१५ दिवसांत सिंहगड रस्ता परिसराचा वाहतूक सर्वेक्षण अहवाल द्या*महापौर मंजूषा नागपुरे यांचे पोलिस प्रशासनाला निर्देश; वाहतूक वॉर्डन नियुक्तीचा निर्णय

Date:

पुणे, दि. ५ : सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी धायरी, नऱ्हे, नांदेड सिटी, वडगाव तसेच दांडेकर पुलापर्यंतच्या मुख्य रस्ते, पर्यायी रस्ते आणि चौकांचे १५ दिवसांच्या आत सर्वेक्षण करून त्याचा अहवाल वाहतूक पोलिसांनी महापालिकेला सादर करावा, अशा सूचना महापौर मंजूषा नागपुरे यांनी बुधवारी पोलिस प्रशासनाला दिल्या. पोलिसांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार महापालिकेकडून आवश्यक त्या उपाययोजनांसह वाहतूक वॉर्डनची नियुक्ती करून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तत्काळ अंमलबजावणी करण्यात येईल, असे महापौरांनी स्पष्ट केले. तसेच, तात्पुरता उपाय म्हणून मुख्य रस्त्यांवर वाहतूक पोलीस आणि वाहतूक वॉर्डनची संख्या वाढविण्याचे आदेशही त्यांनी दिले.

गेल्या काही दिवसांपासून सिंहगड रस्त्यावर होत असलेल्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी महापौर नागपुरे यांनी सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयात तातडीची बैठक बोलावली होती. बैठकीस प्रभाग समिती अध्यक्ष सचिन मोरे, सहाय्यक पोलिस आयुक्त वसंत कुवंर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड, पोलीस निरीक्षक सुनील गवळी, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रियंका प्रवीण गोरे, सचिन पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते काका चव्हाण, माजी उपमहापौर प्रसन्न जगताप, नगरसेवक हरीदास चरवड, सुरज लोखंडे, सुभाष नाणेकर, राजाभाऊ लायगुडे तसेच नगरसेविका कोमल नवले, जयश्री भूमकर, प्रिया गदादे, वृषाली रिठे आणि धनश्री कोल्हे उपस्थित होत्या.

या बैठकीत नगरसेवकांनी धायरीतील उंबऱ्या गणपती चौकापासून दांडेकर पुलापर्यंत सकाळी व संध्याकाळी होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. संपूर्ण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असताना अनेक ठिकाणी वाहतूक पोलीस दिसत नसल्याने शालेय विद्यार्थी, नोकरदार तसेच रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्यावर पोलीस नसल्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन, विरुद्ध दिशेने वाहने चालविणे, अनधिकृत पार्किंग तसेच अतिक्रमणांचे प्रमाण वाढत असल्याचीही त्यांनी खंत व्यक्त केली. याबाबत वारंवार पोलिसांना पत्रे देऊनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याबद्दल नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली.

पोलिसांची काहीच जबाबदारी नाही का? – महापौर

या बैठकीत महापौरांनी वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. वाहतूक कोंडीच्या वेळी रस्त्यावर पोलीस दिसत नाहीत. जे पोलीस उपस्थित असतात, ते वाहतूक सुरळीत करण्याऐवजी दंडात्मक कारवाई करण्यात व्यस्त असतात, अशी टीका त्यांनी केली. तसेच, सण, उत्सव आणि विविध कार्यक्रमांना परवानगी देताना वाहतूक कोंडी तसेच ध्वनीप्रदूषणाच्या मर्यादांचा पुरेसा विचार केला जात नसल्याने त्याचा रोष लोकप्रतिनिधींना सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांची काहीच जबाबदारी नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

चौकांमध्ये पोलीस उपस्थित असल्यास नागरिकांवर त्याचा धाक राहतो आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन कमी होते. मात्र, पोलीसच नसतील तर वाहतूक कोंडी होणारच, असे त्यांनी स्पष्ट केले. रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारी महापालिकेची असली, तरी या अतिक्रमणांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे पोलिसांनी महापालिकेच्या निदर्शनास का आणू नये, अशी विचारणाही त्यांनी केली. तसेच, रस्त्यांवर व चौकांमध्ये मिरवणुकांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि ध्वनीप्रदूषणाच्या समस्येबाबत सर्वपक्षीय शिष्टमंडळासह पोलीस आयुक्तांची भेट घेणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

काय आहेत नगरसेवकांच्या मागण्या?

प्रत्येक चौकात वर्दळीच्या वेळी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी.

अतिक्रमणाविरोधात पोलीस आणि महापालिकेने संयुक्त कारवाई करावी.

अनधिकृत पार्किंगला आळा घालावा.

वर्दळीच्या वेळी दंडात्मक कारवाईऐवजी वाहतूक नियमनावर भर द्यावा.

वाहतुकीस अडथळा ठरणारे रस्त्यांवरील डीपी आणि ओव्हरहेड केबल्स हटवाव्यात.

रस्त्यांवरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करावी.

वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणारे बसथांबे स्थलांतरित करावेत.

महापालिका सर्वतोपरी सहकार्य करेल

“सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका वाहतूक पोलिसांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. मुख्य सिंहगड रस्त्यासह धायरी, वडगाव, नऱ्हे, नांदेड सिटी तसेच राजाराम पूल ते नवशा मारुतीपर्यंतच्या परिसरातील मुख्य रस्ते, पर्यायी रस्ते आणि चौकांचे १५ दिवसांच्या आत सर्वेक्षण करून पोलिसांनी अहवाल सादर करावा. त्यानुसार आवश्यक असलेली सर्व कामे महापालिकेकडून तातडीने करण्यात येतील,” असे महापौर मंजूषा नागपुरे यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

दिल्लीत एफ१ सिम रेसिंग इंडिया ओपनला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३ हजारांहून अधिक स्पर्धकांचा सहभाग

९४० अधिकृत लीडरबोर्ड नोंदींसह दिल्ली टप्पा ठरला आतापर्यंतचा सर्वांत...

विषारी दारूप्रकरणी दत्ता लोंढेच्या टोळीवर ‘मकोका’

हडपसर, दापोडी आणि फुगेवाडीतील २१ जणांच्या मृत्यूप्रकरणी राज्य सीआयडीची...