पुणे, दि. ५ ऑगस्ट : सिंहगड रोड परिसरातील निंबजनगर, विठ्ठलनगर आणि एकतानगरी या भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पुराच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापौर मंजुषा नागपुरे यांनी संबंधित प्रशासकीय, तांत्रिक तसेच पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावून सविस्तर आढावा घेतला. नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत तातडीच्या उपाययोजनांसह दीर्घकालीन नियोजन करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
बैठकीत निंबजनगर, विठ्ठलनगर आणि एकतानगरी परिसरातील पूरपरिस्थितीची कारणे, बाधित क्षेत्रांचे नकाशे, नदीपात्रातील अडथळे, पाण्याच्या प्रवाहातील अडचणी, संरक्षण भिंतींची आवश्यकता तसेच भविष्यात पूरस्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या अभियांत्रिकी उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली.
महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या, “दरवर्षी या परिसरातील नागरिकांना पुरामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान, मालमत्तेची हानी आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. ही परिस्थिती आता कायमस्वरूपी बदलणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. नागरिकांना दरवर्षी पुराच्या संकटाचा सामना करावा लागू नये, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना तातडीने राबवाव्यात. या प्रश्नात कोणतीही दिरंगाई किंवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही.”
बैठकीदरम्यान खालील महत्त्वाच्या निर्णयांवर भर देण्यात आला :
पूरप्रवण क्षेत्रांचे तांत्रिक सर्वेक्षण करून सविस्तर कृती आराखडा तयार करणे.
नदीपात्रातील अडथळे दूर करून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे.
आवश्यक ठिकाणी संरक्षण भिंती (Retaining Wall) उभारण्याचा प्रस्ताव तयार करणे.
पुणे महानगरपालिका आणि पाटबंधारे विभाग यांनी संयुक्तपणे अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांची अंमलबजावणी करणे.
कामांच्या प्रगतीचा नियमित आढावा घेऊन निश्चित कालमर्यादेत उपाययोजना पूर्ण करणे.
महापौर मंजुषा नागपुरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देत सांगितले की, “नागरिकांचा विश्वास जपणे आणि त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. निंबजनगर, विठ्ठलनगर आणि एकतानगरी परिसर कायमस्वरूपी पुरमुक्त करण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक उपाययोजना प्राधान्याने आणि वेळेत पूर्ण करण्यात यावी.”
या बैठकीस श्रीअनिरुद्ध पावसकर
शहर अभियंता पुणे महानगरपालिका
श्री प्रवीण शेंडे अधीक्षक अभियंता , श्री देवराम पंडित उपअभियंता उपस्थित होते.
निंबजनगर, विठ्ठलनगर व एकतानगरी पुरमुक्त करण्यासाठी महापौर मंजुषा नागपुरे यांची कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी तातडीची बैठक
Date:

