शिवाजीनगर गावठाणातील श्री सद्गुरु मित्र मंडळाचा आदर्श गणेशोत्सव; उर्वरित वर्गणीतून मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांनाही मदत करण्याचा संकल्प
पुणे : प्रतिनिधी
गणेशोत्सवातील मिरवणूक, मोठे ध्वनिक्षेपक आणि अनावश्यक दिखाव्यावरील खर्च टाळून तो निधी गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देत शिवाजीनगर गावठाणातील श्री सद्गुरु मित्र मंडळाने सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला आहे.
नागरिकांना ध्वनिप्रदूषणाचा त्रास होऊ नये म्हणून मंडळाने यंदा मोठ्या ध्वनिक्षेपकांचा वापर टाळला. परिसरातील रस्त्यांची परिस्थिती आणि वाहतुकीचा विचार करून रस्त्यावर मोठा मंडप उभारण्याऐवजी गावातील गणपती मंदिरातच श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
उत्सव साधेपणाने साजरा करताना मिरवणुकीवरील खर्चही पूर्णपणे टाळण्यात आला. यातून वाचलेला निधी स्वतःच्या उत्सवावर खर्च न करता गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या स्वरूपात देण्यात आला.
मंडळाने आपली सामाजिक बांधिलकी केवळ गणेशोत्सवापुरती मर्यादित न ठेवता उर्वरित वर्गणीतून मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचा संकल्प केला आहे.
गणेशोत्सव म्हणजे केवळ रोषणाई, मोठा आवाज आणि मिरवणूक नव्हे, तर समाजातील गरजू घटकांसाठी विधायक काम करण्याची संधी आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.
मंडळाचे अध्यक्ष अजिंक्य काळे, कार्याध्यक्ष रोहित ढमाले आणि सचिव सौरभ भिलारे यांनी या उपक्रमाची माहिती दिली.

