पुणे, दि. २६ : राज्यातील माता-भगिनीचे आर्थिक सक्षमीकरण, स्वावलंबनाला चालना देण्याकरीता सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेकरीता शिरूर नगरपरिषदेतर्फे नुकतीच विशेष मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
या विशेष मोहिमेअंतर्गत शिरूर शहरातील एकूण १० प्रभागामध्ये १२ मदत केंद्र स्थापन करण्यात आले. त्यामध्ये शिरूर शहरातील १० अंगणवाडी शाळा, शिरूर नगरपरिषद मंगल कार्यालय, शिरूर नगरपरिषद नवीन कार्यालय या ठिकाणी फॉर्म भरण्याची व्यवस्था करण्यात आली. त्याबरोबर शिरूर नगरपरिषदेतर्फे प्रत्येक प्रभागाकरिता १ वार्ड अधिकारी व १ डेटा एन्ट्री ऑपरेटर या नुसार ५ वार्ड अधिकारी व ५ ऑपरेटर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काही ठिकाणी नगरपरिषद कर्मचाऱ्यांतर्फे विशेष शिबीर आयोजित करण्यात येत असून घरोघरी जाऊनदेखील महिलांचे अर्ज भरून घेण्यात येत आहेत.
आतापर्यंत शिरूर शहरातील १२ मदत केंद्रामध्ये ३ हजार ३८९ ऑनलाईन अर्ज तर ऑफलाईन ६०९ अर्ज असे एकूण ३ हजार ९९८ अर्ज भरण्यात आले आहेत. तरी पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिरूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे केले आहे.