तुम्ही कोण? असा तिखट सवाल करत कोर्टाने याचिका कर्त्याला फैलावर घेतले
नवी दिल्ली-शिवसेना भवन उद्धव ठाकरेंचे की एकनाथ शिंदे यांचे? शिवसेनेच्या शाखा कोणाच्या? शिवसेनेच्या निधीवर कोणाचा हक्क? या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. कोर्टाने एकात घावात दोन तुकडे करून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावला.अॅड. आशिष गिरी यांनी यांनी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. तसेच शिवसेना भवन, शिवसेनेची संपत्ती आणि शाखा उद्धव ठाकरेंकडेच राहणार असल्याचे सांगितले.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. तब्बल 40 आमदार सोबत घेऊन ते भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. त्यांनाच शिवसेना पक्षही मिळाला. इतके झाल्यानंतर शिंदे यांनी आपण शिवसेना भवनावर दावा सांगणार नसल्याचे जाहीर केले. मात्र, अॅड. आशिष गिरी यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली. त्यात शिवसेना भवन, शिवसेना पक्षाचा निधी एकनाथ शिंदे यांना द्यावा. सोबतच शिवसेनेच्या शाखा एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात द्याव्यात, अशी मागणी केली होती.
अॅड. आशिष गिरी यांच्या या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. तेव्हा शिवसेना भवन, शाखा, पक्षाची संपत्ती एकनाथ शिंदे यांना द्यावा, अशी मागणी करणारे तुम्ही कोण? असा तिखट सवाल करत कोर्टाने याचिका कर्त्याला फैलावर घेतले. तसेच ही याचिका फेटाळून लावण्यात आली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला. आता शिवसेना भवन, शिवसेनेची संपत्ती आणि शिवसेनेच्या शाखांवरही उद्धव ठाकरे यांचा ताबा राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगपुरा भागात उभारलेल्या शिवसेना भवनावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दावा सांगत ते ताब्यात घेणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र, हा खुळचटपणा असून त्यांना सत्तेचा माज आला आहे, असे उत्तर शिवाई सेवा ट्रस्टचे विश्वस्त सुभाष देसाई यांनी दिले होते. त्यानंतर हे प्रकरण तूर्तास तरी थंडबस्त्यात गेले आहे.
एकनाथ शिंदे यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह यापूर्वीच दिले आहे. हे नाव आणि चिन्ह आपल्यालाच मिळावे, असा दावा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी केला होता. तशी कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रे दोन्ही गटाने दिली होती. मात्र, शिवसेनेच्या मूळ घटनेत गुप्तपणे लोकशाहीविरोधी प्रथा परत आणल्या. पक्षाला खासगी जागेवर आणले. गटनेतेपदी अजय चौधरींची बेकायदेशीर निवड केली, अशी कारणे सांगून शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना दिले आहे.
सांगली, दि. 28 : वृद्ध सेवाश्रम सांगली संस्था लोकसहभागातून निराधार वृद्ध लोकांना सांभाळण्याचे चांगले कार्य करीत आहे. या संस्थेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सहकार्य करू. संस्थेस खासदार फंडातून १५ लाख रूपये देऊ, अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.
वृद्धाश्रमाचे देणगीदार स्वर्गीय विनायक राजाराम लिमये यांच्या नावे पार्श्वनाथ नगर सांगली येथे बांधावयाच्या वृध्द सेवाश्रमाच्या नविन इमारतीचा पायाभरणी शुभारंभ व कोनशिला अनावरण केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याहस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वृध्द सेवाश्रम सांगली चे अध्यक्ष तथा माजी आमदार प्रा. शरद पाटील, माजी महापौर विवेक कांबळे व संगीता खोत, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, आर्किटेक्ट प्रमोद चौगुले, प्रकाश काळे, डॉ. उदय जगदाळे, अरूण आठवले, राजेंद्र खरात आदि मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, वृध्द सेवाश्रम सांगली संस्थेने वृध्द लोकांना सांभाळण्याची मोठी जबाबदारी घेतली असून ही संस्था सामाजिक कार्य करत आहे. सर्वांनी संस्थेच्या पाठीशी उभे राहून सामाजिक कार्यासाठी आपआपल्या मिळकतीमधून संस्थेस देणगी देणे आवश्यक आहे. जीवनात अनेक संकटे येत असतात. मुलांनी त्यांच्या आई वडिलांना सांभाळणे आवश्यक आहे. संस्थेच्या कार्याचे कौतुक करून त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी आमदार प्रा. शरद पाटील मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या कार्याबध्दल सविस्तर माहिती दिली. तसेच वृध्द सेवाश्रम सांगली संस्थेस ज्येष्ठांबद्दल आदर्श निर्माण करणारी उत्कृष्ट संस्था म्हणून भारत सरकारच्या वतीने २०१३ साली गौरविण्यात आल्याचे सांगितले.
आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांनी मनोगत व्यक्त करताना वृध्द सेवाश्रम सांगली ही संस्था समाजाची गरज ओळखून १९७२ साली चालू केली असल्याचे सांगितले. या संस्थेची नविन इमारतीचे २० हजार स्क्वेअर फूट बांधकाम करण्यात येणार असून ही इमारत ६ मजली असणार आहे. यामध्ये मोठा हॉल, विरंगुळा केंद्र, वृध्दांसाठी दवाखाना, १८ स्वतंत्र खोल्या असणार आहेत. यासाठी २ कोटी ५० लाख रूपये इतका निधी लागणार असून ही इमारत एका वर्षात आत पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वागत व प्रास्ताविकात डॉ. उदय जगदाळे यांनी संस्थेच्या कार्याबध्दल सविस्तर माहिती दिली. आभार श्री. गौंडाजे यांनी मानले.
