नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख आणि भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर ऑलिम्पिक विजेत्या महिला खेळाडूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. न्यायासाठी हे खेळाडू दिल्लतील जंतरमंतर मैदानावर आंदोलनासाठी बसल्या आहेत. या खेळाडूंना अभिनेत्री आणि शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच मीडिया, गृहमंत्री अमित शहा, क्रिडा मंत्री अनुराग ठाकूर यांना काही सवालही केले आहेत.मातोंडकर यांनी आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ संदेश पोस्ट केला आहे. यात त्या म्हणतात, “या देशाच्या मुली तसेच तुमच्या आणि माझ्या घरात बसलेल्या प्रत्येक मुलींच्यावतीनं मी आज तुमच्याशी बोलत आहे. आपल्या देशाच्या त्या मुली ज्यांनी देशासाठी मान-सन्मान आणि अनेक मेडल्स आणले. त्या मुली जंतर-मंतरवर धरणे आंदोलन करत आहेत, कारण त्यांना न्याय हवा आहे.
“त्या अशा देशात न्यायाची भीक मागत आहेत जिथं प्रत्येक स्त्रीला देवीचा दर्जा दिला जातो. या मुलींना समाजात येऊन आपलं लैंगिक शोषण झाल्याचं सांगणं ही खूप मोठी गोष्ट असते. आपल्या क्षेत्रात झालेल्या चुकीच्या गोष्टींवर आज या मुली आवाज उठवत आहेत. उद्या याच गोष्टी दुसऱ्या मुलींबाबतही होऊ शकतात. इतरही ठिकाणी होऊ शकतात. आज जर या मुलींसोबत न्याय झाला नाही तर खूपच उशीर होईल”
“मला तुम्हाला आज हे विचारायचं आहे की, या मुली जेव्हा देशासाठी मेडल्स घेऊन येतात. तेव्हा सर्व मंत्री त्यांच्यामागे पुढे पळत असतात कारण त्यांच्यासोबत फोटो काढून ट्विट करता यावं, आज हे सर्वजण कुठे गेलेत? ते सर्व मीडियाचे लोक कुठे आहेत? जे छोट्या छोट्या गोष्टींच्या मोठमोठ्या बातम्या करतात आणि लोकांपर्यंत पोहोचवतात. मीडियासाठी ही इतकी मोठी बातमी देशासमोर आणावीशी वाटत नाही का?”
“सर्वांत महत्वाची गोष्ट मी गृहमंत्री आणि क्रिडा मंत्री यांना नम्रपणे निवेदन करते की, कृपया या मुलींना न्याय मिळवून द्यावा. त्यांची साकडं ऐकावं. कारण जर तुम्हीच त्यांच्यासोबत उभे राहिला नाहीत तर याच क्षेत्रात काय इतर कुठल्याही क्षेत्रात ‘बेटी बचाव’च्या घोषणा देण्याचा अर्थ काय राहतो?” असा सवालही उर्मिला मातोंडकर यांनी केला आहे.