दिल्लीतील आंदोलनाला पाठीम्ब्यासाठी घेतली होती सभा
मुंबई-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर आयोजित केलेल्या आंदोलनानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आंदोलनाच्या आयोजनात नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, या तिन्ही प्रकरणांमध्ये अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हे आंदोलन पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा तसेच विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर आयोजित करण्यात आले होते. सभेनंतर मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि आंदोलक मैदानातच थांबल्याने पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठी धावपळ करावी लागली.
पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये तीन वेगवेगळ्या कारणांचा समावेश आहे. पहिला गुन्हा विनापरवानगी सभा आणि आंदोलनाचे आयोजन केल्याप्रकरणी नोंदवण्यात आला आहे. दुसरा गुन्हा अधिकृत परवानगी नसतानाही मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिकांना आंदोलनस्थळी जमण्याचे आवाहन केल्याप्रकरणी दाखल करण्यात आला आहे.
तिसरा गुन्हा सभेनंतरही दादर परिसरात विविध ठिकाणी आंदोलन सुरू राहिल्याने आणि त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर गंभीर परिणाम झाल्याने दाखल करण्यात आला आहे. आंदोलनामुळे दादर परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचा पोलिसांचा दावा आहे.
शिवाजी पार्कावरील सभेला मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. सभा संपल्यानंतरही अनेक आंदोलक मैदान रिकामे करण्यास तयार नसल्याने पोलिसांनी वारंवार आवाहन केले. परिस्थिती हाताळण्यासाठी दंगल नियंत्रण पथकालाही पाचारण करण्यात आले होते. काही ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचेही समोर आले.
सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “सरकार पाकिस्तानशी चर्चा करण्याची तयारी दाखवते, मग सोनम वांगचुक यांच्याशी संवाद का साधू शकत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच त्यांनी सरकारवर बेरोजगारी, शिक्षण आणि तरुणांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, “हे सरकार रोजगार देत नाही, शिक्षण देत नाही. त्यामुळे हे सरकार बदललेच पाहिजे. कार्यकर्त्यांनी आता नेतृत्वाची जबाबदारी घ्यावी,” असे आवाहन केले.
सोनम वांगचुक यांच्या कार्याचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले की, “लडाखमध्ये पाण्याच्या समस्येवर उपाय म्हणून कृत्रिम हिमनद्या तयार करणारे आणि सीमावर्ती भागातील सैनिकांसाठी सौरऊर्जेवर आधारित सुविधा उभारणारे सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवले जात आहे, ही दुर्दैवी बाब आहे.”
दरम्यान, या आंदोलनाप्रकरणी नोंदवलेल्या तीन गुन्ह्यांबाबत पुढील तपास शिवाजी पार्क पोलीस करत असून, तपासाच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

