पुणे, २७ जुलै : स्ट्रोक, पार्किन्सन्स, डिमेन्शिया यांसारख्या मेंदूच्या आजारांचे लवकर निदान आणि वेळेवर उपचार केल्यास त्यांचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात कमी करता येतात. यासाठी समाजात व्यापक जनजागृती होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन इंडियन फेडरेशन ऑफ न्यूरो रिहॅबिलेशनचे संस्थापक डॉ. निर्मल सूर्या यांनी केले.डीईएस ब्रिजलाल जिंदाल कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, निश ॲडव्होकेसी फाउंडेशन यांच्या वतीने आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या सहकार्याने फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित ‘न्यूरोहार्मनी २.०’ या राष्ट्रीय बहुविद्याशाखीय परिषदेत ते बोलत होते.
यावेळी डीईएसचे अध्यक्ष प्रमोद रावत, महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. शरद आगारखेडकर, प्राचार्या डॉ. स्नेहल जोशी, निश ॲडव्होकेसी फाउंडेशनच्या डॉ. पौर्णिमा गौरी यांच्यासह देशभरातील न्यूरोलॉजिस्ट, पुनर्वसन तज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, संशोधक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. सूर्या म्हणाले, “मेंदूचे आरोग्य जपा, कारण निरोगी मेंदू म्हणजे निरोगी आयुष्य. औषधोपचारांसोबतच पुनर्वसन, मानसिक आरोग्य, कुटुंबाचा आधार आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचीही तितकीच महत्त्वाची भूमिका असते. मेंदूच्या आजारांबाबत भीती किंवा गैरसमज न बाळगता जागरूकता, प्रतिबंध आणि तज्ज्ञांचा सल्ला स्वीकारणे हीच उत्तम काळजी आहे.”
चार दिवस चाललेल्या या परिषदेत स्ट्रोक पुनर्वसन, पार्किन्सन्स, डिमेन्शिया, न्यूरो-पॅलिएटिव्ह केअर, मानसिक आरोग्य, सहाय्यक तंत्रज्ञान आणि न्यूरोसायन्समधील अत्याधुनिक संशोधन आदी विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. तसेच बहुविद्याशाखीय उपचारपद्धती, रुग्णकेंद्रित पुनर्वसन आणि मेंदूच्या आरोग्याविषयी जनजागृतीची गरज अधोरेखित करण्यात आली.

