नवी दिल्ली : ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनानंतर यशाने प्रेरित होऊन आता आम आदमी पक्षाने वाहनधारकांच्या जिव्हाळ्याच्या E-20 पेट्रोल (Ethanol Blended Petrol) या मुद्द्यावरून केंद्र सरकारविरोधात मोठे आंदोलन उभारण्याची तयारी सुरू केली आहे. आप पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन या विषयावर येत्या शनिवारी विशेष ‘टाउन हॉल’ बैठक बोलावल्याची घोषणा केली.
पत्रकार परिषदेत बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, E-20 पेट्रोलच्या वापरामुळे देशभरातील नागरिकांच्या गाड्या खराब होत असून इंजिनमध्ये गंभीर तांत्रिक बिघाड होत आहेत. तसेच वाहनांचे मायलेजही कमालीचे घटले आहे. हे आंदोलन अधिक तीव्र आणि मोठे होण्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या समस्येवर तात्काळ योग्य आणि ठोस तोडगा काढावा, अशी जोरदार मागणी केजरीवाल यांनी केली आहे.
कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये टाउन हॉल बैठक
ई-20 पेट्रोलच्या विरोधात पक्षाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी येत्या शनिवारी दुपारी 12 वाजता दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये एका मोठ्या ‘टाउन हॉल’ बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत इंधन आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील तज्ज्ञांना आमंत्रित केले जाणार असून, E-20 पेट्रोलचे दुष्परिणाम आणि संभाव्य उपायांवर सविस्तर चर्चा केली जाईल.
देशभरातून सहभागासाठी आवाहन
केजरीवाल यांनी सांगितले की, या बैठकीत देशभरातून लाखो नागरिक प्रत्यक्ष आणि ऑनलाईन माध्यमातून सहभागी होतील. दिल्लीत येणे शक्य नसलेल्या लोकांसाठी 8588833548 हा ऑनलाईन संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय, E-20 इंधनाविरोधात पंतप्रधानांच्या नावे सुरू केलेल्या ऑनलाइन याचिकेवर (Petition) आतापर्यंत 2 लाख नागरिकांनी आपल्या स्वाक्षऱ्या आणि सूचना नोंदवल्याची माहितीही त्यांनी दिली.

