- ऐतिहासिक लाल महाल चौकात तरुणाईचा जनसागर उधळला
- शिवतेज दहिहंडी संघाने सात थर रचत फोडली हंडी
पुणे : प्रतिनिधी
गोविंदा रे गोपाळाचा जयघोष, ढोल ताशांचा मंगलमय गजर, आकर्षक विद्युत रोषणाई, डीजेने वाजविलेले आकर्षक संगीत आणि त्यावर थिरकनाऱ्या तरुणाईचा उसळलेला जनसागर अशा उत्साही वातावरणात पुनीत बालन ग्रुप आयोजित 35 सार्वजनिक मंडळांची संयुक्त दहीहंडीचा थरार पुणेकरांनी अनुभवला. ऐतिहासिक लाल महाल चौकात तुडुंब गर्दीसमोर शिवतेज दहीहंडी संघाने सात थर रचत ही संयुक्त दहीहंडी फोडण्याचा बहुमान मिळवला.
शहरातील चौक चौकात होणार्या दहिहंडी कार्यक्रमांमुळे होणारी वाहतुक कोंडी टाळण्यासाठी आणि सुरक्षा व्यवस्थेमुळे पोलिस यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी युवा उद्योजक पुनीत बालन यांनी पुढाकार घेऊन संयुक्त दहिहंडी कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला होता. ३५ सार्वजनिक गणेश मंडळांनी या उपक्रमाला पाठिंबा देत या संयुक्त दहीहंडीत सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर ऐतिहासिक लाल महाल चौकात या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. चौरंगी पॅंडलमध्ये आकर्षक विद्युत रोषणाईने ही दहिहंडी पुणेकरांचे लक्ष वेधून घेत होती. सायंकाळी चारच्या सुमारास कार्यक्रमाला सुरवात झाली. सुरवातीला समर्थ, नादब्रम्ह, शिवमुद्रा, युवा वाद्य पथक या ढोल पथकांनी केलेल्या ढोल-ताशा वादनाने संपुर्ण परिसरात उत्साह भरला. डीजेच्या वादनाला सुरवात झाल्यांनतर उत्साहाला आणखीच उधाण आले. त्यात अधून मधून पावसाच्या सरींची हजेरी आणि देहभान विसरून हजारोंच्या तरुणाईमुळे यामुळे वातावरण जोशपूर्ण झाले होते. महिला आणि तरुणांची संख्याही मोठी होती. या अशा उत्साह पूर्ण वातावरणात वीस गोविंदा पथकांनी सलामी देऊन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यात मुंबईतील चेंबूर येथील तरुणी आणि महिलांच्या पथकाने दिलेली सलामी लक्षवेधक ठरली.
रात्री साडेनऊच्या सुमारास कसबा पेठेतील शिवतेज दहीहंडी संघाने सात थर लावत ही पहिली संयुक्त हंडी फोडली. आयोजक पुनीत बालन व अभिनेते प्रवीण तरडे यांच्या हस्ते या संघाला चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
आयोजक पुनीत बालन, माणिकचंद ऑक्सिरीचच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल- बालन यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी अभिनेता प्रविण तरडे, महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख
यांच्यासह राजकीय, सामाजिक यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या संयुक्त दहीहंडीला हजेरी लावली.
संयुक्त दहीहंडीमध्ये सहभागी झालेल्या सर्व सार्वजनिक मंडळांचा मी आभारी आहे. अतिशय उत्साहात पुणेकरांनी या दहिंहंडीला उपस्थित राहून सहभाग घेतला त्यांचाही मनापासून आभारी आहे. पोलीस प्रशासनाने सहकार्य करीत आणि सर्वांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली. त्यामुळे निर्वघ्नपणे हा कार्यक्रम पार पडला, त्यासाठी पोलिस प्रशासनाचे आभार.
– पुनीत बालन, युवा उद्योजक.