रत्नागिरी-राजापूर तालुक्यातील बारसू येथे 3 हजार 400 एकर जमिनीवर क्रूड रिफायनरीचा प्रकल्प प्रस्तावित आहे. बारसू रिफायनरीसाठी चाचण्या करण्यासाठी 84 कूपनलिका खोदायच्या आहेत. तसेच क्रूड टर्मिनलसाठी साठी 501 एकर जमीन लागणार आहे. ही जमिन महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या ताब्यात आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित बारसू रिफायनरीवरुन सध्या मोठा वाद सुरू आहे. या आंदोलनात सहभागी झाल्याने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांना अटक करण्यात आली आहे. यामुळे हे आंदोलन आणखी पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पोलिसांनी पत्रकारांनाही प्रकल्पाच्या ठिकाणी जाण्यापासून रोखले आहे. पोलिसांनी स्थानिकांचा विरोध बळाचा वापर करत मोडून काढला आहे, तरीही ग्रामस्थांकडून प्रकल्पाला विरोध सुरू आहे. यात आज ठाकरे गटाचे खासदार आंदोलकांच्या बाजुने उभे राहिल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
बारसूत रिफायनरीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर करण्यात आला आहे. विनायक राऊत यांनी पोलिसांकडून अमानुष अत्याचार होत असल्याचा आरोप देखील केला होता.कोकणात राजापूर बारसू सोलगाव परिसरात क्रूड ऑइल रिफायनिंग करणारी ‘रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोलियम उद्योग’ प्रस्तावित आहे. भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि., हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तावित रिफायनरीला स्थानिकांचा विरोध आहे.महाराष्ट्र शासनाचा उपक्रम म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाद्वारे हा प्रकल्प राजापूर तालुक्यातील बारसू, गोवळ, धोपेश्वर तसेच नाटे या परिसरात नियोजित आहे.
सोमवारपासून या रिफायनरी संदर्भात ड्रिलिंग करून मातीचे परिक्षण करण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकल्पात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने सगळ्या परिसरात कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू झाली आहे.प्रस्तावित रिफायनरी जेथे होणार आहे त्या माळरानावर अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. या रिफायनरीमुळे माळरानावरची एका महिलेची शेती गेली. काल आंदोलक करताना, उन्हामुळे चक्कर आल्यानंतरही तिने रुग्णालयात जाण्यासाठीही नकार दिला. राजापूरमधील महिलेने ‘जीव गेला तरी इथेच थांबेन’ असा इशारा दिला हाेता.
नवी दिल्ली: सोनीने आज नवीन व्लॉग कॅमेराझेडव्ही -१ एफ (ZV-1F) बाजारात आणला. सर्जनशीलता, सुलभ व्लॉगिंग फंक्शन्स, अत्याधुनिक प्रगत कनेक्टिव्हिटी आणि इको फ्रेंडली वैशिष्ठ्ये यांनी भरलेला आणि ज्यांना आकर्षक फोटो आणि व्हिडिओ टिपायचे आहेत अशा व्लॉगर्स आणि कंटेंट निर्मात्यांद्वारे उत्तम परिणामांसाठी सर्रास वापरला जाईल असा (गो-टू) नवीन कॅमेरा आहे. आशयाला (कंटेंट) एकदम खास व वेगळे बनवण्यासाठी या पॉकेटच्या आकाराच्या कॅमेऱ्याला सोनीच्या नवीनतम तंत्रज्ञानासह व्लॉगिंगसाठी सानुकूल करण्यात आले आहे.
सोनी इंडियाच्या डिजिटल इमेजिंग व्यवसाय प्रमुख श्री. मुकेश श्रीवास्तव म्हणाले, “झेड व्ही-१ एफ(ZV-1F)हा एक पुढील पिढीच्या कंटेंट निर्मात्यांचा व्लॉगिंग अनुभव वाढवण्यासाठी डिझाईन केलेला कॉम्पॅक्ट कॅमेरा आहे. उच्च गुणवत्तेच्या कंटेंटच्या सतत वाढणाऱ्या मागणीमुळे निर्मात्यांना जो उत्कृष्ट दर्जाचे परिणाम देईल आणि त्याचबरोबर वापरण्यास सोपे देखील असेल आणि खास करून ज्यामधून कंटेंट वायरलेस पद्धतीने सामाईक करता येईल अशी सर्व वैशिष्ठ्ये एकत्रित एका कॅमेऱ्यात मिळतील अश्या (all–in–one) कॅमेऱ्याची गरज आहे, आम्ही झेड व्ही-१ एफ(ZV-1F)मध्ये इको फ्रेंडली वैशिष्ठ्ये देखील समाविष्ट केली आहेत, ज्याचा उद्देश शून्य पर्यावरणीय पाऊलखुणा (झिरो एनवायरमेंटल फूटप्रिंट) साध्य करणे आहे कारण शाश्वतता हे सोनीच्या मुख्य लक्ष्य केंद्रांपैकी एक क्षेत्र आहे.”
किंमत आणि उपलब्धता:
झेडव्ही -१ एफ(ZV-1F) संपूर्ण भारतभर ५ एप्रिल २०२३ पासून सर्व सोनी केंद्रांवर, अल्फा फ्लॅगशिप स्टोर्समध्ये, ई- कॉमर्स संकेतस्थळांवर (अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट) आणि महत्वाच्या इलेक्ट्रॉनिक दुकांनामध्ये उपलब्ध असेल.
मुंबई,: देशातील रेडिओ कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी ९१ एफएम रेडिओ केंद्रांचे लोकार्पण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्रातील दुर्गम भागातील ७ एफएम केंद्रांचाही शुभारंभ झाला. डिजिटल इंडियामध्ये रेडिओला नवीन श्रोता वर्ग मिळाला. हवामानासंबंधी माहिती वेळेवर प्रसारित करण्यात ट्रान्समीटर महत्त्वाची भूमिका बजावतील आणि महिला बचत गटांसाठी ते उपयुक्त ठरतील, असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा, अहेरी तसेच नंदूरबार, हिंगोली, वाशिम, अचलपूर, सटाणा या सात ठिकाणी एमएफ केंद्रांचा शुभारंभ करण्यात आला.
