मुंबई-अजित पवार गटाचे आमदार, प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन, सुरेश खाडे, रविंद्र चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. लोकांच्या प्रश्नासाठी चार वेळा संपर्क साधला असता विखे पाटील यांनी मोबाईल उचललाच नाही. दुसऱ्या दिवशी काॅल बॅकही केला नाही. अशीच स्थिती मंत्री महाजन, खाडे, चव्हाण यांच्याविषयीही आहे, असे त्यांनी सांगितले. त्यावर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी ‘घरातील वाद मिटकरींनी बाहेर आणू नये’ अशी सारवासारव केली आहे.
मिटकरी म्हणाले की, आमच्याकडे अनेक लोक मंत्र्यांशी संंबंधित प्रश्न घेऊन येतात. त्याची सोडवणूक करण्यासाठी आम्ही काॅल केला तर मंत्र्यांनी प्रतिसाद देणे, प्रश्न समजून घेणे अपेक्षित आहे. पण तसे होत नाही. आमच्या पक्षाचे मंत्री भाजपच्या आमदारांनी संपर्क साधला तर तातडीने प्रतिसाद देतात. मग भाजपचे मंत्री तसे का करत नाहीत. त्यांनी घटक पक्षांशी असे वागण्याचे कारण काय आहे?
दरम्यान, महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्या, प्रवक्त्यांनी मित्र पक्षांवर टीका करू नये, असे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पक्षांतर्गत बैठकीत वारंवार सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळातही महायुतीतील नेते, प्रवक्ते एकमेकांवर तोंडसुख घेत होते. उमेदवार जाहीर झाल्यानंतरही टीकास्त्र सुरूच होते. त्याचाही फटका महायुतीला बसला. मात्र, यातून ते धडा शिकले नसावेत, असे दिसत आहे.