४० शिक्षकांची होणार निवड; ८ ते २२ सप्टेंबरदरम्यान ऑनलाइन प्रस्ताव मागविणार
पुणे :
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत ‘पुणे महानगरपालिका आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६-२७’ प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी महापालिका तसेच अनुदानित खाजगी शाळांमधील सर्व माध्यमांच्या गुणवंत आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांकडून ऑनलाइन प्रस्ताव मागविण्यात येणार आहेत.
या पुरस्कारांतर्गत एकूण ४० शिक्षकांची निवड करण्यात येणार आहे. यामध्ये पुणे महापालिका प्राथमिक शाळांतील २५, माध्यमिक शाळांतील ५, अनुदानित खाजगी प्राथमिक शाळांतील ५ आणि अनुदानित खाजगी माध्यमिक शाळांतील ५ शिक्षकांचा समावेश असेल.
पात्र शिक्षकांनी ८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन महापालिकेच्या शिक्षण विभागाने केले आहे.
निवड प्रक्रिया पारदर्शक, वस्तुनिष्ठ आणि गुणवत्ताधारित पद्धतीने राबविण्यात येणार आहे. प्रस्तावांचे एकूण १०० गुणांमध्ये मूल्यांकन करण्यात येईल. शिक्षकांचे शैक्षणिक कार्य, नाविन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न आणि शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठीचे योगदान यांचा विचार केला जाणार आहे.
पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष पुणे महानगरपालिकेचे महापौर असतील. निवड झालेल्या शिक्षकांना लॅपटॉप, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे.
शिक्षकांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेणे, त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणे आणि इतर शिक्षकांना गुणवत्तापूर्ण, नाविन्यपूर्ण व विद्यार्थी-केंद्रित शिक्षणासाठी प्रेरित करणे हा या पुरस्काराचा प्रमुख उद्देश असल्याचे शिक्षण विभागाने नमूद केले आहे

