Home Blog Page 1563

कामांची सद्यस्थिती जनतेला ऑनलाईन पाहता येण्याची व्यवस्था लवकरात लवकर करा-मंत्री रवींद्र चव्हाण

पुणे, दि. 28: सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सुरू असलेल्या रस्ते, इमारत बांधकाम आदी कामांची त्या- त्या वेळची सद्यस्थिती जनतेला ऑनलाईन माध्यमातून पाहता येईल यासाठी संगणकीय प्रणालीमध्ये आवश्यक व्यवस्था लवकरात लवकर करावी, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. झालेल्या गुणवत्तापूर्ण आणि वैशिष्टपूर्ण कामांची माहिती जनतेला मिळाल्यास विभागाची चांगली प्रतिमा जनतेच्या मनात निर्माण होते, असेही मंत्री श्री. चव्हाण यावेळी म्हणाले.

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत पुणे प्रादेशिक विभागाची आढावा बैठक मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकाम) संजय दशपुते, पुणे सा. बां. प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, पुणे मंडळाचे अधीक्षक अभियंता बी. एन. बहीर, सातारा मंडळाचे एस. बी. रोकडे, सोलापूर मंडळाचे एस. एस. माळी, दक्षता व गुण नियंत्रण मंडळ पुणेचे अधीक्षक अभियंता एस. एम. चिखलीकर, कोल्हापूर मंडळाचे प्रभारी अधीक्षक अभियंता एस. आर. पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या रस्त्यांच्या व इमारतींच्या कामांचा जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. यामध्ये राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, नाबार्ड अर्थसहाय्यित कामे, केंद्रीय मार्ग निधीमधील कामे, रेल्वे सुरक्षा कामे, हायब्रीड ॲन्युईटीमधील कामे आदींच्या कामांची स्थिती जाणून घेतली. सुरू असलेली कामे गतीने पूर्ण करावीत तसेच नवीन आर्थिक वर्षात घेण्यात आलेल्या कामांची प्रशासकीय, तांत्रिक मान्यतेसह सर्व प्रक्रिया करुन लवकरात लवकर निविदा प्रक्रिया करुन कामे सुरू करावीत. अधिकारी पातळीवर कोणतीही प्रक्रिया प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्या, असे निर्देश मंत्री श्री. चव्हाण यांनी दिले.

यावेळी मंत्री श्री. चव्हाण यांनी रस्त्यांच्या स्थितीचा, खड्डे भरण्याच्या कामांचा, इमारतींच्या कामाचा आढावा घेतला. सुरू असलेल्या सर्व कामांची जिओ टॅग केलेली छायाचित्रे बांधकाम विभागाच्या ‘पीएमआयएस’ प्रणालीवर वेळच्या वेळी अधिकाऱ्यांनी अपलोड करावीत. यंत्रणेत पारर्शकता येण्यासाठी ऑनलाईन प्रणालीमध्ये नियमित माहिती भरावी, असेही ते म्हणाले.

मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी प्रादेशिक विभागांतर्गत रस्ते व इमारत कामांविषयी आढावा सादर केला. मंत्रीमहोदयांच्या सूचनेनुसार ‘पीएमआयएस’ (प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम) मध्ये जनतेला ‘व्ह्यू राईट’ देण्याबाबत सुधारणा करण्यात येत आहेत. राज्यात १ लाख ५ हजार कि. मी. रस्ते, ३३ हजार ४०० इमारती, पूल आदी मत्ता निर्माण झाली आहे. त्याची माहिती प्रणालीवर भरण्यात आली असून या कामांची देखभाल दुरुस्ती आणि नवीन कामांचे संनियंत्रण या प्रणालीद्वारे करण्यात येत आहे.

केंद्र शासनाच्या ‘एम-सेवा’ ॲप मध्ये नागरिकांना खड्डे विषय तक्रार करण्यासाठी राज्याच्या बांधकाम विभागाने तयार केलेल्या ‘पीसीआरएस’ (पॉटहोल कंप्लेंट रिद्रेड्रेसल सिस्टीम) ॲपचे इंटीग्रेशन करण्यात आले आहे. लवकरच गुगल प्ले स्टोअरवरही ते उपलब्ध करून देण्यात येईल. त्यावर जनतेला आपले अभिप्राय, सूचना, तक्रारी देता येतील. त्यावर कार्यवाहीची सूचना संबंधित अभियंत्याला जाईल व त्यानुसार रस्त्यावरील खड्डे भरणे आदी कामे विहित वेळेत करून पुन्हा संबंधित कामाचे छायाचित्र अपलोड करून संबंधित नागरिकाला संदेशाद्वारे कळविण्यात येईल, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.

यावेळी अधीक्षक अभियंत्यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांची माहिती सादर केली. कोयना धरणात सुरू असलेल्या तापोळा पूल, पुणे येथील नोंदणी व मुद्रांक भवन, शिक्षण भवन, कृषी भवन, कामगार भवन, विस्तारित न्यायालय इमारत, बारामती येथील आयुर्वेद महाविद्यालय आदी कामाविषयी माहिती दिली. वैशिष्ठ्यपूर्ण कामांतर्गत पुणे जिल्ह्यात बांधकाम सुरू असलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) मुख्यालय, सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, बारामती येथील बऱ्हाणपूर येथे सुरू असलेल्या पोलीस उप मुख्यालय इमारत बांधकाम सद्यस्थिती विषयक चित्रफीत दाखवून सादरीकरण करण्यात आले.

कामांचे गुण नियंत्रण तपासणी प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था ऑनलाईन करण्याचे काम सुरू असून त्याबाबतही सादरीकरणही यावेळी करण्यात आले.

