लग्नात ४५ लाखांचा खर्च, १० तोळे सोने दिल्याचा कुटुंबीयांचा दावा; कारसाठी आणखी ५ लाखांची मागणी केल्याचा आरोप
पुणे : ज्या पुण्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, त्याच पुण्यात हुंड्याच्या छळामुळे एका उच्चशिक्षित नवविवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना उंड्री परिसरात समोर आली आहे. वैष्णवी जरांडे (वय २३) असे मृत तरुणीचे नाव असून, सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
वैष्णवी ही बंगळुरूतील एका नामांकित आयटी कंपनीत कार्यरत होती. तिचा विवाह ९ मे २०२६ रोजी ओंकार संजय घिसरे याच्याशी झाला होता. विवाहावेळी मुलीच्या आई-वडिलांनी सुमारे ४५ लाख रुपये खर्च करून १० तोळे सोने दिल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
विवाहानंतर वैष्णवी पुण्यातून ‘वर्क फ्रॉम होम’ करत होती. मात्र नवीन कार खरेदी करण्यासाठी माहेरहून आणखी ५ लाख रुपये आणावेत, यासाठी तिच्यावर सातत्याने दबाव टाकण्यात येत होता आणि मानसिक तसेच शारीरिक छळ केला जात होता, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
रात्री आईला केला रडत फोन
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, २४ सप्टेंबर रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास वैष्णवीने तिच्या आईला फोन केला. ती रडत होती आणि सासरच्या त्रासाबद्दल सांगत होती.
यानंतर सुमारे दोन तासांनी, रात्री साडेअकराच्या सुमारास वैष्णवीच्या पतीने तिच्या माहेरी फोन करून, “तुमच्या मुलीला ताबडतोब घरी घेऊन जा, नाहीतर माझ्या हातून काहीतरी बरेवाईट घडेल,” असे म्हटल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
पहाटे मुलीचा मृतदेह आढळला
फोननंतर घाबरलेल्या वैष्णवीच्या आई-वडिलांनी रात्रीच पुण्याच्या दिशेने प्रवास सुरू केला. पहाटे उंड्री येथील घरी पोहोचल्यानंतर त्यांना वैष्णवीचा मृतदेह आढळला.
सासरच्या मंडळींनी वैष्णवीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले. मात्र तिच्या मृत्यूबाबत कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला असून, ही आत्महत्या नसून घातपात असू शकतो, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
सासरच्यांविरोधात गुन्हा
वैष्णवीच्या आई-वडिलांच्या फिर्यादीवरून तिच्या सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुंड्याची मागणी, मानसिक आणि शारीरिक छळ तसेच वैष्णवीच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती याचा पोलीस तपास करत आहेत.
या घटनेमुळे पुन्हा एकदा उच्चशिक्षित कुटुंबांमध्येही हुंडा, आर्थिक अपेक्षा आणि वैवाहिक छळाचा प्रश्न किती गंभीर आहे, याकडे लक्ष वेधले गेले आहे.

