धाराशिव-सार्वजनिक सण-उत्सवांमध्ये पुण्यातील विद्यानंद बापट यांच्या भूमिकेमुळे सध्या पुणे-मुंबईसह राज्यभरात मोठी चर्चा सुरू आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर या मुद्द्यावरून दोन गट पडले असून, एक गट डीजे आणि ढोल-ताशांच्या समर्थनार्थ, तर दुसरा गट ध्वनिप्रदूषणाचा दाखला देत डीजेबंदीच्या बाजूने उभा ठाकला आहे. या वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या मेघना बोर्डीकर यांनीही डीजेबंदीला जाहीर पाठिंबा दिला असून, गेल्या वर्षी डीजेच्या दणदणाटामुळेच आपल्या सख्ख्या चुलत भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी केला आहे.
धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मेघना बोर्डीकर यांनी पत्रकारांशी बोलताना आपले मत व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या, सर्वांना न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन केले पाहिजे. गेल्या वर्षी गणेशोत्सवात माझा सख्खा भाऊ फक्त डीजेमुळे मृत्युमुखी पडला. आपण वारंवार सांगतो की सर्वोच्च न्यायालयानेही डीजेवर बंदी घातली आहे. परंतु, लोकांना ते मान्य नाही. डीजेमुळे घातक परिणाम होऊ शकतात, हे आपण सगळ्यांनी अनुभवले आहे, असे मत बोर्डीकर यांनी व्यक्त केले आहे.
पुढे बोलताना मेघना बोर्डीकर म्हणाल्या, डीजेवर बंदी घालणे हे योग्य आहे. डीजे वाजवायला नको. आपण सगळे सण, उत्सव साजरे केले पाहिजेत. परंतु, त्यापासून त्रास व्हायला नको, याची काळजी घेणे गरजेचे आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अप्रत्यक्षपणे डीजे न लावण्याचा सल्ला दिला आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. फडणवीस बोलताना म्हणाले होते की, पुण्यातील लोक सुजाण आहेत. ते आपली परंपरा जपूनच गणेशोत्सव साजरा करतील, असे त्यांनी म्हटले होते.