बैठकीस पाचही जिल्ह्यातील कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

शिवसेनेच्या महिला पुणे शहर प्रमुखपदी पूजा रावेतकर

पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पुणे शहर प्रमुखपदी पूजा रावेतकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील एक वर्षांकरिता ही नियुक्ती असून, रावेतकर यांच्या नियुक्तीचे शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी दिले आहे.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा सक्रियपणे प्रचार व प्रसार करून शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन काम कराल, असे त्यांना दिलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे.
मधुमालती आसरा फाउंडेशन आणि शिवसेना पक्षाच्या माध्यमातून रावेतकर महिलांनासाठी विविध उपक्रम राबवत असून, येणाऱ्या काळात महिला संघटन मजबूत करून महिला भगीनींच्या समस्या सोडवण्याचा, तसेच शासकीय योजनांच्या माध्यमातून महिलाना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. रावेतकर यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

सुहास फडके यांच्याकडे ‘सीजीआरएफ’च्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार

पुणे, दि. २८ एप्रिल २०२३: महावितरणच्या पुणे परिमंडल अंतर्गत वीजग्राहक गाऱ्हाणे निवारण मंचच्या (सीजीआरएफ) अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. सुहास फडके यांनी नुकताच स्वीकारला आहे.

श्री. सुहास फडके हे बारामती परिमंडल अंतर्गत वीजग्राहक गाऱ्हाणे निवारण मंचचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे रिक्त असलेल्या पुणे येथील अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. श्री. फडके हे महाराष्ट्र शासनाच्या विद्युत विभागात विद्युत निरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत.

कात्रजमध्ये डॉक्टरकडून 32 वर्षीय महिलेवर क्लिनिकमध्येच बलात्कार

पुणे- मांगडेवाडी कात्रज याठिकाणी कल्पना आनंद क्लिनिक येथे एका डॉक्टरने क्लिनिकमध्ये तपासणी करण्यासाठी आलेल्या, 32 वर्षीय महिलेवर बळजबरीने शारीरिक संबंध करून तिची इच्छा नसताना वारंवार पाठलाग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.याप्रकरणी पीडित महिलेने डॉक्टर विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी डॉक्टर यास अटक केली आहे.डॉ. अमित आनंदराव दबडे( वय- 29, रा. आंबेगाव खुर्द, पुणे )असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.याबाबत पीडित महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. 1/7/2022 पासून हा डॉक्टर या महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत होता .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी डॉक्टर अमित दबडे याचे कात्रज परिसरात मांगडेवाडी या ठिकाणी कल्पनानंद क्लिनिक आहे. सदर क्लिनिकमध्ये तपासणी करण्याकरीता पीडित महिला आल्यानंतर, त्याची तिच्याशी ओळख झाली होती.त्यानंतर डॉक्टरने महिलेचा मोबाईल क्रमांक घेऊन तिला मोबाईल फोनवर मेसेज आणि कॉल करून तिच्याशी गोड गोड बोलून त्याच्या हॉस्पिटलमध्ये बोलून घेतले. त्यानंतर तिचा हात धरून तिच्या छातीला हात लावून परत सदर प्रकाराबाबत माफी मागण्याच्या बहण्याने तिला क्लिनिकमध्ये बोलावले.

त्यानंतर तिला इंजेक्शन घेण्यासाठी कमरेवरचे कपडे खाली करण्यास सांगत, त्यांनी तिच्यासोबत जबरदस्तीने तिची संमती नसतानाही शारीरिक संबंध करून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतरही महिलेची इच्छा नसताना तिचा वारंवार पाठलाग करून तिला डॉक्टरने त्रास दिला. अखेर याबाबत महिलेने पोलिसांकडे धाव घेत, डॉक्टर विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला. महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक एस तावडे याबाबत पुढील तपास करत आहे.

मांजरी फार्म येथे विहिरीत टाकलेल्या महिलेच्या प्रेताचे गूढ ३ दिवसात उकलले, खुनी गजाआड

पुणे-हडपसर परिसरातील मांजरी फार्म याठिकाणी एका विहिरीत 50 वर्षीय महिलेचा खून केलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांना मिळून आला होता.याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात आज्ञात इसमावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.याबाबत पोलिसांनी तपास करत आरोपीस अटक केली आहे. त्याच्या चौकशीत विहिरीवरील मोटर चोरी करताना महिलेने पाहिल्याने, तिचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. तसेच तिचा पुरावा नष्ट करण्यासाठी महिलेचा मृतदेह आरोपीने विहिरीत फेकून दिल्याचेही पोलिसांना सांगितले आहे.

राजेश अशोक मुळेकर (रा.लोणी काळभोर ,तालुका हवेली, पुणे )असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे? तर उषा अशोक देशमुख (वय 50, रा.लोणी काळभोर ,पुणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून ती शेळी पालन करत होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मांजरी फार्म येथील 100 एकर जागेत निर्जन स्थळी खजिना विहीरमध्ये महिलेची बॉडी पोलिसांना मिळून आली. सदर महिलेस 100 ते 125 फूट अंतरावरून मारून फरपटून ओढून विहिरीत टाकल्याचे दिसून येत होते. मात्र, सीसीटीव्ही फुटेज घटनास्थळी नव्हते तसेच घटनास्थळ ग्रामीण भागातील असल्याने हडपसर परिसरातील वेगवेगळ्या वाड्या वस्त्यावर जाऊन पोलिसांनी आरोपी विषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला.

तपास पथकास यादरम्यान कवडी माळवाडी येथील एक व्यक्ती घटना झाल्यापासून गायब असल्याची माहिती मिळाली. संबंधित व्यक्ती चार-पाच दिवसांपूर्वीच जेलमधून सुटल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानुसार पोलिसांनी संशयताची माहिती काढली असता, संशयित राजेश मुळेकर हा फुरसुंगी भागात एका बिहारी इसमाकडे पेंटिंगच्या कामाकरता गेला आहे, अशी माहिती पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्यास अटक केली.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार , परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख ,एसीपी बजरंग देसाई ,वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे ,पोलिस निरीक्षक दिगंबर शिंदे ,विश्वास डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विजयकुमार शिंदे ,पीएसआय अविनाश शिंदे ,पोलिस अमलमदार सुशील लोणकर, संदीप राठोड ,समीर पांडुळे ,सचिन जाधव ,शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखिल पवार यांच्या पथकाने केली आहे.

