तुम्ही कोण? असा तिखट सवाल करत कोर्टाने याचिका कर्त्याला फैलावर घेतले
नवी दिल्ली-शिवसेना भवन उद्धव ठाकरेंचे की एकनाथ शिंदे यांचे? शिवसेनेच्या शाखा कोणाच्या? शिवसेनेच्या निधीवर कोणाचा हक्क? या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. कोर्टाने एकात घावात दोन तुकडे करून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावला.अॅड. आशिष गिरी यांनी यांनी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. तसेच शिवसेना भवन, शिवसेनेची संपत्ती आणि शाखा उद्धव ठाकरेंकडेच राहणार असल्याचे सांगितले.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. तब्बल 40 आमदार सोबत घेऊन ते भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. त्यांनाच शिवसेना पक्षही मिळाला. इतके झाल्यानंतर शिंदे यांनी आपण शिवसेना भवनावर दावा सांगणार नसल्याचे जाहीर केले. मात्र, अॅड. आशिष गिरी यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली. त्यात शिवसेना भवन, शिवसेना पक्षाचा निधी एकनाथ शिंदे यांना द्यावा. सोबतच शिवसेनेच्या शाखा एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात द्याव्यात, अशी मागणी केली होती.
अॅड. आशिष गिरी यांच्या या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. तेव्हा शिवसेना भवन, शाखा, पक्षाची संपत्ती एकनाथ शिंदे यांना द्यावा, अशी मागणी करणारे तुम्ही कोण? असा तिखट सवाल करत कोर्टाने याचिका कर्त्याला फैलावर घेतले. तसेच ही याचिका फेटाळून लावण्यात आली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला. आता शिवसेना भवन, शिवसेनेची संपत्ती आणि शिवसेनेच्या शाखांवरही उद्धव ठाकरे यांचा ताबा राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगपुरा भागात उभारलेल्या शिवसेना भवनावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दावा सांगत ते ताब्यात घेणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र, हा खुळचटपणा असून त्यांना सत्तेचा माज आला आहे, असे उत्तर शिवाई सेवा ट्रस्टचे विश्वस्त सुभाष देसाई यांनी दिले होते. त्यानंतर हे प्रकरण तूर्तास तरी थंडबस्त्यात गेले आहे.
एकनाथ शिंदे यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह यापूर्वीच दिले आहे. हे नाव आणि चिन्ह आपल्यालाच मिळावे, असा दावा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी केला होता. तशी कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रे दोन्ही गटाने दिली होती. मात्र, शिवसेनेच्या मूळ घटनेत गुप्तपणे लोकशाहीविरोधी प्रथा परत आणल्या. पक्षाला खासगी जागेवर आणले. गटनेतेपदी अजय चौधरींची बेकायदेशीर निवड केली, अशी कारणे सांगून शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना दिले आहे.