Home Blog Page 1555

मनु कुमार श्रीवास्तव यांनी घेतली राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्तपदाची शपथ

मुंबई, दि. 4 : लोकायुक्त न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे यांनी मनु कुमार श्रीवास्तव यांना राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त पदाची शपथ दिली.

आज मंत्रालयात राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त, आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्त या पदांच्या शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बलदेव हरपाल सिंग यांना राज्य लोकसेवा हक्क आयुक्त पदाची (कोकण, महसूल विभाग) आणि भूपेंद्र एम.गुरव यांना राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ न्यायमूर्ती श्री. कानडे यांनी दिली.

या सोहळ्यास मुख्य सचिव मनोज सौनिक, उपलोकायुक्त संजय भाटिया, सर्व विभागीय लोकसेवा हक्क आयुक्त, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकसेवा हक्क आयुक्त, पुणे दिलीप शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वरिष्ठ सहायक संचालक मीनल जोगळेकर यांनी केले.

प्रतिसाद वाढल्याने छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांना आणखी वेग द्या- मुख्य अभियंता राजेंद्र पवार

४१ अभियंत्यांसह एजन्सीजच्या प्रतिनिधींची संयुक्त कार्यशाळा

पुणे, दि. ४ मे २०२३: पुणे परिमंडलामध्ये छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या उभारणीसाठी वीजग्राहकांकडून प्रतिसाद वाढत आहे. आतापर्यंत छतावरील सौर ऊर्जेचे लघु व उच्चदाबाचे घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील ११ हजार ७०० पेक्षा अधिक प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. या योजनेस आणखी वेग देण्यासोबतच सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी करताना विद्युत सुरक्षेकडे अधिक लक्ष द्यावे असे निर्देश मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी दिले आहेत.

छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीसाठी प्रत्यक्ष काम करणारे सर्व ४१ उपविभाग कार्यालयांतील सहायक अभियंता (गुणवत्ता नियंत्रण) आणि सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करणाऱ्या एजन्सीजच्या प्रतिनिधींची संयुक्त कार्यशाळा रास्तापेठ येथील सर मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या बहुउद्देशीय सभागृहात नुकतीच झाली. यावेळी मुख्य अभियंता श्री. पवार बोलत होते. अधीक्षक अभियंता श्री. प्रकाश राऊत व श्री. सतीश राजदीप यांच्यासह सर्व विभागाचे कार्यकारी अभियंत्यांची कार्यशाळेत प्रमुख उपस्थिती होती.

मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार म्हणाले की, छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी गेल्या तीन-चार महिन्यांपासून अभियंता, कर्मचाऱ्यांना व एजन्सीजच्या प्रतिनिधींना प्रशिक्षण तसेच तांत्रिक व प्रशासकीय गतिमानतेतून वेग देण्यात आला आहे. यासह महावितरण आणि एजन्सीजच्या प्रतिनिधींसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यापुढे दोहोंच्या समन्वयातून वीजग्राहकांकडील सौर ऊर्जा प्रकल्प विनाविलंब मार्गी लागतील अशी अपेक्षा श्री. पवार यांनी व्यक्त केली.  

या कार्यशाळेत महावितरणचे सहायक अभियंता व एजन्सीजच्या प्रतिनिधींनी छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांना गती देण्याच्या विविध मुद्द्यांवर सांगोपांग चर्चा केली. त्यातून अनेक अडचणींचे मुद्दे व प्रश्न निकाली काढण्यात आले. तसेच तांत्रिक व प्रशासकीय कार्यवाहीची माहिती देत मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर पुणे परिमंडलासाठी महावितरण व एजन्सीजच्या संबंधित कामांसाठी संयुक्त कृती आराखडा ठरविण्यात आला. या कार्यशाळेचे समन्वयक म्हणून उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पटनी यांनी काम पाहिले. महावितरणच्या अभियंत्यांसह स्मिता जाधव, समीर गांधी यांच्यासह महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोशिएशनचे (MASMA), ऑल इंडिया रिन्यूऐबल एनर्जी असोशिएशनच्या (AIREA) तसेच इतर एजन्सीजचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

