पुणे : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आहिल्याबाई होळकर, झाशीची राणी यांसारख्या महिलांनी आपल्या कतृर्त्त्वाने देशासाठी मोठे योगदान दिले. आजच्या काळातही असे काम करणाऱ्या महिलांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. बालविकास व महिला सक्षमीकरणासाठी केवळ प्रशासन पुरेसे नाही. त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेऊन योगदान द्यायला हवे. प्रत्येकाने आपापल्या क्षमतेनुसार महिला, लहान मुले, पर्यावरण, सामाजिक क्षेत्रात काही ना काही चांगले काम करायला हवे, असे प्रतिपादन दिव्यज फाउंडेशनच्या संस्थापिका अमृता देवेंद्र फडणवीस यांनी केले.ग्रॅव्हिट्स फाउंडेशन आयोजित ऊर्जा पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल जेडब्ल्यू मॅरियट येथे आयोजित कार्यक्रमावेळी ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या संस्थापिका उषा काकडे, डॉ. शां. ब मुजुमदार, सिम्बायोसिस अभिमत विद्यापीठाच्या कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, लोकमंगल फाऊंडेशनचे विश्वस्त रोहन देशमुख, प्रसिद्ध क्रिकेटपटू तिलक वर्मा, प्रसिद्ध अभिनेते चंकी पांडे, तेलगु चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक व्यंकटेश (व्यंकी) कुडुमुला आदी उपस्थित होते.शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांना यंदाचा ‘उर्जा जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संजय गुप्ते (विशेष आरोग्यसेवा), कायनेटिक ग्रीन एनर्जीच्या संस्थापिका सुलज्जा फिरोदिया मोटवानी (उद्योजकता), भारतीय क्रिकेटपटू तिलक वर्मा (क्रीडा), लोकसाहित्य आणि सत्यशोधक चळवळीचे व्यासंगी अभ्यासक प्रा. डॉ. विश्वनाथ शिंदे (साहित्यसेवा), सोलापूर येथील जिव्हाळा मतिमंद संस्थेचे प्रमुख अण्णाराव भिमशंकर राजमाने (शिक्षण व समाजसेवा) यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. याबरोबरच उरी हल्ल्यातील शहीद जवान अर्जुन जाधव यांच्या स्मरणार्थ वीरपत्नी सायली अर्जुन जाधव व त्यांच्या आई वडीलांनाही शौर्य पुरस्काराने विशेष सन्मानित करण्यात आले. माळशिरस दुर्घटनेतील पाच जणांचा जीव वाचवणाऱ्या तांदुळवाडी येथील इरफान मुजावर यांना मानवतावादी पुरस्कार दिला. सन्मानचिन्ह, शाल, तुळशीचे रोप असे या पुरस्काराचे स्वरुप होते.अमृता देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाल्या, “भारत हा केवळ जमिनीचा तुकडा नाही, तर तो एक राष्ट्रपुरुष आहे. कारण युद्धात बलिदान देणारे, शिक्षण, आरोग्य, सामाजिक काम, क्रीडा अशा सर्व क्षेत्रात काम करणारे दिग्गज व्यक्ती आपल्याकडे आहेत. त्यांचा सन्मान व्हायला हवा. या लोकांच्या कामामुळे देशाची ओळख निर्माण होत असते.”डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, “महिला सक्षमीकरण आणि बालविकास ही दोन्ही क्षेत्र समाज आणि शासनाकडून दुर्लक्षित असून, त्यात मोठे काम होणे गरजेचे आहे. उषा काकडे यांच्यासारख्या व्यक्ती अशाप्रकारचे काम करतात ही कौतुकाची बाब आहे. ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या माध्यमातून महिला आणि बालकांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेल्या भरीव कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करावे.”प्रास्ताविकात उषा काकडे यांनी ग्रॅव्हिट्सच्या कार्याविषयी माहिती देताना सांगितले की, “समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वाचा सन्मान करून चांगल्या कामाला ऊर्जा देण्याचा प्रयत्न आहे. लैंगिक अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी फाउंडेशन गुड टच बॅड टच विषयात काम करत आहे. आजवर सहा लाख विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचला आहे. पालकांनी मुलांना वेळ देणे, संवाद साधणे तसेच मुलींना ताकद देणे आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे. सामाजिक काम ही चळवळ असून त्यामध्ये समाजातील सर्व घटकांनी जागरुक असायला हवे.”डॉ. विद्या येरवडेकर यांनी ग्रॅव्हिट्स फाउंडेशन व उषा काकडे यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. उषाताईंचा प्रवास सुरुवातीपासून पाहिला असून, एक आई ते एक उद्योजक, सामाजिक कार्यकर्ती अशा विविध क्षेत्रात आज त्यांनी स्वत:ला सिद्ध केले आहे. समाजासाठी योगदान देणाऱ्या लोकांना ऊर्जा देण्याचे काम त्या करीत आहेत, असे डॉ. येरवडेकर यांनी सांगितले.डॉ. संजय गुप्ते यांनी आपले गुरु डॉ. मुजुमदार यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना अभिमान वाटत असल्याचे नमूद केले. ग्रॅव्हिट्स फाउंडेशनने गुड टच बॅड टच या उपक्रमासह कर्करोग जागृतीसाठी काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. ए. बी. राजमाने यांनी मतिमंद मुलांसाठी काम करताना येणाऱ्या अडचणीविषयी सांगताना त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज बोलून दाखवली.डॉ. विश्वनाथ शिंदे यांनी लोककला व लोकसाहित्याचे जतन होण्यासह लोककलावंतांचा सन्मान व्हायला हवा, असे सांगितले. तिलक वर्मा याने भारताचे प्रतिनिधित्व करणे आनंदाची गोष्ट असून, लाखो भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन असा विश्वास व्यक्त केला.व्यंकी कुडूमुला, चंकी पांडे, रोहन देशमुख, इरफान मुजावर यांनीही मनोगत व्यक्त केले. शहीद अर्जुन जाधव यांच्या कुटुंबीयांचा सन्मान होताना संपूर्ण सभागृह भावूक झाले. लीना सलढाणा-जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आराध्या काकडे हिने आभार मानले.
बालविकास,महिला सक्षमीकरणात प्रत्येकाचे योगदान गरजेचे-अमृता देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन; ग्रॅव्हिट्स फाउंडेशनतर्फे ऊर्जा पुरस्कारांचे वितरण
Date:

