हडपसर, दापोडी आणि फुगेवाडीतील २१ जणांच्या मृत्यूप्रकरणी राज्य सीआयडीची कारवाई; मिथेनॉलमिश्रित गावठी दारूची निर्मिती आणि विक्री केल्याचा आरोप
पुणे, दि. ५ ऑगस्ट — माय मराठी प्रतिनिधी
मिथेनॉलमिश्रित विषारी गावठी हातभट्टीची दारू प्यायल्याने हडपसर परिसरातील चार आणि दापोडी-फुगेवाडी परिसरातील १७ अशा एकूण २१ जणांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दत्ता ऊर्फ भाऊ शिवराव लोंढे याच्या नेतृत्वाखालील कथित संघटित टोळीविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अर्थात ‘मकोका’अंतर्गत कारवाई करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७९/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता आणि मुंबई दारूबंदी कायद्यातील विविध कलमांनुसार हा गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे आहे.
नऊ जणांच्या टोळीवर कारवाई
सीआयडीच्या तपासात दत्ता ऊर्फ भाऊ शिवराव लोंढे याने स्वतःच्या नेतृत्वाखाली संघटित गुन्हेगारी टोळी तयार केल्याचे नमूद करण्यात आले आहे. या टोळीत पुढील आरोपींचा समावेश असल्याचे विभागाने म्हटले आहे—
दत्ता ऊर्फ भाऊ शिवराव लोंढे, आकाश दीपक जाधव, योगेश राजेंद्र हनकडे, राधेश्याम हरिराम प्रजापती, कल्लेश अशोक अग्रवाल, आर्यन संजीव झांजे, अभिषेक अरुण चौबे, अरुण जगदंबा चौबे आणि अंकित अरुण चौबे.
या आरोपींनी आर्थिक आणि अन्य फायद्यांसाठी बेकायदेशीर मार्गाने मिथेनॉलमिश्रित गावठी हातभट्टी दारूची निर्मिती, वाहतूक आणि विक्री केल्याचा आरोप आहे.
प्रतिबंधात्मक कारवाईनंतरही गुन्हेगारी सुरू असल्याचा दावा
या टोळीतील प्रमुख आणि अन्य सदस्यांविरोधात यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या कथित गुन्हेगारी प्रवृत्तीत सुधारणा झाली नसल्याचे सीआयडीने म्हटले आहे.
टोळीच्या कारवायांमुळे पुणे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीती, असुरक्षितता आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. संघटित टोळीच्या कारवायांना आळा घालण्यासाठी आणि टोळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मकोकाअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून प्रस्तावाला मान्यता
पोलीस उपअधीक्षक श्यामराव काळे यांनी पुणे सीआयडीच्या पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या माध्यमातून विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांच्याकडे मकोका कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता.
या प्रस्तावाला विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे पश्चिम विभाग, सीआयडी सुधीर हिरेमठ यांनी मान्यता दिली. त्यानुसार आरोपींविरोधात मकोका कायद्यातील कलम ३(१)(i)(ii), ३(२) आणि ३(४) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद, विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ, पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक श्यामराव काळे करीत आहेत.