स्वच्छ भारत अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे दि.४- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू २०१४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप आले असून यात देशातील सर्व नागरिकांचा सहभाग असल्याने अभियान यशस्वी ठरले आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

पुणे महानगरपालिका येथे दक्षिण गोलार्धातील विविध देशांच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसमवेत पुणे शहरातील शाश्वत कचरा व्यवस्थापन आणि पुणे महानगरपालिका व कचरा वाचकांच्या स्वच्छ मॉडेल संदर्भातील चर्चेच्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, विशेष कार्य अधिकारी राजेंद्र मुठे, सेंटर फॉर सायन्स ॲण्ड एन्व्हायर्नमेंटचे प्रमुख अतुल विश्वास आदी उपस्थित होते.

श्री.पाटील म्हणाले, स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशात विविध चांगले उपक्रम राबविण्यात आले. पुणे शहरानेदेखील अभियान यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. येथील ‘स्वच्छ मॉडेल’ यशस्वी ठरले आहे. जगातील प्रतिनिधींनी या कार्याची दखल घेणे ही अभिमानाची गोष्ट आहे. शहराला भेट देण्यासाठी आलेले प्रतिनिधी हे आपापल्या देशातील महत्वाचे अधिकारी असून त्यांच्या देशातील घनकचरा व्यवस्थापनासाठी ही भेट उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, देशात स्वच्छ भारत अभियानाला चांगले यश मिळाले आहे. या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्यात येत आहेत. दक्षिण गोलार्धातील विविध देशांच्या प्रतिनिधींनी पुण्याच्या घनकचरा व्यवस्थापन यंत्रणेचे कौतुक करणे ही शहरासाठी चांगली बाब असून शहर अधिक स्वच्छ ठेवण्यासाठी कर्मचारी आणि नागरिकांना त्यातून प्रोत्साहन मिळेल.

श्री.विश्वास म्हणाले, उत्तम नेतृतव आणि प्रशासकीय पातळीवरील तेवढेच चांगले प्रयत्न यामुहे स्वच्छ भारत अभियान यशस्वी ठरले आहे. पुण्यातील ‘स्वच्छ मॉडेल’ जगात वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. पाच दिवसाचा दौरा सर्व प्रतिनिधींसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

श्री.खेमनार यांनी प्रास्ताविकात विविध देशातील प्रतिनिधींच्या भेटीविषयी माहिती दिली. १९ देशांचे ३८ प्रतिनिधी शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा अभ्यास करण्यासाठी आले असून त्यात १५ अफ्रीकन देश आणि इतर अशियातील देशांचे प्रतिनिधी आहेत. सेंटर फॉर सायन्स ॲण्ड एन्व्हायर्नमेंटने या भेटीचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था व कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत समितीच्या संस्थापक लक्ष्मी नारायण यांनी कचरा वेचकांच्या कामाची पद्धत, स्वच्छ व केकेपीकेपी संस्थेची स्थापना व कामकाज याविषयी माहिती दिली.

पुण्यात १० मे रोजी ‘रोजगार मेळावा; दरमहा दुसऱ्या बुधवारी आयोजन

पुणे, दि. ४: नोकरी इच्छुक युवक-युवतींना नामवंत खाजगी कंपन्या, कारखाने, उद्योगसमूह यांच्या माध्यमातून उत्तमोत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने प्रत्येक महिन्याला रोजगार मेळावा अर्थात ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’चे आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत २०२३-२४ मधील दुसरा रोजगार मेळावा येत्या १० मे २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हे कार्यालय वेळोवेळी जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात रोजगार मेळावे आयोजित करुन, सर्व स्तरातील जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न सातत्याने करीत आहे. याचाच एक पुढील टप्पा म्हणून आता प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी या कार्यालयामध्येच प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याप्रसंगी विविध पदांकरिता वेगवेगळ्या पात्रतेच्या उमेदवारांची तात्काळ नोकरभरती आवश्यक आहे अशा कंपन्यांच्या प्रतिनिधींना या कार्यालयात उमेदवारांच्या थेट प्रत्यक्ष मुलाखती घेण्याकरिता पाचारण करण्यात येणार आहे. या मुलाखतींना प्रत्यक्ष हजर राहून पात्र होतील अशा उमेदवारांना लगेच जागेवरच नोकरीची संधी मिळणार आहे.

