नेपाळची राजधानी काठमांडू येथे विमान कोसळले आहे. विमानातील 19 जणांपैकी 18 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमी पायलट कॅप्टन मनीष शाक्य यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे विमान काठमांडूहून पोखराला जात होते.
सकाळी 11 वाजता त्रिभुवन विमानतळावरून विमानाने उड्डाण केले. काही क्षणातच ते कोसळले. 9N-AME हे विमान सूर्या एअरलाइन्सचे होते. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी 17 सूर्या एअरलाइन्सचे कर्मचारी होते, तर उर्वरित 2 क्रू मेंबर्स होते.
काठमांडू पोस्टनुसार, अपघातानंतर लगेचच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचले. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, एका सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, अपघातानंतर विमानाला आग लागली. ते लगेचच विझवण्यात आले.
घटनास्थळावरून समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये धुराचे लोट उठताना दिसत आहेत. मात्र हा अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
नेपाळमध्ये 14 वर्षात 12 विमान अपघात
नेपाळमधील हवाई उद्योग गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या वाढला आहे. तसेच अनेक अवघड आणि डोंगराळ भागात सेवा देत आहे. मात्र, निकृष्ट सुरक्षा व्यवस्था आणि प्रशिक्षणाचा अभाव यामुळे येथे अनेकदा अपघात घडतात.
नेपाळमध्ये दरवर्षी सरासरी एक विमान अपघात होतो. 2010 पासून आतापर्यंत 12 विमाने कोसळली आहेत. 14 जानेवारी 2023 रोजी येथे एक मोठा विमान अपघात झाला होता. काठमांडूपासून 205 किमी अंतरावर पोखरामध्ये यति एअरलाइन्सचे विमान कोसळले होते. हे एटीआर-72 विमान होते, ज्यामध्ये 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते.
पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्याच्या अवघ्या 10 सेकंद आधी विमान एका टेकडीवर आदळले. यामुळे विमानाला आग लागली आणि ते खड्ड्यात पडले. या अपघातात सर्व 72 जणांचा मृत्यू झाला. यापूर्वी 29 मे 2022 रोजी मुस्तांग जिल्ह्यात एक विमान कोसळले होते. या अपघातात 22 जणांचा मृत्यू झाला.
2018 मध्ये, काठमांडूतील त्रिभुवन विमानतळाजवळ यूएस-बांगला एअरलाइन्सचे विमान कोसळले. यामध्ये 51 जणांचा मृत्यू झाला, तर 20 जण गंभीर जखमी झाले. नेपाळमध्ये वारंवार होणारे विमान अपघात पाहून युरोपियन युनियनने नेपाळच्या वाहकांना आपल्या हवाई हद्दीत बंदी घातली आहे.