पुणे:देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाचे २७ आजी-माजी मंत्री माझ्याकडे आहेत. त्यांनीच फडणवीस यांच्या दहशतीची माहिती दिली. फडणवीस कामही करू देत नाहीत आणि जेलमध्ये टाकण्याची धमकी देत असल्याच्या त्यांच्या तक्रारी आहेत.मराठ्यांविषयी प्रचंड द्वेष बाळगणाऱ्या फडणवीस यांचा खुनशीपणाच आता भाजपच्या मुळावर उठला आहे.’ अशा शब्दात मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
शिवाजीनगर न्यायालयात दाखल असलेल्या एका फसवणूक प्रकरणातील सुनावणीसाठी जरांगे पाटील मंगळवारी पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जरांगे पाटील म्हणाले, “धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण मिळाले असते, तर त्यांचे कल्याण झाले असते. मात्र फडणवीस यांनी त्यांचे आंदोलन एका दिवसात मोडून काढले. याच पद्धतीने फडणवीस यांनी मुस्लिम, बंजारा, कैकाडी समाजाचे आरक्षणही भरकटवले. मराठा समाजाच्या एका क्रांती मोर्चाचे त्यांनी तीन मोर्चे केले, आम्ही विकत नाही, फुटत नाही व मॅनेज होत नसल्याने त्यांना या आंदोलनात काही करता आले नाही. फडणवीसांचे एकही षडयंत्र यशस्वी होऊ देणार नाही. मी जेलमध्ये गेलो, तुम्ही आरक्षण दिले नाही भावनिक लाट येऊन फडणवीस तुम्ही गेलात म्हणून समजा, ११३ आमदार घरी जाणार.’ “जुन्या प्रकरणाशी माझा संबंध नसतानाही फडणवीसांनीच ही शाळा केली, एसआयटी नेमली, पण मी हटणार नाही. मी जेलला गेलो, तरीही फडणवीस यांना सोडणार नाही’ असा इशाराही त्यांनी दिला.
सगेसोयरेच्या अध्यादेशाबाबत ते म्हणाले, “२०१२ च्या कायद्यात दुरुस्ती करून मराठ्यांना, सगेसोयऱ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यात येणार होते. सगेसोयरे म्हणजे, ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या, त्याचा व सोयऱ्याचा व्यवसाय एकच आहे. म्हणजे मराठा व कुणबी एकच आहे. तो आदेश पारित करण्यासाठी त्यांनी अधिसूचना काढली. मात्र फडणवीस सगेसोयरेच्या अंमलबजावणीचे काम करत नाहीत, त्यांच्या मंत्र्यांनाही काम करू देत नाही. छगन भुजबळ यांना हाताशी धरून समाजात तेढ निर्माण करत आहेत’
विधानसभा निवडणुकीबाबत जरांगे पाटील म्हणाले, “अनेकजण आमच्या संपर्कात आले असले, तरी शेवटी निर्णय समाजच घेणार आहे. निवडणुकीला कोणाला उमेदवारी द्यायची हे समाजच ठरवेल, इच्छुकांबाबत समाजाला विचारूनच निर्णय घेतला जाईल. वाद असतात, पण एकदा उमेदवारी दिल्यानंतर समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. गोरगरीब ८० टक्के मराठा समाज एका बाजूला आहे, ते कोणालाच घाबरत नाहीत. समाजाच्या विरोधात जाणारा संपणार आहे.’