पुणे जिल्ह्यातील नोकरीइच्छुक युवक-युवतींनी या संधीचा लाभ व अधिक माहिती घेण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. नोंदणी नसल्यास प्रथम आपली नावनोंदणी करावी आणि होमपेजवरील नोकरीसाधक (जॉब सीकर) लॉगीन मधून आपापल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगीन करावे.

उमेदवारांनी लॉगीन केल्यानंतर डॅशबोर्ड मधील ‘पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर’ या बटनावर क्लिक करुन प्रथम पुणे विभाग व नंतर पुणे जिल्हा निवडून त्यातील ‘2nd PLACEMENT DRIVE-PUNE’ या रोजगार मेळाव्याची निवड करावी. उद्योजकनिहाय त्यांच्याकडील रिक्तपदांची माहिती घ्यावी आणि आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करुन उचित असलेल्या रिक्तपदासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला पसंतीक्रम नोंदवावा.

ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांनी बुधवार १० मे रोजी समक्ष जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे-११ येथे आपल्या सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहून या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी व्हावे आणि रोजगाराच्या या महापर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्र. सहाय्यक आयुक्त सागर मोहिते यांनी केले आहे.

रोहित पवारांच्या साखर कारखान्याला साडेचार लाखांचा दंड; भाजप आमदार राम शिंदेंच्या तक्रारीनंतर कारवाई

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना एक जोरदार झटका बसला आहे. त्यांच्या बारामती अॅग्रो साखर कारखान्याला साखर आयुक्तांनी साडेचार लाखांचा दंड ठोठावला आहे. याप्रकरणी भाजपचे आमदार राम शिंदे यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांच्या राजीनाम्यावरून अंतर्गत धुसफूस, कार्यकर्त्यांचे आंदोलन आणि महाविकास आघाडीच्या फुटीच्या चर्चांनी जोर पकडला आहे. या जोरदार राजकीय घडमोडीत रोहित पवारांच्या कारखान्यासंबंधी हा निर्णय आला.

राज्य सरकारने 15 ऑक्टोबर 2022 गाळप हंगाम सुरू करण्याची तारीख जाहीर केली होती. मात्र, रोहित पवार यांच्या शेटफळगढे (ता. इंदापूर) येथील बारामती अॅग्रो साखर कारखान्याने या तारखेआधीच गाळप सुरू केले, अशी तक्रार विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी साखर आयुक्तांकडे केली होती. तसेच विधान परिषदेमध्ये लक्षवेधी क्रमांक 7 च्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित केला होता.

बारामती अॅग्रो साखर कारखान्याने मंत्री समितीच्या निर्णयाचे उल्लंघन केल्याचा आरोप झाला. या प्रकरणी बारामती अॅग्रोचे व्यवस्थापकीय कार्यकारी संचालक सुभाष गुळवे यांच्यावर भिगवण पोलिस ठाण्यात कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल झाला. त्यानंतर या प्रकरणी साखर आयुक्तालयातील विशेष लेखापरीक्षकांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. मात्र, या अहवालातही विसंगती आढळली. त्यामुळे लेखापरीक्षकांचेही निलंबन करण्यात आले होते.

विशेष म्हणजे मार्च महिन्यात या प्रकरणी बारामती अॅग्रो साखर कारखान्याची बाजू समजून घेण्यासाठी साखर आयुक्तांनी सुनावणी घेतली. यावेळी वकिलांनी मांडलेल्या मुद्यांवरही त्यांनी आक्षेप घेतला. बारामती अॅग्रोचे गाळप मुदतीपूर्वी सुरू झाले की नाही, याचे उत्तर काही मिळाले नाही. मात्र, साखर आयुक्तांनी या कारखान्याला साडेचार लाखांचा दंड ठोठावला.