चोरी पहिली अन जीव गमावलामांजरी फार्म येथील खजाना विहिरीवर बसवलेली पाण्याची मोटर चोरण्यासाठी आरोपी राजेश मुळेकर 24 एप्रिल रोजी दुपारी आला होता. त्यावेळी मोटर चोरत असताना, त्यास मयत महिला ही शेळ्या घेऊन जात होती तेव्हा तिने आरोपीस पाहिले. तिने मी तुझ्याबाबत येथील अधिकाऱ्यांना सांगते असे बोलून ती निघून जात होती. त्यावेळी आपले नाव सर्वांना समजेल व पुन्हा आपणास जेलमध्ये जावे लागेल. या विचाराने आरोपीने तेथे पडलेला सिमेंटचा ब्लॉक तिच्या डोक्यात पाठीमागून मारला.ती जमिनीवर पडल्यावर मयता जवळील कोयतेने तिच्या डोक्यात वार आरोपीने केला आणि त्यानंतर तिला फरफटत आणून विहिरीत ढकलून दिले अशी माहिती आरोपीने पोलिसांना दिली आहे.

साडेसात लाखांच्या उधारी बदल्यात 29 लाख रुपये उकळणाऱ्या सावकाराला अटक

पुणे-पुण्यातील एका 48 वर्षीय व्यक्तीने मुलीच्या वैद्यकीय प्रवेशासाठी एका खाजगी सावकाराकडून साडेसात लाख रुपये उधारीवर घेतले होते. त्याबदल्यात 20 लाख 74 हजार रुपयांची परतफेड त्यांनी केलेली होती. मात्र, त्यानंतरही आणखी साडेआठ लाख रुपयांची मागणी करत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या खाजगी सावकाराला पोलिसांनी जेरबंद केले आहे.

नीरज कुमार रामचंद्र मंडळ (वय -45, रा.पिंपळे गुरव, पुणे) त्याच्यावर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरचा प्रकार मे 2017 ते एप्रिल 2023 यादरम्यान घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केलेल्या तक्रारदार यांनी त्यांच्या मुलीच्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी आरोपी नीरज कुमार मंडल यांच्याकडून पाच आणि चार टक्के व्याजदराने एकूण सात लाख 50 हजार रुपये घेतले होते.

त्याच्या बदल्यात तक्रारदार यांनी आरोपी जून 2017 ते मे 2022 पर्यंत साडेसात लाख रुपयांच्या मोबदल्यात 13 लाख रुपये रोख व सात लाख 74 हजार रुपये ऑनलाइन स्वरूपात असे एकूण 20 लाख 74 हजार रुपये दिलेले होते. मात्र, त्यानंतरही आरोपी तक्रारदार यास फोन करून त्याच्या घरात आणि ऑफिसमध्ये येऊन शिवीगाळ करून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती घालत होता. तसेच त्याला उचलून घेऊन जाण्याचे सांगत जीवे ठार मारण्याची धमकी देत होता. तसेच त्याच्याकडे आणखी आठ लाख 50 हजार रुपयांची मागणी ही आरोपीने केली. त्यामुळे याप्रकरणी तक्रारदार यांनी पोलिसांकडे धाव घेतली आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार खडकी पोलिस यांनी आरोपीला अटक केली आहे.याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस पाटील करत आहे.

बारसूच्या आंदोलनात बाहेरचे लोक आले, लाठीचार्ज झाला नाही, CM शिंदेंचा दावा

मुंबई-

रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या बारसूच्या आंदोलनात बाहेरचे लोक आले आहे, मात्र कुणावरही लाठीचार्ज झालाच नाही असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केला. ते माध्यमांशी बोलत होते.राजकारणासाठी राजकारण करू नका, अहंकारामुळे त्यांनी (उद्धव ठाकरेंनी) अनेक प्रकल्प बंद केले असा टोलाही CM शिंदेंचा ठाकरेंना लगावला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी स्वतः उद्योगमंत्र्यांशी बोललो. जिल्हाधिकारी, पोेलिस अधिक्षकांशी चर्चा केली. आता तेथील परिस्थिती शांत आहे. काही लोक जे आले त्यानंतर पोेलिस व त्यांच्यात चर्चा झाली. कुठलाही लाठीचार्ज झालेला नाही. शेवटी त्यांच्या संमतीने कुठलाही प्रकल्प पुढे न्यायाचा आहे. शेतकऱ्यांचा पाठींबा आहे पण काही स्थानिक होती पण काही लोक बाहेरची लोक तिथे आली होती. परंतु कुठल्याही स्थितीत शेतकऱ्यांवर अन्याय करून जोरजबरदस्तीने कुठलीही प्रक्रीया होणार नाही. अशी सरकारची भूमिका आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, प्रकल्प त्या भागातील लोकांना रोजगार देणारा आहे. म्हणून सत्तर टक्के लोक प्रकल्पाच्या बाजूने आहेत. त्यामुळे कलेक्टर, एसपी आणि संबंधित अधिकाऱ्यांना मी प्रकल्पाचे फायदे समजून सांगा अशा सूचना केल्या आहेत. नक्कीच ते समजावून सांगतील. त्यांच्या सभा घेतल्या जातील आणि त्यांच्या संमतीनेच या प्रकल्प पुढे नेला जाईल अशी आमची भूमिका आहे. उद्योगमंत्री जातीने लक्ष ठेवून आहेत. शेतकरी, गावकऱ्यांनी शांत राहावे असे आवाहन मी करतो. त्यांच्यावर कुठलीही जबरदस्ती होणार नाही.एकनाथ शिंदे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाबाबत असा आधी प्रकार झाला होता. लोकांना प्रकल्पाचा फायदा आणि विकास समजला. स्थानिकांनाच रोजगार मिळणार, व्यापार होणार. फायदा होणार.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून हा प्रकल्प तेथे करावा असे म्हटले होते. त्यावेळी तुमची संमती होती पण आता पद गेले तर विरोध आहे, असा विरोधाला विरोध त्यांनी करायला नको. कुठलाही लाठीचार्ज झालेला नाही. हेअरिंगमध्येही सत्तर टक्के लोक प्रकल्पाच्या बाजूने होते अशी माहितीही प्रशासनाकडून मला देण्यात आली आहे. उद्योग परराज्यात जातात असा आरोप होतो. मग आपल्याकडे जर उद्योग आले तर राजकीय भांडवल केले जाते.

एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधी पक्षाला राजकारण करण्यापलीकडे सुचत नाही. अडीच वर्षे राज्याचा कारभार ठप्प होता. सर्व प्रकल्प आम्ही पुढे नेत आहोत. अहंकारामुळे प्रकल्प अडवले होते. ते आम्ही पुढे नेत आहोत. चर्चेने खासदार, आमदारांचे आणि लोकप्रतिनीधींच्या शंकाही चर्चेद्वारे दुर करायला हव्या.

ट्रॅक्टर ड्रायव्हर बाबू अन् निलूच्या लव्हस्टोरीची धमाल! रोमान्स, ऍक्शन अन् कॉमेडीचा तडका ‘टीडीएम’

पुणे- मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांचा ‘टीडीएम’ हा सिनेमा २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘ख्वाडा’ आणि ‘बबन’ प्रमाणेच वेगळ्या विषयाला वाहिलेला भाऊरावांचा ‘टीडीएम’ महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाच्या मनाला साद घालतो. पहिल्या सीनपासून ते शेवटच्या सीनपर्यंत स्क्रिनपुढून नजरही हटणार नाही, असे नजर खिळवणारे चित्रीकरण ‘टीडीएम’मध्ये पाहायला मिळते. मात्र ‘टीडीएम’चा शेवट पाहून सिनेमाचा पार्ट २ येईल की काय? असा प्रश्न उपस्थित होतोय.

‘ख्वाडा’ आणि ‘बबन’प्रमाणे ‘टीडीएम’मध्येही गावचा रांगडेपणा कुटून कुटून भरलेला आहे. गावाकडची नेत्रदीपक पहाट अन् त्याच्या सोबतीला पिंगळा या ‘टीडीएम’मधील पहिल्याच सीनने प्रत्येक प्रेक्षक मंत्रमुग्ध होतो. शेतातील कामांव्यतिरिक्त विहीर खोदणे, नदीतील वाळू काढणे अशी छोटीमोठी कामे करून आपले पोट भागवणाऱ्या गावकऱ्यांचे जीवन व सोबतीला गावच्या पातळीवर चालणारे राजकारण ‘टीडीएम’मध्ये दाखवण्यात आले आहे. याबरोबरच अभिनेता पृथ्वीराज थोरात (सिनेमातील पात्र- बाबू) आणि अभिनेत्री कालिंदी निस्ताने (सिनेमाती पात्र- नीलम) यांची खट्टी-मिठी प्रेमकहानी सिनेमाला आणखी रंगत चढवते. रोमान्सबरोबरच  कॉमेडी आणि ऍक्शनचा तडाखा प्रेक्षकांना खळखळून हसवायला आणि शिट्ट्या वाजवायला भाग पाडतो. 

‘टीडीएम’मधील डायलॉग्जही अत्यंत प्रभावी आहेत. तसेच भाऊरावांच्या मागील दोन सिनेमांप्रमाणे ‘टीडीएम’मधील गाणीही संगीतप्रेमींना आपलंसं करतील अशी आहेत. एक फूल, मन झालं मल्हारी गाण्यांनी मनात प्रेमाची लहर उठते तर बकुळा गाणं पाहून डोळ्यातून आपोआप अश्रू ओघळू लागतात. पण ‘टीडीएम’मधील खरा ट्विस्ट तर सिनेमाच्या शेवटी आहे. शेवटी बाबूला नीलमचे प्रेम तर मिळतेच, पण बाबू मोठा बिझनेसमन कसा बनतो?, याची कहानी मात्र दिग्दर्शक भाऊरावांनी अपुरी ठेवली आहे. त्यामुळे ‘टीडीएम’च्या पुढील पार्टमध्येच बाबूला यशाची किल्ली कशी सापडली?, या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना मिळेल असं वाटतंय.

68वे फिल्मफेअर अवॉर्ड्स:आज (28 एप्रिलला) कलर्स वाहिनीवर रात्री नऊ वाजता-आलिया भट्ट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, राजकुमार राव ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

मुंबई-भारतीय सिनेसृष्टीतील मानाचा समजला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. यंदा या सोहळ्याचे 68 वे वर्ष आहे. 27 एप्रिल रोजी संध्याकाळी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडलेल्या या सोहळ्याला बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली. रेड कार्पेटपासून ते स्टेजपर्यंत बॉलिवूड स्टार्सचा जलवा लक्ष वेधून घेणारा होता. अभिनेता सलमान खानने या सोहळ्यात सूत्रसंचालकाची भूमिका पार पाडली तर आयुष्मान खुराणा आणि मनीष पॉल यांचीही साथ त्याला मिळाली.या पुरस्कार सोहळ्यात आलिया भट्टचा गाजलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला तर याच चित्रपटासाठी आलियाने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली.यंदा ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘बधाई दो’ या चित्रपटांचा फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये जलवा राहिला. संजय लीला भन्साळींच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ने तब्बल 10 श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकले, तर हर्षवर्धन कुलकर्णींच्या ‘बधाई दो’ने क्रिटीक्स अवॉर्ड श्रेणीत सर्वाधिक सहा पुरस्कार जिंकले. अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र: भाग-1 शिवा’ या चित्रपटालाही चार श्रेणीत पुरस्कार मिळाले आहेत. तर ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

‘गंगूबाई काठियावाडी’मध्ये सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइनसाठी शीतल शर्माला, बेस्ट प्रोडक्शन डिझाइनसाठी सुब्रत चक्रवर्ती आणि अमित रे यांना पुरस्कार मिळाला. याच चित्रपटातील ‘ढोलिडा’ गाण्यासाठी कृती महेशला सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. सुदीप चॅटर्जी यांना याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार मिळाला.

हा पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना आज (28 एप्रिलला) कलर्स वाहिनीवर रात्री नऊ वाजता पाहायला मिळणार आहे. आलियाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाल्याने चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे अभिनंदन करत आहेत.

