‘एनसीआय’ मध्य भारतातील कॅन्सरच्या उपचाराचे आरोग्य मंदिर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यात उत्तम उपचार यंत्रणा उभारण्यासाठी शासन कटिबद्ध
नागपूर, दि. 27 : नागपूर येथे उभ्या राहिलेल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमुळे (एनसीआय) कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही संस्था विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या मध्य भारतातील राज्यांसाठी आरोग्य मंदिर ठरत आहे. राज्यातही उत्तम आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.
समृद्धी महामार्गाच्या झिरो माईल शेजारी जामठा परिसरात स्थित राष्ट्रीय कर्करोग संस्थेचे (नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट) सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते आज लोकार्पण झाले. या सोहळ्यास मुख्यमंत्री श्री. शिंदे मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष ॲड. सुनील मनोहर, माजी खासदार तथा उपाध्यक्ष अजय संचेती, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर आदी मंचावर उपस्थित होते. तर या सेवाभावी कार्यक्रमाला विधासभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उद्योग व वाणिज्य क्षेत्रातील दिग्गज सर्वश्री गौतम अडाणी, दिलीप सिंघवी, समीर मेहता, पार्थ जिंदाल आणि जयप्रकाश रेड्डी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, (एनसीआय) या संस्थेला सेवाव्रती कार्यासाठी सर्वप्रथम मनापासून शुभेच्छा देतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व मेहनतीतून ही संस्था निर्माण झाल्याचे सांगत त्यांनी श्री. फडणवीस यांचे अभिनंदन केले. राज्यासमोर आरोग्य सेवा हे मोठे आव्हान आहे. नुकताच कोरोना संकटाचा अनुभव आपण घेतला असून हवामान बदल, उष्माघात या प्रमाणेच कॅन्सर ही मोठी समस्या म्हणून पुढे येत आहे. श्री. फडणवीस यांचे वडील, त्यांचे सहकारी श्री. शैलेश जोगळेकरांच्या पत्नी आणि माझ्या आईचा मृत्यू कॅन्सरनेच झाल्याचा उल्लेख करुन या वेदनादायी आठवणी मागे ठेवत सार्वजनिक हितासाठी लोकप्रतिनिधींनी असे दृष्य कार्य करायचे असते आणि हाच मार्ग आम्ही अवलंबिल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री असताना श्री. फडणवीस यांनी विदर्भासाठी वरदान ठरणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची संकल्पना मांडली व हा प्रकल्प पूर्णत्वास घेऊन जाण्यासाठी मेहनत घेतली. या घटनेचा साक्षीदार असल्याचे त्यांनी सांगितले. एनसीआयची नागपुरात उभारणी करण्याची संकल्पना मांडून तिही उपमुख्यमंत्र्यांनी पूर्णत्वास नेली. घेतलेले काम पूर्णत्वास नेण्याची त्यांची खुबी आहे. ही संस्था उभी राहणे मोठी उपलब्धी व ऐतिहासिक कामगिरी आहे. सर्व सामान्य रुग्णांना यामुळे मोठा दिलासा मिळेल. ही संस्था विदर्भासह महाराष्ट्र व मध्यभारतातील कॅन्सर उपचारासाठी आरोग्य मंदिर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या संस्थेला लोकप्रतिनिधींनी भेट देऊन या कार्यातून प्रेरणा घ्यावी व आपापल्या भागात अशी सेवाव्रती आरोग्य मंदिरे उभारावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली. अशा संस्थांच्या पाठीशी राज्य शासन भक्कमपणे उभे राहिल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राज्य सरकार सर्व सामान्य जनतेला उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देत आहे. ‘मुख्यमंत्री सहायता कक्ष’, ‘महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना’ आणि ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ मधून भरघोस मदत करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
देशाला कॅन्सर मुक्त करण्यासाठी एनसीआय उपयुक्त ठरेल – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
कॅन्सरवरील उपचारासाठी आता विदर्भातील रुग्णांना मुंबई व अन्य ठिकाणी न जाता एनसीआयमध्ये नागपुरातच अत्याधुनिक उपचार घेता येणार आहेत. ही संस्था उत्तम उपचार आणि संशोधनामुळे देशाला कॅन्सरमुक्त करण्यास उपयुक्त ठरेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. अमेरिकेत कँसरच्या रुग्णांमध्ये 33 टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र, भारतात कॅन्सर रुग्णांची संख्या वाढत आहे. एनसीआय सारख्या संस्था देशात उभ्या राहिल्यास कॅन्सर रुग्णांची संख्या कमी होईल व देश या आजारापासून मुक्त होण्यास उपयुक्त ठरतील, असेही ते म्हणाले.