गेल्या विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपचे उमेदवार व माजी मंत्री राम शिंदे यांचा पराभव करून रोहित पवार आमदार झाले होते. तेव्हापासून या मतदारसंघात शिंदे विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळतो. आता बारामती ॲग्रो च्या निमित्ताने शिंदे विरुद्ध पवार असा संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.

भारत-अमेरिका भागीदारी हा 21व्या शतकातील एक महत्त्वाचा क्षण आहे- पीयूष गोयल

नवी दिल्ली-

भारत आणि अमेरिका भागीदारी हा 21 व्या शतकातील एक अतिशय महत्त्वाचा क्षण आहे, असे केंद्रीय वाणीज्य आणि उद्योग, वस्त्रोद्योग आणि ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरणमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले आहे. “ चले साथ साथः पुढे वाटचाल करताना” या घोषवाक्याचा त्यांनी या भागीदारीच्या दृढतेचे महत्त्व अधोरेखित करताना पुनरुच्चार केला. नवी दिल्ली येथे अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स इन इंडिया (AMCHAM) च्या 31व्या सर्वसाधारण सभेत “भारत-अमेरिका भागीदारीः भविष्यातील बळकटीकरण” या विषयावर आयोजित  सत्राच्या उद्घाटन समारंभात ते आज बोलत होते, यावेळी त्यांनी भारत-अमेरिका यांची वृद्धी आणि समृद्धीच्या दृष्टीकोनातून दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूकविषयक संबंधांमध्ये विविधता आणण्याचे आणि हे संबंध अधिक दृढ करण्याचे महत्त्व सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन या दोन्ही नेत्यांचा परस्परांशी चांगला परिचय आहे आणि जगभरातील गुंतागुंतीच्या भूराजकीय समस्यांवर तोडगे काढण्यासाठी दोघे एकमेकांसोबत खूप चांगल्या प्रकारे काम करतात यावर त्यांनी भर दिला. टॅलेन्ट(गुणवत्ता) टेक्नॉलॉजी(तंत्रज्ञान), ट्रेडीशन(परंपरा), ट्रेड(व्यापार) आणि ट्रस्टीशिप(विश्वस्त वृत्ती) हे पंतप्रधानांनी निर्धारित केलेले पाच टी भारत आणि अमेरिका नातेसंबंधाचा दृष्टीकोन आहेत, असे गोयल यांनी सांगितले.

गेल्या दोन वर्षात भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार सर्वाधिक पातळीवर पोहोचला आहे असे त्यांनी नमूद केले आणि आगामी काळात त्यामध्ये अनेक पटींनी वाढ होईल, असा विश्वास व्यक्त केला.

अमेरिकेतून काम करणाऱ्या आणि त्याच प्रकारे भारतातून काम करणाऱ्या अमेरिकी कंपन्यांची गोयल यांनी उदाहरणे दिली आणि कशा प्रकारे या कंपन्या परस्परांच्या अर्थव्यवस्थांमध्ये योगदान देत आहेत ते अधोरेखित केले.

भारतामधून जगभरात पुरवली जाणारी तांत्रिक आणि व्यवस्थापन कुशल गुणवत्ता संपूर्ण जगासोबत भारताचे संबंध बळकट करत आहे असे त्यांनी सांगितले. अनेक अमेरिकी कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदांवर भारतीय किंवा भारतीय वंशाचे अधिकारी(सीईओ) काम करत असल्याचे त्यांनी दाखले दिले.

भारतामध्ये अमृत काळ हा अतिशय महत्त्वाचा कालखंड असून त्यामध्ये लोकसंख्याविषयक लाभांश देशाच्या अर्थव्यवस्थेची भरभराट करण्यात आणि देशाचे भवितव्य घडवण्यात योगदान देत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. व्यवसायांमध्ये सरकारचा किमान हस्तक्षेप असल्याने उच्च दर्जाच्या उत्पादनांची आणि सेवांची निर्मिती करून उद्योगांनी स्वतःच्या पायावर उभे राहणे अतिशय महत्त्वाचे आहे यावर गोयल यांनी भर दिला.

