकाश धारीवाल यांचे उत्सवाला विशेष मार्गदर्शन मिळाले आहे. उत्सवात ५ दिवस अन्नदान सेवा, सकाळी रुद्राभिषेक व रुद्रयाग आणि दुपारी शहर व जिल्ह्यातील भजनी मंडळाची सेवा तसेच ढोल ताशा वादन देखील होणार आहे. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