देशातील १८ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ९१ एफएम ट्रान्समीटरच्या लोकार्पणप्रसंगी प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, आज ऑल इंडिया रेडिओच्या एफएम सेवेचा हा विस्तार ऑल इंडिया एफएम होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. ऑल इंडिया रेडिओच्या या एफएम प्रसारणाचा हा शुभारंभ म्हणजे देशातील ८५ जिल्ह्यांतील २ कोटी नागरिकांना भेट असल्याचे त्यांनी सांगितले.
माहितीचा वेळेवर प्रसार, शेतीसाठी हवामान अंदाज, किंवा महिला बचत गटांना नवीन बाजारपेठेशी जोडणे यामध्ये एफएम ट्रान्समीटर महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. रेडिओच्या माध्यमातून मन की बात कार्यक्रमाद्वारे स्वच्छता अभियान, बेटी बचाव, बेटी पढाव यासारख्या उपक्रमांना लोकचळवळीचे स्वरूप आल्याचे प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
‘एनसीआय’ मध्य भारतातील कॅन्सरच्या उपचाराचे आरोग्य मंदिर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यात उत्तम उपचार यंत्रणा उभारण्यासाठी शासन कटिबद्ध
नागपूर, दि. 27 : नागपूर येथे उभ्या राहिलेल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमुळे (एनसीआय) कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही संस्था विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या मध्य भारतातील राज्यांसाठी आरोग्य मंदिर ठरत आहे. राज्यातही उत्तम आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.
समृद्धी महामार्गाच्या झिरो माईल शेजारी जामठा परिसरात स्थित राष्ट्रीय कर्करोग संस्थेचे (नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट) सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते आज लोकार्पण झाले. या सोहळ्यास मुख्यमंत्री श्री. शिंदे मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष ॲड. सुनील मनोहर, माजी खासदार तथा उपाध्यक्ष अजय संचेती, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर आदी मंचावर उपस्थित होते. तर या सेवाभावी कार्यक्रमाला विधासभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उद्योग व वाणिज्य क्षेत्रातील दिग्गज सर्वश्री गौतम अडाणी, दिलीप सिंघवी, समीर मेहता, पार्थ जिंदाल आणि जयप्रकाश रेड्डी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, (एनसीआय) या संस्थेला सेवाव्रती कार्यासाठी सर्वप्रथम मनापासून शुभेच्छा देतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व मेहनतीतून ही संस्था निर्माण झाल्याचे सांगत त्यांनी श्री. फडणवीस यांचे अभिनंदन केले. राज्यासमोर आरोग्य सेवा हे मोठे आव्हान आहे. नुकताच कोरोना संकटाचा अनुभव आपण घेतला असून हवामान बदल, उष्माघात या प्रमाणेच कॅन्सर ही मोठी समस्या म्हणून पुढे येत आहे. श्री. फडणवीस यांचे वडील, त्यांचे सहकारी श्री. शैलेश जोगळेकरांच्या पत्नी आणि माझ्या आईचा मृत्यू कॅन्सरनेच झाल्याचा उल्लेख करुन या वेदनादायी आठवणी मागे ठेवत सार्वजनिक हितासाठी लोकप्रतिनिधींनी असे दृष्य कार्य करायचे असते आणि हाच मार्ग आम्ही अवलंबिल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री असताना श्री. फडणवीस यांनी विदर्भासाठी वरदान ठरणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची संकल्पना मांडली व हा प्रकल्प पूर्णत्वास घेऊन जाण्यासाठी मेहनत घेतली. या घटनेचा साक्षीदार असल्याचे त्यांनी सांगितले. एनसीआयची नागपुरात उभारणी करण्याची संकल्पना मांडून तिही उपमुख्यमंत्र्यांनी पूर्णत्वास नेली. घेतलेले काम पूर्णत्वास नेण्याची त्यांची खुबी आहे. ही संस्था उभी राहणे मोठी उपलब्धी व ऐतिहासिक कामगिरी आहे. सर्व सामान्य रुग्णांना यामुळे मोठा दिलासा मिळेल. ही संस्था विदर्भासह महाराष्ट्र व मध्यभारतातील कॅन्सर उपचारासाठी आरोग्य मंदिर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या संस्थेला लोकप्रतिनिधींनी भेट देऊन या कार्यातून प्रेरणा घ्यावी व आपापल्या भागात अशी सेवाव्रती आरोग्य मंदिरे उभारावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली. अशा संस्थांच्या पाठीशी राज्य शासन भक्कमपणे उभे राहिल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राज्य सरकार सर्व सामान्य जनतेला उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देत आहे. ‘मुख्यमंत्री सहायता कक्ष’, ‘महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना’ आणि ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ मधून भरघोस मदत करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
देशाला कॅन्सर मुक्त करण्यासाठी एनसीआय उपयुक्त ठरेल – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
कॅन्सरवरील उपचारासाठी आता विदर्भातील रुग्णांना मुंबई व अन्य ठिकाणी न जाता एनसीआयमध्ये नागपुरातच अत्याधुनिक उपचार घेता येणार आहेत. ही संस्था उत्तम उपचार आणि संशोधनामुळे देशाला कॅन्सरमुक्त करण्यास उपयुक्त ठरेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. अमेरिकेत कँसरच्या रुग्णांमध्ये 33 टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र, भारतात कॅन्सर रुग्णांची संख्या वाढत आहे. एनसीआय सारख्या संस्था देशात उभ्या राहिल्यास कॅन्सर रुग्णांची संख्या कमी होईल व देश या आजारापासून मुक्त होण्यास उपयुक्त ठरतील, असेही ते म्हणाले.