प्रेम वारं ..ओसाड जमिनीला प्रेमाच्या पाण्याची आस ..

संगीत ,गाणी ,हे फक्त मनोरंजनाच विश्व नसून त्यातून समाज प्रबोधन सुद्धा करता येत ,मुक्याला वाचा देता येते ,ओसाड .उजाड पडलेल्या जमिनीला पाण्याच्या प्रेमाने बहार देता येते ,रूढी परंपरेच्या नावाखाली चिरडल्या जाणाऱ्या चिमुकल्या रोपट्यानंसाठी ,या देशातील तमाम शोषित वंचित देवदासींनी साठी …प्रेम वारं …

संगीत क्षेत्रात बोल बंजारा या नवीन music  चॅनेल द्वारे दमदार आणि झंझावात प्रदार्पण  करणाऱ्या दिग्दर्शक व निर्माता श्री .संजीवकुमार राठोड यांची आणखी एक नूतन व प्रबोधनात्मक कलाकृती …प्रेम वारं .

देवदासी – देव आणि धर्माच्या नावावर ,स्वतःला खुश करण्यासाठी दुसऱ्याच्या आयुष्यात दुःख व वेदना पेरून,काटेरी आयुष्य उगवणारी प्रथा ,याच कथेवर प्रकाश टाकून ,मनाला आणि आयुष्याला लख लख करणारी प्रेम कहाणी म्हणजे मराठी अल्बम प्रेम वार ! ईश्वराशी लग्न लावून माणसांशी नातं तोडणारी  क्रूर व घाणेरडी परंपरा …देवदासी .

देवदासी हि प्राचीन प्रथा  ,भारतात खास करून दक्षिण भारतात धर्म आणि आस्थेच्या नावावर सुरु झालेली वेश्यावृतीची हि दलदल ,देवाला खुश करण्यासाठी स्वतःला महिला देवासाठी समर्पित करायची,कालातंराने देव आणि देवदासमधील दूत म्हणून पुजाऱ्यांनी ह्या सर्व स्त्रियां सोबत शरीर संबंध ठेवायला सुरुवात केली आणि या तथाकथित महान परंपरेला राजा महाराजांनी हातभार लाऊन त्याचा बाजार मांडला  व मुगल काळात जेव्हां देवदासींची संख्या वाढू लागली व त्याचं पालन पोषण पुजारी व अय्याश राजांच्या आटोक्याच्या बाहेर गेल तेंव्हा देवदासींना सार्वजनिक संपती घोषित करून ती लोक मोकळी झाली ! मुख्यतः आंध्रप्रदेश व कर्नाटक मध्ये हि प्रथा ,परंपरा आज  हि सुरु आहे .

या सामाजिक व प्रबोधनात्मक गाण्याला  संगीतबद्ध केलं आहे संगीत दिग्दर्शक श्री. कृष्णा दाभाडे आणि श्री. प्रशांत फसगे यांनी ,स्वरबद्ध केलं आहे श्री.कृष्णा दाभाडे आणि कु.प्रतीक्षा भाटिया यांनी ,गीतकार म्हणून श्री .सुमित वाघमारे ,श्री .अभिजीत आणि आर .आर .कोलेकर यांचं योगदान आहे .

एक उत्कृष्ट गाणं करायला एक उत्तम निर्माता व त्यांची फौज लागते ,निर्माता म्हणून श्री. संजीवकुमार राठोड ,श्री.सतीश रमेश काकडे ,श्री.रुपेश सुरेश रोकाटे ,श्री.प्रमोद कांबळे यांनी धुरा सांभाळली आहे .या सुंदर गाण्यांत अभिनेता श्री.संकेत मोरे व अभिनेत्री कु.श्रेया पळसकर यांनी दमदार कामगिरी केली आहे.

