रत्नागिरी-राजापूर तालुक्यातील बारसू येथे 3 हजार 400 एकर जमिनीवर क्रूड रिफायनरीचा प्रकल्प प्रस्तावित आहे. बारसू रिफायनरीसाठी चाचण्या करण्यासाठी 84 कूपनलिका खोदायच्या आहेत. तसेच क्रूड टर्मिनलसाठी साठी 501 एकर जमीन लागणार आहे. ही जमिन महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या ताब्यात आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित बारसू रिफायनरीवरुन सध्या मोठा वाद सुरू आहे. या आंदोलनात सहभागी झाल्याने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांना अटक करण्यात आली आहे. यामुळे हे आंदोलन आणखी पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पोलिसांनी पत्रकारांनाही प्रकल्पाच्या ठिकाणी जाण्यापासून रोखले आहे. पोलिसांनी स्थानिकांचा विरोध बळाचा वापर करत मोडून काढला आहे, तरीही ग्रामस्थांकडून प्रकल्पाला विरोध सुरू आहे. यात आज ठाकरे गटाचे खासदार आंदोलकांच्या बाजुने उभे राहिल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
बारसूत रिफायनरीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर करण्यात आला आहे. विनायक राऊत यांनी पोलिसांकडून अमानुष अत्याचार होत असल्याचा आरोप देखील केला होता.कोकणात राजापूर बारसू सोलगाव परिसरात क्रूड ऑइल रिफायनिंग करणारी ‘रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोलियम उद्योग’ प्रस्तावित आहे. भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि., हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तावित रिफायनरीला स्थानिकांचा विरोध आहे.महाराष्ट्र शासनाचा उपक्रम म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाद्वारे हा प्रकल्प राजापूर तालुक्यातील बारसू, गोवळ, धोपेश्वर तसेच नाटे या परिसरात नियोजित आहे.
सोमवारपासून या रिफायनरी संदर्भात ड्रिलिंग करून मातीचे परिक्षण करण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकल्पात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने सगळ्या परिसरात कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू झाली आहे.प्रस्तावित रिफायनरी जेथे होणार आहे त्या माळरानावर अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. या रिफायनरीमुळे माळरानावरची एका महिलेची शेती गेली. काल आंदोलक करताना, उन्हामुळे चक्कर आल्यानंतरही तिने रुग्णालयात जाण्यासाठीही नकार दिला. राजापूरमधील महिलेने ‘जीव गेला तरी इथेच थांबेन’ असा इशारा दिला हाेता.