कॅन्सरवरील अत्याधुनिक उपचार पद्धती व संशोधन केंद्र उभारणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विदर्भातील कॅन्सर रुग्णांना मुंबईसह देशाच्या अन्य भागात उपचारासाठी जावे लागत असे. यावर कायम तोडगा काढण्यासाठी 30 वर्षांपासून पाहिलेले स्वप्न एनसीआयच्या माध्यमातून पूर्ण झाल्याचा आनंद आहे. या संस्थेच्या माध्यमातून विदर्भ, महाराष्ट्रासह मध्य भारतातील कर्करोगाच्या रुग्णांना स्वस्तात उत्तम उपचार उपलब्ध होणार आहेत. हे कार्य पुढे घेऊन जात रुग्णांच्या नातेवाईकांच्या नि:शुल्क निवासासाठी येथे धर्मशाळा उभारण्यात येणार आहे. पूर्व विदर्भात थॅलेसेमिया आणि सिकलसेल आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असून या आजारावर संशोधन व उपचार करण्यासाठी येत्या काळात एनसीआयमध्ये संशोधन केंद्र उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
एनसीआय हा कॅन्सर उपचारासाठी एक उत्तम संस्था – सरसंघचालक डॉ मोहन भागवत
कॅन्सर हा दुर्धर आजार असून कॅन्सरग्रस्तांना आपलेपण व हिंमतीची गरज असते. नागपुरात उभी राहिलेली एनसीआय ही संस्था कॅन्सरग्रस्तांना हिंमत देणारी व त्यांच्या उपचारासाठी एक उत्तम संस्था ठरली आहे, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. डॉ. आबाजी थत्ते यांच्या नावाशी व लोकोत्तर कार्याशी जुडलेली ही संस्था कॅन्सरग्रस्तांना मोठा दिलासा देणार आहे. सरकार एकीकडे संस्था उभारतेच मात्र आरोग्य सारख्या सार्वजनिक विषयावर देशातील सर्व जनतेने स्वतःही पुढे येणे आवश्यक आहे. आरोग्य सेवेसाठी एनसीआय प्रमाणे संस्था उभारण्यासाठी समाजातील विविध घटकांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही डॉ. भागवत यांनी केले.
एनसीआयमुळे सेवेच्या संकल्पास बळ मिळेल – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा संदेश
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अपरिहार्य कारणामुळे या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. श्री.शाह यांच्या लिखित संदेशाचे वाचन नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर यांनी केले. आपल्या संदेशात शाह म्हणाले, ‘कॅन्सरपासून मुक्तीसाठी पहिले पाऊल’ हे एनसीआयचे बोधवाक्य आहे. याच वाक्याची प्रचिती या संस्थेत उपचार घेणाऱ्या रुग्णांना येत असल्याचा विश्वास व्यक्त करत एनसीआयच्या प्रेरणेतून भारत देशात सेवेच्या संकल्प कार्यास वाहिलेल्या संस्थांना बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉ आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थेच्या सहयोगाने दोन दशकांपासूनचे या संस्थेच्या निर्मितीचे स्वप्न प्रत्यक्षात येत असल्याचे समाधानही त्यांनी व्यक्त केले.
शैलेश जोगळेकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. तत्पूर्वी मान्यवरांनी एसीआयची पाहणी केली.
मुंबई, दि. २७ : धर्मादाय अंतर्गत येणाऱ्या रूग्णालयांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना विनामूल्य वैद्यकीय सुविधा व सवलतीच्या दरात उपचार मिळणे आवश्यक आहे. यादृष्टीने सर्व धर्मादाय रुग्णालयांसाठी आदर्श कार्यप्रणाली तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी दिले.
धर्मादाय रुग्णालयाच्या कामकाजासंदर्भात आरोग्यमंत्री श्री. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार माधुरी मिसाळ, आरोग्य विभागाचे आयुक्त धीरज कुमार, धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन यांच्यासह सार्वजनिक आरोग्य, विधी व न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. सावंत म्हणाले की, आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना जलद व तत्काळ आरोग्य सेवा उपलब्ध झाल्या पाहिजेत. यासाठी विभागाने धर्मादाय रुग्णालयात राखीव असलेल्या दहा टक्के उपलब्ध खाटांची माहिती देणारे ॲप प्राधान्याने तयार करावे. तसेच हे ॲप सर्वसामान्य नागरिकांना सहज हाताळता येईल, असे असावे. रुग्णांची शिधापत्रिका आणि तहसीलदाराने दिलेला उत्पन्नाचा दाखला या दोन कागदपत्रांव्यतिरिक्त अन्य कागदपत्रांसाठी अडवणूक होऊ नये, अशा सूचनाही मंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी दिल्या.
धर्मादाय रुग्णालयात आरोग्य सेवक पदाची भरती आरोग्य विभागाकडून तत्काळ करण्यात यावी. जेणेकरून या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना आरोग्य सेवाकामार्फत योग्य ती मदत अधिक तत्परतेने मिळेल. या योजनांचा लाभ अधिकाधिक गरीब आणि दुर्बल रुग्णांना मिळावा या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे मंत्री डॉ. सावंत यावेळी म्हणाले.
नागपूर, दि. 27 : राष्ट्रीय कर्करोग संस्था (एनसीआय) ही मध्य भारतातील सर्वात मोठी कर्करोगावर उपचार करणारी संस्था ठरली आहे. या संस्थेचा लाभ हा महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि तेलंगणा या राज्यातील कर्करुग्णांना विशेषत्वाने होणार आहे. या अद्ययावत व बहुमजली इमारतीतील बाल रुग्ण कक्षाला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देत बाल कर्करुग्णांशी संवाद साधला.