तंत्रज्ञाच्या  टीम मध्ये DOP म्हणून श्री.पारस मोनी बोरा व श्री .शुभम नाईक ,क्रीयेटीव्ह डायरेक्टर व सह निर्माता श्रीमती .शालिनी राठोड ,कार्यकारी निर्माता म्हणून श्री.शादाब अख्तर व प्रथमेश शेलकर यांचा समावेश आहे. 

‘थरार प्रेमाचा-अथिरन’ ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’

हिंदी, मराठीसह प्रादेशिक तसेच विदेशी मनोरंजन क्षेत्रात आपला प्रभाव निर्माण करणाऱ्या ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’ने नुकतेच ‘अल्ट्रा झकास’ हे मराठी ओटीटी सुरु करून अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली आहे. अवघ्या काही दिवसांत जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीने प्रेक्षकांच्या मनात मानाचं स्थान मिळवलं आहे. प्रत्येक आठवड्याला नवीन आणि झकास कन्टेंट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार असल्याचा शब्द पाळत, ‘अल्ट्रा झकास’ ओटीटी ‘थरार प्रेमाचा- अथिरन’ डिजिटल प्रीमियरची घोषणा करत आहेत. ८ मेपासून या अल्ट्रा झकासवर या चित्रपटाचा थरार रंगणार आहे.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीत बहुचर्चित ठरलेल्या ‘अथिरन’ या मल्याळम भाषेतील चित्रपटाचा मराठीत डब केलेला ‘थरार प्रेमाचा- अथिरन’ हा चित्रपट एक्स्क्लुझिवली अल्ट्रा झकास ओटीटी अॅपवर पाहता येणार आहे. पुष्पाफेम अभिनेता फहाद फासिल, अभिनेत्री साई पल्लवी, अभिनेता अतुल कुलकर्णी आणि प्रकाश राज यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असणाऱ्या या चित्रपटाच दाक्षिणात्य दिग्दर्शक विवेक यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शन केलं आहे. भूतकाळातल्या घटनांमध्ये अडकलेल्या आणि उपचारासाठी एका रुग्णालयात डांबून ठेवलेल्या नित्याच्या सुटकेचा मनोरंजक थरार प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

“कलाकारांची उत्तम फळी लाभलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणताना आम्हाला आनंद होत आहे. शिवाय, चित्रपटाची रहस्यांनी आणि थराराने परिपूर्ण कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवेले. दाक्षिणात्य सिनेविश्वात बहुचर्चित असणारा हा चित्रपट आम्ही मराठी भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहोत. ‘अल्ट्रा झकास’च्या रुपात जगभरातील मराठी रसिक प्रेक्षकांपर्यत ‘मराठी मनोरंजन’ पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.” अशी प्रतिक्रिया अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट व अल्ट्रा झकासचे एमडी आणि सीईओ सुशीलकुमार अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे.

दोन हजार तासांपेक्षा अधिक तासांचा कन्टेंट उपलब्ध असणाऱ्या ‘अल्ट्रा झकास’वर मराठी भाषेत डब केलेले दाक्षिणात्य आणि हॉलीवूडच्या चित्रपटांबरोबरच, जुने आयकॉनीक मराठी चित्रपट आणि विविध विषयांवरील वेब सीरिज, किड्स अॅनिमेश, वेब-शो असा मनोरंजनाचा खजिना उपलब्ध आहे. ‘अल्ट्रा झकास’ हा ओटीटी अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी प्ले-स्टोअर आणि अॅपल वापरकर्त्यांसाठी ॲप-स्टोअरवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्या आवडीनुसार सबस्क्रिप्शन घेऊन तुम्हाला ‘अल्ट्रा झकास’वरच्या झकास कन्टेंटचा आनंद घेता येणार आहे. ५९ रुपयांत मासिक, १४९ रुपयांत तीन महिन्यांसाठी आणि २९९ रुपयाच्या सवलतीच्या दरात वार्षिक सबस्क्रिप्शन असणार आहे.

