छत्रपती संभाजीनगर-दिल्ली ते छत्रपती संभाजीनगर विमान प्रवासादरम्यान खासगी कंपनीतील व्यवस्थापकाने समोरच्या सीटवर बसलेल्या महिला डाॅक्टरचा विनयभंग केला. हा प्रकार सोमवारी (२ सप्टेंबर) सायंकाळी सव्वासहा ते साडेसहादरम्यान घडला. आरोपीने प्रवासादरम्यान ६ वेळा या महिलेशी गैरवर्तन केले. संभाजीनगरमध्ये विमान उतरताच या महिलेने या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दिली. आसिफ खान अन्वर अहमद (३९, रा. बारी कॉलनी, कटकट गेट) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याची ५ तास चौकशी केली, नंतर नोटीस बजावून सोडून दिले.
शहरातील एक महिला डॉक्टर ग्रुपसोबत दिल्ली येथे फिरायला गेली होती. तिच्यासोबत पतीही होता. दिल्लीहून ते छत्रपती संभाजीनगरकडे इंडिगो विमानाने प्रवास करीत होते. महिला डॉक्टर पुढच्या सीटवर, आरोपी मॅनेजर मागच्या सीटवर बसलेला होता. त्याने डॉक्टर महिलेचा शर्टशी छेडछाडीचा प्रयत्न केला. शरीराला स्पर्श करून आक्षेपार्ह वर्तन केले. हा प्रकार लक्षात येताच महिलेने त्याला झिडकारले, तरीही ६ वेळा त्याने असा प्रकार केला. महिलेने हा प्रकार पतीला सांगितला.
संभाजीनगर विमानतळावर विमान उतरताच त्यांनी विमानतळ प्रशासनाला या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर तेथील अधिकाऱ्यांनी ११२ क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी फिर्यादी व आरोपीला सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात नेले. तेथे महिलेने तक्रार दिली. त्यानंतर रात्री ११ पर्यंत आरोपीची पोलिसांनी चौकशी केली. या प्रकरणी आरोपीला नोटीस बजावून सोडून देण्यात आले. पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक राधा लाटे यांच्याकडे सोपविला आहे.