विजेत्यांची संपूर्ण यादी…

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट : गंगूबाई काठियावाडी
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : संजय लीला भन्साळी (गंगूबाई काठियावाडी)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता : राजकुमार राव (बधाई दो)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाडी)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : अनिल कपूर (जुग जुग जियो)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – शीबा चड्ढा (बधाई दो)
  • सर्वोत्कृष्ट संवाद : प्रकाश कपाडिया आणि उत्कर्षणी वशिष्ठ (गंगूबाई काठियावाडी)
  • सर्वोत्कृष्ट पटकथा : अक्षय घिल्डियाल, सुमन अधिकारी आणि हर्षवर्धन कुलकर्णी (बधाई दो)
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : अरिजित सिंह (‘ब्रह्मास्त्र’मधील ‘केसरिया’ गाणे)
  • सर्वोत्कृष्ट कथा : अक्षत घिल्डियाल आणि सुमन अधिकारी (बधाई दो)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स) : भूमी पेडणेकर (बधाई दो)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स) : तब्बू (भूलभुलैय्या 2)
  • सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्रिटिक्स) : हर्षवर्धन कुलकर्णी (बधाई दो)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स) : संजय मिश्रा (वध)
  • फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार 2023 : प्रेम चोप्रा
  • सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम- प्रीतम ( ब्रह्मास्त्र )
  • सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरुष – अंकुश गेडाम (झुंड)
  • सर्वोत्कृष्ट पदार्पण स्त्री – एंड्रिया केविचुसा (अनेक)
  • सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक – जसपाल सिंह संधू आणि राजीव बरनवाल (वध)
  • सर्वोत्कृष्ट गीतकार – अमिताभ भट्टाचार्य (ब्रह्मास्त्र – केसरिया गाणे)
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – कविता सेठ (जुग जुग जिओ – रंगीसारी गाणे)
  • आरडी बर्मन अवॉर्ड फॉर अपकमिंग म्यूजिक टॅलेंट – जान्हवी श्रीमानकर ढोलिदा गाणे (गंगुबाई काठियावाडी)
  • सर्वोत्कृष्ट वीएफएक्स – ब्रह्मास्त्र – रीडिफाइन
  • सर्वोत्कृष्ट एडिटिंग – निनाद खानोलकर (अ‍ॅन अ‍ॅक्शन हीरो)
  • सर्वोत्कृष्ट कॉस्टयूम डिझाइन – शीतल शर्मा (गंगुबाई काठियावाडी)
  • सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइन – सुब्रत चक्रबर्ती आणि अमित राय (गंगुबाई काठियावाडी)
  • सर्वोत्कृष्ट साउंड डिझाइन – बिश्वादीप दीपक चॅटर्जी (ब्रह्मास्त्र)
  • सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी – कृति महेश (गंगुबाई काठियावाडी – ढोलिदा गाणे)
  • सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी – सुदीप चॅटर्जी (गंगुबाई काठियावाडी)
  • सर्वोत्कृष्ट अ‍ॅक्शन – परवेज शेख (विक्रम वेधा)

शिवसेना भवन उद्धव ठाकरेंचेच, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय:

तुम्ही कोण? असा तिखट सवाल करत कोर्टाने याचिका कर्त्याला फैलावर घेतले

नवी दिल्ली-शिवसेना भवन उद्धव ठाकरेंचे की एकनाथ शिंदे यांचे? शिवसेनेच्या शाखा कोणाच्या? शिवसेनेच्या निधीवर कोणाचा हक्क? या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. कोर्टाने एकात घावात दोन तुकडे करून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावला.अॅड. आशिष गिरी यांनी यांनी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. तसेच शिवसेना भवन, शिवसेनेची संपत्ती आणि शाखा उद्धव ठाकरेंकडेच राहणार असल्याचे सांगितले.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. तब्बल 40 आमदार सोबत घेऊन ते भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. त्यांनाच शिवसेना पक्षही मिळाला. इतके झाल्यानंतर शिंदे यांनी आपण शिवसेना भवनावर दावा सांगणार नसल्याचे जाहीर केले. मात्र, अॅड. आशिष गिरी यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली. त्यात शिवसेना भवन, शिवसेना पक्षाचा निधी एकनाथ शिंदे यांना द्यावा. सोबतच शिवसेनेच्या शाखा एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात द्याव्यात, अशी मागणी केली होती.

अॅड. आशिष गिरी यांच्या या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. तेव्हा शिवसेना भवन, शाखा, पक्षाची संपत्ती एकनाथ शिंदे यांना द्यावा, अशी मागणी करणारे तुम्ही कोण? असा तिखट सवाल करत कोर्टाने याचिका कर्त्याला फैलावर घेतले. तसेच ही याचिका फेटाळून लावण्यात आली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला. आता शिवसेना भवन, शिवसेनेची संपत्ती आणि शिवसेनेच्या शाखांवरही उद्धव ठाकरे यांचा ताबा राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगपुरा भागात उभारलेल्या शिवसेना‎ भवनावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दावा सांगत ते ताब्यात घेणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र, हा खुळचटपणा असून‎ त्यांना सत्तेचा माज आला आहे, असे उत्तर शिवाई सेवा ट्रस्टचे विश्वस्त सुभाष‎ देसाई यांनी दिले होते. त्यानंतर हे प्रकरण तूर्तास तरी थंडबस्त्यात गेले आहे.

एकनाथ शिंदे यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह यापूर्वीच दिले आहे. हे नाव आणि चिन्ह आपल्यालाच मिळावे, असा दावा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी केला होता. तशी कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रे दोन्ही गटाने दिली होती. मात्र, शिवसेनेच्या मूळ घटनेत गुप्तपणे लोकशाहीविरोधी प्रथा परत आणल्या. पक्षाला खासगी जागेवर आणले. गटनेतेपदी अजय चौधरींची बेकायदेशीर निवड केली, अशी कारणे सांगून शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना दिले आहे.

वृद्ध सेवाश्रम सांगली संस्थेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सहकार्य करू- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

  सांगली, दि. 28 : वृद्ध सेवाश्रम सांगली संस्था लोकसहभागातून निराधार वृद्ध लोकांना सांभाळण्याचे चांगले कार्य करीत आहे. या संस्थेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सहकार्य करू. संस्थेस खासदार फंडातून १५ लाख रूपये देऊ, अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

            वृद्धाश्रमाचे देणगीदार स्वर्गीय विनायक राजाराम लिमये यांच्या नावे पार्श्वनाथ नगर सांगली येथे बांधावयाच्या वृध्द सेवाश्रमाच्या नविन इमारतीचा पायाभरणी शुभारंभ व कोनशिला अनावरण केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याहस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वृध्द सेवाश्रम सांगली चे अध्यक्ष तथा माजी आमदार प्रा. शरद पाटील, माजी महापौर विवेक कांबळे व संगीता खोत, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, आर्किटेक्ट प्रमोद चौगुले, प्रकाश काळे, डॉ. उदय जगदाळे, अरूण आठवले, राजेंद्र खरात आदि मान्यवर उपस्थित होते.

            केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, वृध्द सेवाश्रम सांगली संस्थेने वृध्द लोकांना सांभाळण्याची मोठी जबाबदारी घेतली असून ही संस्था सामाजिक कार्य करत आहे. सर्वांनी संस्थेच्या पाठीशी उभे राहून सामाजिक कार्यासाठी आपआपल्या मिळकतीमधून संस्थेस देणगी देणे आवश्यक आहे. जीवनात अनेक संकटे येत असतात. मुलांनी त्यांच्या आई वडिलांना सांभाळणे आवश्यक आहे. संस्थेच्या कार्याचे कौतुक करून त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

            यावेळी माजी आमदार प्रा. शरद पाटील मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या कार्याबध्दल सविस्तर माहिती दिली. तसेच वृध्द सेवाश्रम सांगली संस्थेस ज्येष्ठांबद्दल आदर्श ‍निर्माण करणारी उत्कृष्ट संस्था म्हणून भारत सरकारच्या वतीने २०१३ साली गौरविण्यात आल्याचे सांगितले.

            आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांनी मनोगत व्यक्त करताना वृध्द सेवाश्रम सांगली ही संस्था समाजाची गरज ओळखून १९७२ साली चालू केली असल्याचे सांगितले. या संस्थेची नविन इमारतीचे २० हजार स्क्वेअर फूट बांधकाम करण्यात येणार असून ही इमारत ६ मजली असणार आहे. यामध्ये मोठा हॉल, विरंगुळा केंद्र, वृध्दांसाठी दवाखाना, १८ स्वतंत्र खोल्या असणार आहेत. यासाठी २ कोटी ५० लाख रूपये इतका निधी लागणार असून ही इमारत एका वर्षात आत पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            स्वागत व प्रास्ताविकात डॉ. उदय जगदाळे यांनी संस्थेच्या कार्याबध्दल सविस्तर माहिती दिली. आभार श्री. गौंडाजे यांनी मानले.

बारसूसाठी रणात उतरलेले ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांना अटक; आंदोलकांवर अश्रूधुरांच्या नळकांड्या, पत्रकारांनाही प्रकल्पाच्या ठिकाणी जाण्यास रोखले

रत्नागिरी-राजापूर तालुक्यातील बारसू येथे 3 हजार 400 एकर जमिनीवर क्रूड रिफायनरीचा प्रकल्प प्रस्तावित आहे. बारसू रिफायनरीसाठी चाचण्या करण्यासाठी 84 कूपनलिका खोदायच्या आहेत. तसेच क्रूड टर्मिनलसाठी साठी 501 एकर जमीन लागणार आहे. ही जमिन महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या ताब्यात आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित बारसू रिफायनरीवरुन सध्या मोठा वाद सुरू आहे. या आंदोलनात सहभागी झाल्याने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांना अटक करण्यात आली आहे. यामुळे हे आंदोलन आणखी पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पोलिसांनी पत्रकारांनाही प्रकल्पाच्या ठिकाणी जाण्यापासून रोखले आहे. पोलिसांनी स्थानिकांचा विरोध बळाचा वापर करत मोडून काढला आहे, तरीही ग्रामस्थांकडून प्रकल्पाला विरोध सुरू आहे. यात आज ठाकरे गटाचे खासदार आंदोलकांच्या बाजुने उभे राहिल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

बारसूत रिफायनरीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर करण्यात आला आहे. विनायक राऊत यांनी पोलिसांकडून अमानुष अत्याचार होत असल्याचा आरोप देखील केला होता.कोकणात राजापूर बारसू सोलगाव परिसरात क्रूड ऑइल रिफायनिंग करणारी ‘रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोलियम उद्योग’ प्रस्तावित आहे. भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि., हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तावित रिफायनरीला स्थानिकांचा विरोध आहे.महाराष्ट्र शासनाचा उपक्रम म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाद्वारे हा प्रकल्प राजापूर तालुक्यातील बारसू, गोवळ, धोपेश्वर तसेच नाटे या परिसरात नियोजित आहे.

सोमवारपासून या रिफायनरी संदर्भात ड्रिलिंग करून मातीचे परिक्षण करण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकल्पात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने सगळ्या परिसरात कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू झाली आहे.प्रस्तावित रिफायनरी जेथे होणार आहे त्या माळरानावर अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. या रिफायनरीमुळे माळरानावरची एका महिलेची शेती गेली. काल आंदोलक करताना, उन्हामुळे चक्कर आल्यानंतरही तिने रुग्णालयात जाण्यासाठीही नकार दिला. राजापूरमधील महिलेने ‘जीव गेला तरी इथेच थांबेन’ असा इशारा दिला हाेता.

सोनी आपल्या नवीन झेडव्ही -१ एफ (ZV-1F) या सर्जनशीलता वाढवणाऱ्या व्लॉग कॅमेऱ्यासह व्लॉगिंग लाइनअप वाढवत आहे

नवी दिल्ली: सोनीने आज नवीन व्लॉग कॅमेराझेडव्ही -१ एफ (ZV-1F) बाजारात आणला. सर्जनशीलता, सुलभ व्लॉगिंग फंक्शन्स, अत्याधुनिक प्रगत कनेक्टिव्हिटी आणि इको फ्रेंडली वैशिष्ठ्ये यांनी भरलेला आणि ज्यांना आकर्षक फोटो आणि व्हिडिओ टिपायचे आहेत अशा व्लॉगर्स आणि कंटेंट निर्मात्यांद्वारे उत्तम परिणामांसाठी सर्रास वापरला जाईल असा (गो-टू) नवीन कॅमेरा आहे. आशयाला (कंटेंट) एकदम खास व वेगळे बनवण्यासाठी या पॉकेटच्या आकाराच्या कॅमेऱ्याला सोनीच्या नवीनतम तंत्रज्ञानासह व्लॉगिंगसाठी सानुकूल करण्यात आले आहे.