नॅकच्या प्रोसेस मध्ये  सर्वांनी आपले राष्ट्रीय उत्तरदायित्व म्हणून काम करावे-डॉ. जगन्नाथ पाटील

पुणे-अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे संयुक्त विद्यमाने नॅक:  बेंचमार्किंग फॉर क्वॉलिटी इम्प्रूमेंट इन हायर एज्युकेशन’   या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. जगन्नाथ पाटील नॅक ॲडव्हायझर बेंगलोर, डॉ.मनोहर चासकर अधिष्ठाता, सायन्स ॲड टेक्नोलॉजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मा.सौ.प्रमिला गायकवाड सरचिटणीस, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद व खजिनदार श्री. विजयसिंह जेधे यांचे हस्ते  राजर्षी शाहू महाराज यांचे प्रतिमेस पुष्पहार घालून झाले. या प्रसंगी डॉ.पाटील यांनी  नॅक मुल्यांकन ही निरंतर प्रक्रिया असून शैक्षणिक उपक्रमात नॅक मुल्यांकनाला भविष्यात पर्याय नाही.  प्रत्येक महाविद्यालयाला व  शिक्षकांना या प्रक्रियेस सामोरे जायचे आहे. त्यामुळे भीती न बाळगता त्या प्रक्रियेत सहभागी व्हा . या प्रसंगी  बेंचमार्किंग चे विविध प्रकार, स्टुडन्ट  सॅटिस्फॅक्शन सर्वे, कागदपत्र पडताळणी (DVV),ॲल्युमि व इंडस्ट्री सहभाग, बेस्ट प्रॅक्टिसेस या विषयी मार्गदर्शन करताना जागातील शैक्षणिक संस्थांची उदाहरणे देऊन बेंचमार्किंग चे महत्व सांगितले. संस्थेच्या, समाजाच्या व देशाच्या शाश्वत विकासासाठी बेंचमार्क  खूप महत्वाचे आहेत. या बेंचमार्कला मार्क्स आल्यामुळे महाविद्यालयांना आपण कुठे कमी पडतो या विषयी माहिती मिळते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या सात टक्के खर्च उच्च शिक्षणावर व्हावा.  याच बरोबर नॅक मूल्यांकनासाठी येऊ घातलेल्या ‘परिसस्पर्श’ योजनेविषयी माहिती दिली.  प्राध्यापकांनी गुणवत्तेसाठी काम करत रहावे  शिक्षण संस्थेला चांगला दर्जा आपोआप मिळेल असे सांगून नॅकच्या प्रोसेस मध्ये  सर्वांनी आपले राष्ट्रीय उत्तरदायित्व म्हणून काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. मनोहर चासकर यांनीं नॅक हि सर्वांची जबाबदारी असून टीचिंग लर्निंग प्रक्रियेत नवीन शैक्षणिक धोरणानुसार सिस्टम तयार केली पाहिजे . या सिस्टीमचा विद्यार्थ्या बरोबर समाजाला देखील फायदा झाला पाहिजे असे आवाहन शिक्षण संस्थाना केले.

सदर कार्यशाळेसाठी डॉ. जगन्नाथ पाटील, डॉ.मनोहर चासकर, मा.सौ.प्रमिला गायकवाड, श्री. विजयसिंह जेधे कार्यशाळेचे समन्वयक डॉ.राजेंद्र कोळी, महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ.शुभदा घोलप, डॉ.विलास पाटील, डॉ.सुनिल ठाकरे, विविध शिक्षण संस्थातील प्राध्यापकानी उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला.या कार्यशाळेचे सूत्र संचालन डॉ. दिपक गायकवाड यांनी केले तर आभार प्रा.रमा गायकवाड यांनी मानले. अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या वतीने योग्य वेळी या कार्यशाळेचे आयोजन केल्यामुळे  एकंदर नॅक प्रक्रिया, ती राबविताना येणारे प्रश्न, त्यातील समस्या व उपाय या विषयावर महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या शंकांचे निरसन पाटील यांनी केल्याने प्राध्यापकांनी समाधान व्यक्त केले.

