हटके ग्रुपचे शिरीष कुलकर्णी यांचा सन्मान ; गीतरामायणातील २० गीतांचे ११० मिनिटे शीळेवर (हनुमान ध्वनीवर) सलग सादरीकरण पुणे : आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांनी रचलेल्या आणि स्वरतीर्थ सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतरामायणातील गीतांचे शिळेद्वारे सादरीकरणाचा वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडियामध्ये विश्वविक्रम नोंदविला गेला आहे. पुण्यातील हटके म्युझिक ग्रुपचे संस्थापक शिरीष कुलकर्णी यांनी गीतरामायणातील २० गीतांचे ११० मिनिटे शीळेवर (हनुमान ध्वनीवर) सलग सादरीकरण केल्याचा विक्रम केला असून त्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
सदाशिव पेठेतील इतिहास संशोधन मंडळाच्या राजवाडे हॉल मध्ये विश्वविक्रम सन्मान सोहळा आणि विशेष हनुमान ध्वनी (शीळ) गीतरामायण मैफलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी संगीतप्रेमी अनिल मोटे, विवेक सिन्नरकर, तानसेन चौधरी, शैलेंद्र गोस्वामी, शिरीष कुलकर्णी, सुमेधा कुलकर्णी आदी उपस्थित होते.
शिरीष कुलकर्णी यांनी गीतरामायणातील २० गीते कराओके ट्रॅकवर शीळेच्या माध्यमातून सलग ११० मिनिटे सादर करून प्रस्थापित केलेल्या विश्वविक्रमाची दखल घेत वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडियाने ‘लाँगेस्ट कंटीन्यूअस विसलिंग परफॉर्मन्स ऑफ गीत रामायण सॉंग्स ऑन कराओके ट्रॅक’ या विश्वविक्रमाला अधिकृत मान्यता दिली. या विश्वविक्रम सन्मान सोहळ्यात विश्वविक्रमाचे सन्मानपत्र आणि मानचिन्ह मान्यवरकडून प्रदान करण्यात आले.
अनिल मोटे म्हणाले, हटके ग्रुपच्या माध्यमातून नवनवीन पद्धतीने गीतरामायण सादरीकरण होत आहे. त्यांनी दिलेला वसा शिरीष कुलकर्णी अत्यंत हिरीरीने सांभाळत आहेत, असेही त्यांनी सांगितले. सुमेधा कुलकर्णी यांनी, गीतरामायण शिकणे आणि सादर करणे, ही एक वेगळीच अनुभूती आहे असे सांगितले. विवेक सिन्नरकर म्हणाले, गीतरामायण हा सांस्कृतिक ठेवा असून हे संगीतपीठ आहे. रामायणात काय सांगितले आहे, हे या गीतांमधून समजते. आपल्या स्वतःमधील संघर्षावर रामायण उत्तर देते, असेही ते म्हणाले. शैलेंद्र गोस्वामी यांनी ग्लोबल जगामधील विश्वविक्रमाचे महत्व, तर तानसेन चौधरी यांनी आजच्या पिढी साठी एक नवीन उपलब्धी असे या कामगिरीचे वर्णन केले. शिरीष कुलकर्णी यांनी शिळेवर गीते सादर केली.