कॅन्सरवरील अत्याधुनिक उपचार पद्धती व संशोधन केंद्र उभारणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विदर्भातील कॅन्सर रुग्णांना मुंबईसह देशाच्या अन्य भागात उपचारासाठी जावे लागत असे. यावर कायम तोडगा काढण्यासाठी 30 वर्षांपासून पाहिलेले स्वप्न एनसीआयच्या माध्यमातून पूर्ण झाल्याचा आनंद आहे. या संस्थेच्या माध्यमातून विदर्भ, महाराष्ट्रासह मध्य भारतातील कर्करोगाच्या रुग्णांना स्वस्तात उत्तम उपचार उपलब्ध होणार आहेत. हे कार्य पुढे घेऊन जात रुग्णांच्या नातेवाईकांच्या नि:शुल्क निवासासाठी येथे धर्मशाळा उभारण्यात येणार आहे. पूर्व विदर्भात थॅलेसेमिया आणि सिकलसेल आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असून या आजारावर संशोधन व उपचार करण्यासाठी येत्या काळात एनसीआयमध्ये संशोधन केंद्र उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
एनसीआय हा कॅन्सर उपचारासाठी एक उत्तम संस्था – सरसंघचालक डॉ मोहन भागवत
कॅन्सर हा दुर्धर आजार असून कॅन्सरग्रस्तांना आपलेपण व हिंमतीची गरज असते. नागपुरात उभी राहिलेली एनसीआय ही संस्था कॅन्सरग्रस्तांना हिंमत देणारी व त्यांच्या उपचारासाठी एक उत्तम संस्था ठरली आहे, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. डॉ. आबाजी थत्ते यांच्या नावाशी व लोकोत्तर कार्याशी जुडलेली ही संस्था कॅन्सरग्रस्तांना मोठा दिलासा देणार आहे. सरकार एकीकडे संस्था उभारतेच मात्र आरोग्य सारख्या सार्वजनिक विषयावर देशातील सर्व जनतेने स्वतःही पुढे येणे आवश्यक आहे. आरोग्य सेवेसाठी एनसीआय प्रमाणे संस्था उभारण्यासाठी समाजातील विविध घटकांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही डॉ. भागवत यांनी केले.
एनसीआयमुळे सेवेच्या संकल्पास बळ मिळेल – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा संदेश
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अपरिहार्य कारणामुळे या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. श्री.शाह यांच्या लिखित संदेशाचे वाचन नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर यांनी केले. आपल्या संदेशात शाह म्हणाले, ‘कॅन्सरपासून मुक्तीसाठी पहिले पाऊल’ हे एनसीआयचे बोधवाक्य आहे. याच वाक्याची प्रचिती या संस्थेत उपचार घेणाऱ्या रुग्णांना येत असल्याचा विश्वास व्यक्त करत एनसीआयच्या प्रेरणेतून भारत देशात सेवेच्या संकल्प कार्यास वाहिलेल्या संस्थांना बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉ आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थेच्या सहयोगाने दोन दशकांपासूनचे या संस्थेच्या निर्मितीचे स्वप्न प्रत्यक्षात येत असल्याचे समाधानही त्यांनी व्यक्त केले.
शैलेश जोगळेकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. तत्पूर्वी मान्यवरांनी एसीआयची पाहणी केली.