पुणे महापालिकेचे नागरिक, गणेश मंडळे, कलाकार व गणेशभक्तांना आवाहन
पुणे : महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या गणेशोत्सवाच्या विविध परंपरा, आठवणी आणि इतिहासाचे डिजिटल स्वरूपात जतन करण्यासाठी राज्य शासनाने Bappa.org हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या उपक्रमात पुणेकर नागरिक, सार्वजनिक गणेश मंडळे, कलाकार, कारागीर आणि गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या सांस्कृतिक विभागाकडून करण्यात आले आहे.
घराघरांतील गणपतीची परंपरा, सार्वजनिक गणेश मंडळांचा इतिहास, आरास, सजावट, पारंपरिक कला, भक्तीपरंपरा तसेच पिढ्यान्पिढ्या जपलेल्या आठवणी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहे. हा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा आणि त्याची कायमस्वरूपी डिजिटल नोंद उपलब्ध राहावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
Bappa.org या व्यासपीठावर नागरिक आणि गणेश मंडळांना आपल्या गणेशोत्सवाशी संबंधित छायाचित्रे, व्हिडिओ, कथा, परंपरा आणि ऐतिहासिक माहिती नोंदविता येणार आहे.
पुणे शहराला गणेशोत्सवाची स्वतंत्र आणि समृद्ध परंपरा लाभली आहे. घरगुती गणपतींपासून सार्वजनिक गणेश मंडळांपर्यंत, ढोल-ताशा पथके, पारंपरिक कला, आकर्षक आरास, सामाजिक उपक्रम आणि विविध धार्मिक-सांस्कृतिक प्रथा यांचे दस्तऐवजीकरण होणे पुण्याच्या सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.
आपल्या कुटुंबातील गणपतीची जुनी परंपरा, विशेष पूजा-पद्धती, ऐतिहासिक छायाचित्रे, गणेश मंडळाचा इतिहास, जुन्या काळातील आरास-सजावट, सामाजिक उपक्रम किंवा गणेशोत्सवाशी निगडित एखादी वैशिष्ट्यपूर्ण आठवण किंवा कथा असल्यास ती Bappa.org वर नोंदवून कायमस्वरूपी जतन करता येणार आहे.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी Bappa.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच WhatsApp MetaAI द्वारे 9136172681 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
“आपली एक कथा म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाची एक कायमस्वरूपी नोंद”, या संकल्पनेतून अधिकाधिक पुणेकरांनी या उपक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन पुणे महानगरपालिका सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

