पुणे- सलाम पुणे सह अनेक पुरस्काराने सन्मानित झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं निधन झालं आहे. २७ ऑगस्ट रोजी पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेली अनेक दशकं या हरहुन्नरी अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. केवळ मराठीतच नव्हे तर हिंदी कलाविश्वात देखील सुहासिनी देशपांडे यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती.सुहासिनी देशपांडे २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सिंघम’ चित्रपटात झळकल्या होत्या. वयाच्या १२ व्या वर्षापासून त्यांनी कलाक्षेत्रात काम करायला सुरुवात केली होती. ‘माहेरचा आहेर’, ‘मानाचं कुंकू’ (१९८१), ‘कथा’ (१९८३), ‘आज झाले मुक्त मी’ (१९८६), ‘आईशप्पथ’ (२००६), ‘चिरंजीव’, ‘अग्निपरीक्षा’, ‘धग’, ‘आम्ही दोघे राजा राणी’, ‘बाईसाहेब’ अशा असंख्य चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय त्यांनी ‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘राजकारण गेलं चुलीत’, ‘लग्नाची बेडी’ अशा अनेक नाटकांमध्ये सुद्धा काम केलेलं आहे.रंगभूमीसाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना २०१५ मध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेतर्फे जयंतराव टिळक स्मृती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. गेल्या ७० वर्षांत १०० हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनेत्रीच्या निधनामुळे कलाविश्वात शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर बुधवारी ( २८ ऑगस्ट) पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.