पुणे, दि. २६ : खडकवासला धरण क्षेत्रात पुन्हा पावसाचे प्रमाण वाढल्यास परिस्थितीनुसार धरणातून विसर्ग करण्यात येणार असून नदीकाठच्या नागरीकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.
पुणे शहरातील नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन व त्यांची गैरसोय होऊ नये याकरीता जलसंपदा विभागाचे अधिकारी सतर्क आहेत. खडकवासला पाटबंधारे विभाग जिल्हा प्रशासन, पुणे महानगरपालिका, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासन यांच्या संपर्कात असून वेळोवेळी धरणातील पाण्याच्या विसर्गाची माहिती अवगत करीत आहे.
खडकवासला समुहातील पानशेत, वरसगाव, टेमघर व खडकवासला धरणाच्यावरील भागात २५ जुलै २०२४ रोजी पहाटे २ ते सकाळी ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत अतिवृष्टी झाली. या २४ तासांत ११८ ते ४५३.५ मी.मी. इतकी अचानक अतिवृष्टी झाली. त्याचप्रमाणे खडकवासला धरण ते पुणे शहर या भागामध्ये १०८ ते १६७.५ मी.मी. इतका पाऊस झाला व तो विक्रमी स्वरुपाचा होता. त्यामुळे खडकवासला धरणातील मोठ्या प्रमाणातील येवा तसेच शहरातील नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. या अचानक आलेल्या पाऊसामुळे धरणातील विसर्ग सोडणे आवश्यक होते. त्यानुसार नियोजन करुन नदीत पाणी सोडण्यात आले होते.
जलसंपदा विभागाने या संदर्भात सतत संनियंत्रण करुन पाणी सोडण्याची पुर्वसूचना २२ जुलै २०२४ पासून पुणे महानगरपालिका नियंत्रण कक्ष व जिल्हा आपत्ती निवारण कक्ष यांना देण्यात आली होती. जलसंपदा विभाग महानगरपालिका व जिल्हा प्रशासन यांच्यात योग्य तो समन्वय राखण्यात आलेला आहे, असेही खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे पाटबंधारे मंडळ पुणे यांनी कळविले आहे.