महाराष्ट्रातील ६५ संस्थांमार्फत वृक्ष लागवड आणि संवर्धन हा उपक्रम
पुणे : निसर्गाच्या सुदृढतेवर मानवी जीवनाची उत्पत्ती आणि उत्क्रांती अवलंबून असल्यामुळे अधिकाधिक झाडे लावत पर्यावरण संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, हे लक्षात घेत महाएनजीओ फेडरेशन व महाराष्ट्रातील ६५ संस्थांमार्फत वृक्षारोपण व संवर्धन हा उपक्रम राबविण्यात आला. महाराष्ट्रातील ६५ सामाजिक संस्थानी राज्यात एकाच दिवशी तब्बल ३५१० झाडांचे रोपण केले.
राज्यस्तरीय वृक्ष लागवड आणि संवर्धन हा उपक्रम महाएनजीओ फेडरेशनचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. यासाठी वरिष्ठ संचालक मुकुंद शिंदे, संचालक योगेश बजाज आणि अपूर्वा करवा यांनी विशेष प्रयत्न केले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला.
शेखर मुंदडा म्हणाले, निसर्गाने दिलेल्या देणगीचा सन्मान आणि पर्यावरणाच्या संवर्धनाकरीता कटिबद्ध होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. गेल्या काही वर्षांत वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्याने त्याचा विपरीत परिणाम जनसामान्यावर आणि तेथील वातावरणावर झालेला दिसून येत आहे. यासाठी महाराष्ट्रामध्ये वृक्ष लागवड आणि संवर्धन करण्यासाठी गांभीर्याने सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.