१ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबरदरम्यान विशेष मोहीम; ३९ हजारांहून अधिक झोपड्या कारवाईच्या कक्षेत
मुंबई, दि. २० सप्टेंबर २०२६ : बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने झोपडपट्टी परिसरातील अनधिकृत आणि नियमबाह्य बांधकामांविरोधात विशेष मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत १४ फूट आणि त्यापेक्षा अधिक उंचीच्या झोपड्यांवर धडक कारवाई करण्यात येणार आहे. संबंधित रहिवाशांनी अनधिकृत बांधकामे स्वतःहून तात्काळ हटवावीत, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. सह आयुक्त (दक्षता) देवेंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली झोपडपट्टी परिसरातील अनधिकृत व नियमबाह्य बांधकामांवर कारवाई केली जाणार आहे.
३९,१११ झोपड्या १४ फुटांपेक्षा अधिक उंच
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये एकूण २ लाख २३ हजार १५० झोपड्या असल्याचे प्रशासनाच्या आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे. यापैकी ३९ हजार १११ झोपड्या १४ फूट आणि त्याहून अधिक उंचीच्या असल्याचे निदर्शनास आले आहे.
यामध्ये शहर विभागात ३,३४८, पश्चिम उपनगरात ४,५३६, तर पूर्व उपनगरात सर्वाधिक ३१,२२७ झोपड्या असल्याचे सांगण्यात आले आहे.
यापैकी ४,५८४ झोपड्यांवर यापूर्वीच निष्कासनाची कारवाई करण्यात आली असून, ६११ झोपड्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. उर्वरित अनधिकृत बांधकामे रहिवाशांनी स्वतःहून न हटवल्यास पालिकेकडून पुढील कठोर कारवाई केली जाणार आहे.
१२८ बांधकामांवर आधीच कारवाई
महानगरपालिकेच्या विविध प्रशासकीय विभागांकडून अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाई सुरू आहे. २४ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत १२८ अनधिकृत बांधकामांवर कारवाई पूर्ण करण्यात आली असून, आणखी १४० बांधकामांवर कारवाई प्रस्तावित असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
नागरिकांनी नव्याने अनधिकृत बांधकामे करू नयेत तसेच यापूर्वी केलेली नियमबाह्य बांधकामे स्वतःहून हटवावीत, असे आवाहन पालिकेने केले आहे.
दरम्यान, अनेक झोपडपट्टी भागात १४ फुटांची मर्यादा ओलांडून दोन ते तीन मजली बांधकामे उभी राहिल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेच्या विशेष मोहिमेदरम्यान स्थानिक पातळीवर विरोध किंवा तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