     सोनी इंडियाच्या डिजिटल इमेजिंग व्यवसाय प्रमुख श्री. मुकेश श्रीवास्तव म्हणाले, झेड व्ही-१ एफ (ZV-1F) हा एक पुढील पिढीच्या कंटेंट निर्मात्यांचा व्लॉगिंग अनुभव वाढवण्यासाठी डिझाईन केलेला कॉम्पॅक्ट कॅमेरा आहे. उच्च गुणवत्तेच्या कंटेंटच्या सतत वाढणाऱ्या मागणीमुळे निर्मात्यांना जो उत्कृष्ट दर्जाचे परिणाम देईल आणि त्याचबरोबर वापरण्यास सोपे देखील असेल आणि खास करून ज्यामधून कंटेंट वायरलेस पद्धतीने सामाईक करता येईल अशी सर्व वैशिष्ठ्ये एकत्रित एका कॅमेऱ्यात मिळतील अश्या (allinone) कॅमेऱ्याची गरज आहे, आम्ही झेड व्ही-१ एफ (ZV-1F) मध्ये इको फ्रेंडली वैशिष्ठ्ये देखील समाविष्ट केली आहेत, ज्याचा उद्देश शून्य पर्यावरणीय पाऊलखुणा (झिरो एनवायरमेंटल फूटप्रिंट) साध्य करणे आहे कारण शाश्वतता हे सोनीच्या मुख्य लक्ष्य केंद्रांपैकी एक क्षेत्र आहे.

किंमत आणि उपलब्धता:

      झेडव्ही -१ एफ (ZV-1F) संपूर्ण भारतभर ५ एप्रिल २०२३ पासून सर्व सोनी केंद्रांवर, अल्फा फ्लॅगशिप स्टोर्समध्ये, ई- कॉमर्स संकेतस्थळांवर (अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट) आणि महत्वाच्या इलेक्ट्रॉनिक दुकांनामध्ये उपलब्ध असेल.

मॉडेलकिंमत (रुपयांमध्ये)उपलब्धता
झेडव्ही -१ एफ (ZV-1F)५०,६९०/-५ एप्रिल २०२३ पासून

देशातील ९१ एफएम रेडिओ केंद्रांचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई,: देशातील रेडिओ कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी ९१ एफएम रेडिओ केंद्रांचे लोकार्पण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्रातील दुर्गम भागातील ७ एफएम केंद्रांचाही शुभारंभ झाला. डिजिटल इंडियामध्ये रेडिओला नवीन श्रोता वर्ग मिळाला. हवामानासंबंधी माहिती वेळेवर प्रसारित करण्यात ट्रान्समीटर महत्त्वाची भूमिका बजावतील आणि महिला बचत गटांसाठी ते उपयुक्त ठरतील, असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा, अहेरी तसेच नंदूरबार, हिंगोली, वाशिम, अचलपूर, सटाणा या सात ठिकाणी एमएफ केंद्रांचा शुभारंभ करण्यात आला.

देशातील १८ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ९१ एफएम ट्रान्समीटरच्या लोकार्पणप्रसंगी प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, आज ऑल इंडिया रेडिओच्या एफएम सेवेचा हा विस्तार ऑल इंडिया एफएम होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. ऑल इंडिया रेडिओच्या या एफएम प्रसारणाचा हा शुभारंभ म्हणजे देशातील ८५ जिल्ह्यांतील २ कोटी नागरिकांना भेट असल्याचे त्यांनी सांगितले.

माहितीचा वेळेवर प्रसार, शेतीसाठी हवामान अंदाज, किंवा महिला बचत गटांना नवीन बाजारपेठेशी जोडणे यामध्ये एफएम ट्रान्समीटर महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. रेडिओच्या माध्यमातून मन की बात कार्यक्रमाद्वारे स्वच्छता अभियान, बेटी बचाव, बेटी पढाव यासारख्या उपक्रमांना लोकचळवळीचे स्वरूप आल्याचे प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

नागपूर येथील राष्ट्रीय कर्करोग संस्थेचे लोकार्पण

‘एनसीआय’ मध्य भारतातील कॅन्सरच्या उपचाराचे आरोग्य मंदिर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात उत्तम उपचार यंत्रणा उभारण्यासाठी शासन कटिबद्ध

नागपूर, दि. 27 : नागपूर येथे उभ्या राहिलेल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमुळे (एनसीआय) कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही संस्था विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या मध्य भारतातील राज्यांसाठी आरोग्य मंदिर ठरत आहे. राज्यातही उत्तम आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