जामठा परिसरातील राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या (एनसीआय) मुख्य इमारतीमध्ये दीपप्रज्वलन करून कोनशिलेचे अनावरण सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार अजय संचेती यांच्यासह व्यापार, उद्योग क्षेत्रातील दिग्गज गौतम अदानी, दिलीप सिंघवी, समीर मेहता, पार्थ जिंदाल, जयप्रकाश रेड्डी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. यानंतर मुख्यमंत्र्यांनी बाल कर्करुग्णांच्या कक्षाला भेट देत त्यांच्याशी संवाद साधला.
राष्ट्रीय कर्करोग संस्थेचा (एनसीआय) एकूण 25 एकरचा परिसर असून 470 खाटांची व्यवस्था आहे. सध्या या ठिकाणी कर्करोगावर उपचार सुरू आहेत. 18 ऑगस्ट 2012 रोजी या संस्थेच्या निर्मितीची घोषणा करण्यात आली. 28 फेब्रुवारी 2015 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संस्थेचे भूमिपूजन करण्यात आले. 2017 मध्ये पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त उद्योजक रतन टाटा यांच्या हस्ते करण्यात आले. 2018 मध्ये बालकांसाठी 27 खाटांचा स्वतंत्र वॅार्ड सुरू करण्यात आला. त्यानंतर 2019 मध्ये विप्रो कंपनीचे माजी अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी या संस्थेची पाहणी करून कौतुक केले. 2020 मध्ये ‘आयुषमती’ या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन कर्करोगाविषयीची महिलांच्या मनातील भीती दूर व्हावी यासाठी करण्यात आले होते. आता या संपूर्ण सोईसुविधायुक्त इमारतीचे लोकार्पण करण्यात आले आहे.
पालघर दि. 27 : सिद्ध बालयोगी सदानंद महाराज यांनी समाज सुधारण्यासाठी आणि वनौषधी संगोपनासाठी विशेष कार्य केले आहे. त्यांच्या संस्थेला आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा पुरविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
श्री. सदानंद महाराज तीर्थक्षेत्र तुंगारेश्वर डोंगर (वसई) येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कोविड काळात बालयोगी सदानंद महाराज संस्थेने या परिसरातल्या लोकांसाठी उत्तम कार्य केले आहे. सर्वसामान्यांच्या दुःखात धावून जाणे ही परंपरा त्यांनी जोपासली आहे. राज्य सरकार देखील सर्वसामान्यांचे सरकार आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी जे निर्णय घेणे आवश्यक आहे, ते आम्ही आतापर्यंत घेतले आहेत. भविष्यातही सर्वसामान्यांचा विचार करूनच आवश्यक ते निर्णय घेतले जातील. सदानंद महाराजांचे कार्य निरंतर चालू राहावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केली.
या आश्रमामध्ये दिघे साहेबांसोबत येत असल्याच्या आठवणींना उजाळा देत मुख्यमंत्र्यांनी आश्रम संस्थेकडून भविष्यातही अध्यात्मिक मानवी उन्नतीसाठी आवश्यक असणारे सर्व कार्य व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी बालयोगी सदानंद महाराज, खासदार राजेंद्र गावित, सर्वश्री आमदार श्रीनिवास वनगा, राजेश पाटील, शांताराम मोरे, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, वसई – विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार आदी उपस्थित होते.
‘मराठी बिगबॉस विजेता’ अक्षय केळकर आणि ‘नागपूर सुंदरी’ आकांक्षा साखरकर यांची केमिस्ट्री! प्रेम, क्षमा आणि दुसऱ्या संधीची हृदयस्पर्शी कथा म्हणजे चित्रपट ‘बोल हरी बोल’. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता अभिनेता अक्षय केळकर, चतुरस्त्र अभिनेते रमेश वाणी, ‘नागपूर सुंदरी’ हा किताब मिळविणारी अभिनेत्री आकांक्षा साखरकर यांच्याबरोबरच प्रतिक सुरेश, मीरा पाथरकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असणारा ‘बोल हरी बोल’ हा चित्रपट येत्या २८ एप्रिलपासून एक्स्क्लुझिवली ‘अल्ट्रा झकास’ या ओटीटी प्लॅटफोर्मवर पहायला मिळणार आहे. निर्माता सुशीलकुमार अग्रवाल यांच्या ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’ची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाच दिग्दर्शन अमोल बिडकर यांनी केलं आहे. तर, काशी-रिचर्ड यांनी या चित्रपटाच संगीत केलं आहे. हिंदी, मराठीसह प्रादेशिक तसेच विदेशी मनोरंजन क्षेत्रात आपला प्रभाव निर्माण करणाऱ्या ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’ने नुकतेच ‘अल्ट्रा झकास’ हे मराठी ओटीटी प्लॅटफोर्म सुरु करून अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली आहे. प्रत्येक आठवड्याला नवीन आणि झकास कन्टेंट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार असल्याचा शब्द पाळत, ‘अल्ट्रा झकास’ , ‘बोल हरी बोल’च्या रुपात एक नवा कोरा मराठी चित्रपट रसिकांच्या भेटीला घेऊन आले आहेत. “कलाकारांची उत्तम फळी लाभलेला ‘बोल हरी बोल’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणताना आम्हाला आनंद होत आहे. शिवाय, चित्रपटाचे अनोखे कथानक आणि उत्तम संदेश सर्व वयोगटातील प्रेक्षकांसाठी पाहण्यासारखे आहे. सोबतच, ‘अल्ट्रा झकास’च्या रुपात जगभरातील मराठी रसिक प्रेक्षकांपर्यत ‘मराठी मनोरंजन’ पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.” अशी प्रतिक्रिया अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट व अल्ट्रा झकासचे एमडी आणि सीईओ सुशीलकुमार अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे. वेगळा अनुभव ‘बोल हरी बोल’ चित्रपटातील माझी भूमिका मी आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी आहे. दिलखुलास आणि मनमौजी स्वभावाच्या हरी पोंक्षेची भूमिका साकारताना मला प्रचंड मजा आली. येत्या २८ एप्रिलपासून अल्ट्रा झकास या मराठमोळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्हाला आमचा हा चित्रपट पाहता येणार आहे. माझ्या आजवरच्या सगळ्या भूमिकांवर भरभरून प्रेम केलेले तुम्ही सगळे हरी पोंक्षेवरही तेवढंच प्रेम कराल अशी खात्री आहे. -अक्षय केळकर (अभिनेता, बोल हरी बोल)
उत्सुकता शिगेला… प्रिया मालेगावकर हे चित्रपटातील पात्र मला साकारायला मिळणं ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. हे पात्र साकारण्यासाठी निर्माते आणि दिग्दर्शकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. चित्रिकरणादरम्यान अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. आता या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. -आकांक्षा साखरकर (अभिनेत्री, बोल हरी बोल)
उत्तम मांडणी असलेला चित्रपट घरोघरी घडणारी आणि आपल्या आसपास हमखास पहायला मिळणाऱ्या गोष्टींची उत्तम बांधणी म्हणजे ‘बोल हरी बोल’ हा चित्रपट. नेहमी जगाच्या दृष्टीआड असणाऱ्या बाप-मुलाच्या नात्याची गोष्ट चित्रपटात उत्तमपणे मांडण्यात आली आहे. शेरास-सव्वाशेर असं बाप-मुलाचं नातं साकारताना मला समाधान मिळालं. २८ एप्रिलपासून, आपली आवड जपणाऱ्या ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर आमचा ‘बोल हरी बोल’ हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे. -रमेश वाणी (अभिनेता, बोल हरी बोल)
‘बोल हरी बोल’ सारखा आशयघन आणि कौटुंबिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला भेटीला घेऊन येताना अत्यंत आनंद होत आहे. कलाकारांची उत्तम फळी आणि चित्रपटाला लाभलेलं सुमधूर संगीत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवेल असा विश्वास वाटतो. -अमोल बिडकर (दिग्दर्शक, बोल हरी बोल)
दोन हजार तासांपेक्षा अधिक तासांचा कन्टेंट उपलब्ध असणाऱ्या ‘अल्ट्रा झकास’वर मराठी भाषेत डब केलेले दाक्षिणात्य आणि हॉलीवूडच्या चित्रपटांबरोबरच, जुने आयकॉनीक मराठी चित्रपट आणि विविध विषयांवरील वेब सीरिज, किड्स अॅनिमेश, वेब-शो असा मनोरंजनाचा खजिना उपलब्ध आहे. ‘अल्ट्रा झकास’ हा ओटीटी प्लॅटफोर्म अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी प्ले-स्टोअर आणि अॅपल वापरकर्त्यांसाठी ॲप-स्टोअरवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्या आवडीनुसार सबस्क्रिप्शन घेऊन तुम्हाला ‘अल्ट्रा झकास’वरच्या झकास कन्टेंटचा आनंद घेता येणार आहे. १४९ रुपयांत तीन महिन्यांसाठी आणि २९९ रुपयाच्या सवलतीच्या दरात वार्षिक सबस्क्रिप्शन असणार आहे.
पुणे –महापालिका हद्दीतील पुणेकरांसाठी पाच वर्षांपूर्वी सुरु केलेल्या पंडित दिनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना आणि डॅा. श्यामा प्रसाद मुखर्जी ज्येष्ठ नागरिक मोफत आरोग्य योजना बंद न करता पुनर्रचना करुन पुन्हा करा, अशी मागणी माजी महापौर आणि भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.
माजी महापौर मोहोळ यांनी आयुक्तांकडे विमा आणि आरोग्य तपासणी योजना पनर्रचनेसर पुन्हा सुरु करण्याची मागणी केली असून मा. महापौर मोहोळ स्थायी समितीचे अध्यक्ष असताना या योजना कार्यान्वित केल्या होत्या आणि सलग पाच वर्षे सुरुही ठेवल्या. मात्र प्रशासक म्हणून अंदाजपत्रक मांडताना या योजनांना तरतूद न दिल्याने योजना बंद आहेत. या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी भेट घेत मागणीचे निवेदन दिले आहे.
याबाबत माहिती देताना मोहोळ म्हणाले, या दोन्ही योजना गरजू पुणेकरांसाठी पुन्हा सुरु होणे आवश्यक असून प्रशासनाने या योजनांची तातडीने अभ्यास करुन पुनर्रचना करावी. या योजना पुणेकरांसाठी अत्यावश्यक आहेत. त्यामुळे यावर लवकरच घेण्यात यावा’
‘ रजामुदतीच्या एकूण ९३ शिक्षकांना सेवेत कायम करणे आणि १५२ समूह संघटक आणि संघटिका यांना सेवेत कायम करणे, याही मागण्या आयुक्तांकडे केल्या आहेत. शिवाय बिबवेवाडी-धनकवडी पुनर्वसन योजनेंतर्गत वाटप करण्यात आलेल्या जवळपास ८ हजार निवासी आणि बिगरनिवासी गाळे हस्तांतरण प्रक्रियेची कार्यवाही त्वरीत करण्यात यावी, अशीही मागणी केल्याची माहिती मोहोळ यांनी दिली.
‘चांदणी चौकातील स्वराज्य शिल्पाचे काम त्वरित सुरु करा’
चांदणी चौकातील जिजाऊ मॅांसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य शिल्प साकारण्यात येणार असून या शिल्पाची निविदा प्रक्रिया लवकर करावी, अशीही मागणी मोहोळ यांनी आयुक्तांकडे केली आहे.
