जलसंपदा खात्याच्या चुकीमुळे पुणे शहर पाण्यात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आक्रमक
आता तरी फडणवीसांनी आपली चूक कबूल करावी व झालेल्या प्रकाराची जबाबदारी स्वीकारून पदाचा त्याग करावा
पुणे- शहराचे खासदार तथा केंद्रीय नागरी उड्डाण, सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे शहरात आलेल्या प्रलयास राज्याचे जलसंपदा खाते जबाबदार असल्याचे म्हटले आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस हेच राज्याच्या जलसंपदा खात्याचे राज्यमंत्री असल्याने मुरलीधर मोहोळ यांनी एकप्रकारे देवेंद्र फडणवीस यांचा निष्क्रीय कारभार पुण्यातील महापूरास जबाबदार असल्याचे मान्य केले आहे.असा स्पष्ट आरोप आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)चे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे.
जगताप यांनी म्हटले आहे कि,’ याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून लाखो पुणेकरांच्या दुर्दशेस कारणीभूत ठरलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा व पुणेकरांची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे.विरोधकांनी आरोप केला तर त्याला फडणवीस नॅरेटीव्ह म्हणतात, आता स्वतःच्याच पक्षातील केंद्रीय मंत्र्यांनी पोलखोल केल्यानंतर तरी फडणवीसांनी आपली चूक कबूल करावी व झालेल्या प्रकाराची जबाबदारी स्वीकारून पदाचा त्याग करावा असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले आहे.