समृद्धी महामार्गाच्या झिरो माईल शेजारी जामठा परिसरात स्थित राष्ट्रीय कर्करोग संस्थेचे (नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट) सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते आज लोकार्पण झाले. या सोहळ्यास मुख्यमंत्री श्री. शिंदे मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष ॲड. सुनील मनोहर, माजी खासदार तथा उपाध्यक्ष अजय संचेती, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर आदी मंचावर उपस्थित होते. तर या सेवाभावी कार्यक्रमाला विधासभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उद्योग व वाणिज्य क्षेत्रातील दिग्गज सर्वश्री गौतम अडाणी, दिलीप सिंघवी, समीर मेहता, पार्थ जिंदाल आणि जयप्रकाश रेड्डी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, (एनसीआय) या संस्थेला सेवाव्रती कार्यासाठी सर्वप्रथम मनापासून शुभेच्छा देतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व मेहनतीतून ही संस्था निर्माण झाल्याचे सांगत त्यांनी श्री. फडणवीस यांचे अभिनंदन केले. राज्यासमोर आरोग्य सेवा हे मोठे आव्हान आहे. नुकताच कोरोना संकटाचा अनुभव आपण घेतला असून हवामान बदल, उष्माघात या प्रमाणेच कॅन्सर ही मोठी समस्या म्हणून पुढे येत आहे. श्री. फडणवीस यांचे वडील, त्यांचे सहकारी श्री. शैलेश जोगळेकरांच्या पत्नी आणि माझ्या आईचा मृत्यू कॅन्सरनेच झाल्याचा उल्लेख करुन या वेदनादायी आठवणी मागे ठेवत सार्वजनिक हितासाठी लोकप्रतिनिधींनी असे दृष्य कार्य करायचे असते आणि हाच मार्ग आम्ही अवलंबिल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री असताना श्री. फडणवीस यांनी विदर्भासाठी वरदान ठरणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची संकल्पना मांडली व हा प्रकल्प पूर्णत्वास घेऊन जाण्यासाठी मेहनत घेतली. या घटनेचा  साक्षीदार असल्याचे त्यांनी सांगितले. एनसीआयची नागपुरात उभारणी करण्याची संकल्पना मांडून तिही उपमुख्यमंत्र्यांनी पूर्णत्वास नेली. घेतलेले काम पूर्णत्वास नेण्याची त्यांची खुबी आहे. ही संस्था उभी राहणे मोठी उपलब्धी व ऐतिहासिक कामगिरी आहे. सर्व सामान्य रुग्णांना यामुळे मोठा दिलासा मिळेल. ही संस्था विदर्भासह महाराष्ट्र व मध्यभारतातील कॅन्सर उपचारासाठी आरोग्य मंदिर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या संस्थेला लोकप्रतिनिधींनी भेट देऊन या कार्यातून प्रेरणा घ्यावी व आपापल्या भागात अशी सेवाव्रती आरोग्य मंदिरे उभारावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली. अशा संस्थांच्या पाठीशी राज्य शासन भक्कमपणे उभे राहिल, असा विश्वासही  त्यांनी व्यक्त केला.

राज्य सरकार सर्व सामान्य जनतेला उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देत आहे. ‘मुख्यमंत्री सहायता कक्ष’, ‘महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना’ आणि ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ मधून भरघोस मदत करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

देशाला कॅन्सर मुक्त करण्यासाठी एनसीआय उपयुक्त ठरेल – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

कॅन्सरवरील उपचारासाठी आता विदर्भातील रुग्णांना मुंबई व अन्य ठिकाणी न जाता एनसीआयमध्ये नागपुरातच अत्याधुनिक उपचार घेता येणार आहेत. ही संस्था उत्तम उपचार आणि संशोधनामुळे देशाला कॅन्सरमुक्त करण्यास उपयुक्त ठरेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. अमेरिकेत कँसरच्या रुग्णांमध्ये 33 टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र, भारतात कॅन्सर रुग्णांची संख्या वाढत आहे. एनसीआय सारख्या संस्था देशात उभ्या राहिल्यास कॅन्सर रुग्णांची संख्या कमी होईल व देश या आजारापासून मुक्त होण्यास  उपयुक्त ठरतील, असेही ते म्हणाले.

कॅन्सरवरील अत्याधुनिक उपचार पद्धती व संशोधन केंद्र उभारणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विदर्भातील कॅन्सर रुग्णांना मुंबईसह देशाच्या अन्य भागात उपचारासाठी जावे लागत असे. यावर कायम तोडगा काढण्यासाठी  30 वर्षांपासून पाहिलेले स्वप्न एनसीआयच्या माध्यमातून पूर्ण झाल्याचा आनंद आहे. या संस्थेच्या माध्यमातून विदर्भ, महाराष्ट्रासह मध्य भारतातील कर्करोगाच्या रुग्णांना स्वस्तात उत्तम उपचार उपलब्ध होणार आहेत. हे कार्य पुढे घेऊन जात रुग्णांच्या नातेवाईकांच्या नि:शुल्क निवासासाठी येथे धर्मशाळा उभारण्यात येणार आहे. पूर्व विदर्भात थॅलेसेमिया आणि सिकलसेल आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असून या आजारावर संशोधन व उपचार करण्यासाठी येत्या काळात एनसीआयमध्ये संशोधन केंद्र उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

एनसीआय हा कॅन्सर उपचारासाठी एक उत्तम संस्था – सरसंघचालक डॉ मोहन भागवत

कॅन्सर हा दुर्धर आजार असून कॅन्सरग्रस्तांना आपलेपण व हिंमतीची गरज असते. नागपुरात उभी राहिलेली एनसीआय ही संस्था कॅन्सरग्रस्तांना हिंमत देणारी व त्यांच्या उपचारासाठी एक उत्तम संस्था ठरली आहे, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. डॉ. आबाजी थत्ते यांच्या नावाशी व लोकोत्तर कार्याशी जुडलेली ही संस्था कॅन्सरग्रस्तांना मोठा दिलासा देणार आहे. सरकार एकीकडे संस्था उभारतेच मात्र आरोग्य सारख्या सार्वजनिक विषयावर देशातील सर्व जनतेने स्वतःही पुढे येणे आवश्यक आहे. आरोग्य सेवेसाठी एनसीआय प्रमाणे संस्था उभारण्यासाठी समाजातील विविध घटकांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही डॉ. भागवत यांनी केले.

एनसीआयमुळे सेवेच्या संकल्पास बळ मिळेल – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा संदेश

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अपरिहार्य कारणामुळे या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. श्री.शाह यांच्या लिखित संदेशाचे वाचन नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर यांनी केले. आपल्या संदेशात शाह म्हणाले, ‘कॅन्सरपासून मुक्तीसाठी पहिले पाऊल’ हे एनसीआयचे बोधवाक्य आहे. याच वाक्याची प्रचिती या संस्थेत उपचार घेणाऱ्या रुग्णांना येत असल्याचा विश्वास व्यक्त करत एनसीआयच्या प्रेरणेतून भारत देशात सेवेच्या संकल्प कार्यास वाहिलेल्या संस्थांना बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉ आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थेच्या सहयोगाने दोन दशकांपासूनचे या संस्थेच्या निर्मितीचे स्वप्न प्रत्यक्षात येत असल्याचे समाधानही त्यांनी व्यक्त केले.

शैलेश जोगळेकर यांनी  कार्यक्रमाचे संचालन केले. तत्पूर्वी मान्यवरांनी एसीआयची पाहणी केली.