विभागांनी समन्वयांने काम करत मानीव अभिहस्तांतरणाच्या विशेष मोहिमेला गती द्यावी- अपर जिल्हाधिकारी अजय मोरे
पुणे, दि. २७: मानीव अभिहस्तांतरण प्रक्रिया ही सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या तसेच त्यातील सर्व सदनिकाधारकांच्या फायद्याची बाब असून त्याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे. विशेष मोहिमेत सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने अधिकाधिक संस्थांची मानीव अभिहस्तांतरण प्रक्रिया पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी अजय मोरे यांनी दिले.
मानीव अभिहस्तांतरण प्रकरणाबाबत गठित जिल्हास्तरीय समितीची सभा अपर जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. यावेळी पुणे शहरचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संजय राऊत, नोंदणी विभागाचे सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगाणे, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सूर्यकांत मोरे यांचसह पुणे शहरमधील सहकारी संस्थांचे उपनिबंधक उपस्थित होते.
एकिकृत ऑनलाईन प्रणाली विकसित करण्याबाबत विचार मानीव अभिहस्तांतरण प्रक्रिया अधिक सुलभ व गतीमान होण्यासाठी सहकार, मुद्रांक व नोंदणी विभाग, महसूल, भूमि अभिलेख आदी सर्व संबंधित विभागांसाठी एकिकृत ऑनलाईन प्रणाली विकसित करण्याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन कार्यवाही करावी, अशा सूचनाही श्री. मोरे यांनी दिल्या.
सात- बारा किंवा मिळकत पत्रिकेवर फेरफार नोंद घेण्यापूर्वी नोटीसीची गरज नाही मानीव अभिहस्तांतरणाच्या आदेशानुसार नोंदणीकृत दस्ताच्या आधारे सात- बारावर किंवा मिळकत पत्रिकेत नोंदणी करण्यासाठी गृहनिर्माण संस्था तलाठी अथवा नगर भूमापन अधिकारी यांच्याकडे अर्ज करतात. या प्रकरणात महसूल विभागातून फेर फार नोंद अभिलिखित व निर्गमित करण्यापूर्वी अशा मिळकतीमधील संबंधितांना पुन्हा नोटीस देण्याची आवश्यकता नाही. त्याबाबत सर्व संबंधितांना सूचना देण्यात येतील, असेही श्री. मोरे यांनी सांगितले.
पुणे शहरात सुमारे १९ हजार ५०० नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. यापैकी सुमारे 2 हजार संस्थांचे मानीव अभिहस्तांतरण किंवा विकसकाकडून हस्तांरण झालेले आहे. याव्यतिरिक्तच्या सुमारे साडेसतरा हजार संस्थांमधील ४० टक्के संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरणाची प्रक्रिया झाली आहे. उर्वरित संस्थांबाबत सहकार विभाग प्रयत्नशील आहे. सहकार बरोबरच मुद्रांक व नोंदणी विभाग तसेच भूमि अभिलेख विभागाचाही यात महत्त्वाची भूमिका असून समन्वयाने कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक संजय राऊत यांनी दिली,
दस्त नोंदणी वेळेस मुद्रांक व नोंदणी विभागाकडून सदनिकेच्या खरेदी- विक्रीच्या दस्ताची ‘चेंज ऑफ ॲग्रीमेंट’ ची होणारी मागणीच्या अनुषंगाने सदनिकांचा मुद्रांक शुल्क भरणा करण्यात आला असेल अशा ठिकाणी शासन निर्णयानुसार कार्यवाही अपेक्षित आहे. त्याअनुषंगाने याबाबतची प्रक्रिया अधिक सुलभ व लोकाभिमुख करण्याच्यादृष्टीने उपाययोजना सुरु केली असून त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येईल असे मुद्रांक जिल्हाधिकारी श्री. हिंगाणे यांनी सांगितले.
या बैठकीस पुणे जिल्हा गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघाचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, पिंपरी चिंचवड महानगरपालिका विशेष नियोजन प्राधिकरणचे प्रशासन अधिकारी मुकेश कोळप, पुणे शहरमधील उपनिबंधक सहकारी संस्था श्रीमती स्नेहा जोशी, नीलम पिंगळे, नागराथ कंजेरी, डी. एस. हौसारे, नारायण आघाव, डॉ. शीतल पाटील आदी उपस्थित होते.
अजय मोरे, अपर जिल्हाधिकारी, पुणे: सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या इमारती ज्या भूखंडावर उभ्या आहेत त्या भूखंडाची मालकी सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या नावे होण्यासाठी मानीव अभिहस्तांतरण प्रक्रियेची तरतूद आहे. जास्तीत जास्त गृहनिर्माण संस्थांनी मानीव अभिहस्तांतरणाच्या विशेष मोहिमेमध्ये सहभागी होत मोहिमेचा लाभ घ्यावा.
संजय राऊत, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर: मानीव अभिहस्तांतरण प्रक्रियेत आवश्यक कागदपत्रांची संख्या अतिशय कमी करण्यात आली असून संस्थांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे प्रकरणे दाखल करावीत. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने मानीव अभिहस्तांतरणाचा आदेश व प्रमाणपत्र देणे हा एक टप्पा असून त्यानंतर मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी अभिनिर्णयाचा अंतिम आदेश देणे व त्यानुसार दुय्यम निबंधकांकडे दस्त नोंदणी केल्यानंतरच सात बारा किंवा मिळकत पत्रिकेत भोगवटदार म्हणून नाव लागते. त्यामुळे संस्थांनी दस्त नोंदणी व त्यापुढील प्रकियेलाही तितकेच महत्त्व द्यावे.* 0000
पुणे : दि.२७ : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने हातकागद संस्था शिवाजीनगर येथे १ ते ३ मे दरम्यान मातीकला वस्तूंचे राज्यस्तरीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते सोमवार १ मे रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे, मुख्य कार्यकारी अधिकारी अन्शू सिन्हा, खादी आयोगाचे राज्य संचालक योगेश भामरे, उद्योजक श्रीकांत बडवे उपस्थित राहणार आहेत.
या व्यवसायातील कारागिरांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. प्रदर्शनात सुमारे तीस स्टॉल असणार आहेत. कुंभारी पारंपरिक भांडी, माठ ते अत्याधुनिक अशा विविध कलात्मक वस्तूंचा समावेश असणार आहे.
अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दु.क्र.०२०-२९७०१८३८ वर संपर्क साधावा. या प्रदर्शनाला अधिकाधिक नागरिकांनी भेट द्यावे, असे आवाहन सभापती रवींद्र साठे यांनी केले आहे. 000
पुणे, दि. २७: राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत राज्यातील निवडणूकीस पात्र कृषि उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरु असून याअंतर्गत १४७ बाजार समित्यांचे मतदान २८ एप्रिल तर ८८ बाजार समित्यांचे मतदान ३० एप्रिल रोजी होणार आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी.एल. खंडागळे यांनी दिली आहे.
प्राधिकरणाने २१ मार्चच्या आदेशानुसार २५३ कृषि उत्पन्न बाजार समित्याची निवडणूक प्रक्रिया सुरू केली होती. त्यतील १८ बाजार समित्यांची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. उर्वरित २३५ बाजार समित्यांसाठी मतदान होणार आहे.
या निवडणुकीअंतर्गत एकूण ४ हजार ५९० जागा निवडून द्यायच्या होत्या. त्यापैकी सहकारी संस्थांच्या मतदार संघामध्ये २ हजार ८०५ पदांपैकी १८ जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित जागांसाठी ६ हजार २३० उमेदवार निवडणूक लढवत आहेत. ग्रामपंचायतींच्या मतदार संघात १ हजार २० पदांपैकी २१ जागा बिनविरोध झाल्या असून २ हजार ४५७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. व्यापारी/अडते मतदार संघात ५१० पदांपैकी ४९ बिनविरोध तर उर्वरित जागांसाठी १ हजार ५२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हमाल/मापारी मतदार संघामध्ये २५५ पदांपैकी ६४ जागा बिनविरोध झाल्या असून ६०६ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
२८ एप्रिल रोजी मतदान होणाऱ्या १४७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांपैकी ३७ बाजार समित्यांची मतमोजणी २८ एप्रिल रोजी, ९५ समित्यांची मतमोजणी २९ एप्रिल रोजी तर १५ समित्यांची मतमोजणी १ मे रोजी होणार आहे. ८८ पैकी ७८ समित्यांची मतमोजणी ३० एप्रिल रोजी तर १० समित्यांची मतमोजणी १ मे रोजी होणार आहे, असेही डॉ. खंडागळे यांनी कळविले आहे. 0000
नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख आणि भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर ऑलिम्पिक विजेत्या महिला खेळाडूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. न्यायासाठी हे खेळाडू दिल्लतील जंतरमंतर मैदानावर आंदोलनासाठी बसल्या आहेत. या खेळाडूंना अभिनेत्री आणि शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच मीडिया, गृहमंत्री अमित शहा, क्रिडा मंत्री अनुराग ठाकूर यांना काही सवालही केले आहेत.मातोंडकर यांनी आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ संदेश पोस्ट केला आहे. यात त्या म्हणतात, “या देशाच्या मुली तसेच तुमच्या आणि माझ्या घरात बसलेल्या प्रत्येक मुलींच्यावतीनं मी आज तुमच्याशी बोलत आहे. आपल्या देशाच्या त्या मुली ज्यांनी देशासाठी मान-सन्मान आणि अनेक मेडल्स आणले. त्या मुली जंतर-मंतरवर धरणे आंदोलन करत आहेत, कारण त्यांना न्याय हवा आहे.
“त्या अशा देशात न्यायाची भीक मागत आहेत जिथं प्रत्येक स्त्रीला देवीचा दर्जा दिला जातो. या मुलींना समाजात येऊन आपलं लैंगिक शोषण झाल्याचं सांगणं ही खूप मोठी गोष्ट असते. आपल्या क्षेत्रात झालेल्या चुकीच्या गोष्टींवर आज या मुली आवाज उठवत आहेत. उद्या याच गोष्टी दुसऱ्या मुलींबाबतही होऊ शकतात. इतरही ठिकाणी होऊ शकतात. आज जर या मुलींसोबत न्याय झाला नाही तर खूपच उशीर होईल”
“मला तुम्हाला आज हे विचारायचं आहे की, या मुली जेव्हा देशासाठी मेडल्स घेऊन येतात. तेव्हा सर्व मंत्री त्यांच्यामागे पुढे पळत असतात कारण त्यांच्यासोबत फोटो काढून ट्विट करता यावं, आज हे सर्वजण कुठे गेलेत? ते सर्व मीडियाचे लोक कुठे आहेत? जे छोट्या छोट्या गोष्टींच्या मोठमोठ्या बातम्या करतात आणि लोकांपर्यंत पोहोचवतात. मीडियासाठी ही इतकी मोठी बातमी देशासमोर आणावीशी वाटत नाही का?”
“सर्वांत महत्वाची गोष्ट मी गृहमंत्री आणि क्रिडा मंत्री यांना नम्रपणे निवेदन करते की, कृपया या मुलींना न्याय मिळवून द्यावा. त्यांची साकडं ऐकावं. कारण जर तुम्हीच त्यांच्यासोबत उभे राहिला नाहीत तर याच क्षेत्रात काय इतर कुठल्याही क्षेत्रात ‘बेटी बचाव’च्या घोषणा देण्याचा अर्थ काय राहतो?” असा सवालही उर्मिला मातोंडकर यांनी केला आहे.