संस्कृती मंत्रालय आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघासोबत 5 मे रोजी साजरी करणार वैशाख पौर्णिमा

‘संयुक्त राष्ट्रांचा वैशाख दिन’ साजरा करण्यासाठी दिल्ली आणि देशभरात विविध कार्यक्रमांचे होणार आयोजन

वी दिल्ली-

संस्कृती मंत्रालय आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघासोबत(IBC) 5 मे रोजी वैशाख पौर्णिमेचा पवित्र दिवस श्रद्धा आणि भक्तीभावाने साजरा करणार आहे. आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ(IBC) हिमालयन बौद्ध संस्कृती संस्थेच्या समन्वयाने नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालयात हा कार्यक्रम साजरा करणार आहे.

अनेक स्वायत्त बौद्ध संघटना आणि संस्कृती मंत्रालयांतर्गत असलेल्या अनुदानित संस्थांकडून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

लेहच्या केंद्रीय बौद्ध अध्ययन संस्थेचे सर्व कर्मचारी आणि 600 विद्यार्थी लडाख बौद्ध संस्था आणि लडाख गोन्पा संस्था यांनी लेहमध्ये पोलो मैदानावर आयोजित केलेल्या भव्य सोहळ्यात सहभागी होणार आहेत. यावेळी सीआयबीएस, लेह च्या विद्यार्थ्यांकडून ‘मंगलाचरण’( आमंत्रण प्रार्थना) सादर करण्यात येईल. याशिवाय यावेळी भगवान बुद्धांचा जन्म आणि त्यांचे पहिले प्रवचन यांचे दर्शन घडवणारे सीआयबीएस, लेह च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले दोन चित्ररथ प्रदर्शित करण्यात येतील.

बुद्ध जयंती सोहळ्याचे पहाटे सहा वाजता आयोजन झाल्यानंतर डीएचआयएच या संशोधन पत्रिकेच्या 63व्या आवृत्तीचे प्रकाशन सारनाथ येथील केंद्रीय उच्च तिबेटी अध्ययन संस्था (CIHTS) यांच्याकडून होईल. बिहारमधील नालंदा येथील नवनालंदा महाविहारच्या भिक्खू-विद्यार्थ्यांकडून पारंपरिक पूजा करण्यात येईल. त्यानंतर ‘बौद्ध तत्वज्ञान आणि बिहार’ या विषयावर एका दिवसाच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येईल.

पूजा समारंभ आणि इतर विधींसोबतच या पवित्र प्रसंगी केंद्रीय हिमालयन संस्कृती अध्ययन संस्था  दाहुंग, अरुणाचल प्रदेश कडून एका वादविवाद स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात येणार आहे.

अरुणाचल प्रदेशातील गेन्त्से गादेन राबग्याल मठातर्फे देखील या पर्वानिमित्त मठातील संन्यासी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विश्व शांतता प्रार्थना तसेच ‘मंगलाचरण’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने तिबेट हाऊस येथे आकांक्षी बोधिसत्त्व व्रताचे आचरण करण्यात येणार आहे.

अरुणाचल प्रदेशातील तवांग मठामध्ये या पवित्र सणानिमित्त “बुद्धाची शिकवण, शांतता आणि स्थिरचित्तता” या विषयावर वक्तृत्व-वजा व्याख्यान स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या पवित्र दिवसाचे औचित्य साजरे करण्यासाठी 1 ते 5 मे 2023 या कालावधीत हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथील लायब्ररी ऑफ तिबेटीयन वर्क्स अँड अर्काईव्ह्ज (एलटीडब्ल्यूए) या संस्थेतर्फे “प्राणी जाणीव परिषदे”चे आयोजन करण्यात आले आहे.

संपूर्ण जगभरातील बौद्ध समुदायासाठी वैशाख बौद्ध पौर्णिमा हा दिवस वर्षभरातील अत्यंत शुभ दिवस समजला जातो कारण या दिवशी भगवान बुद्धांच्या जीवनातील- जन्म, आत्मज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तीन महत्त्वाच्या घटना घडल्या असे मानले जाते. बौद्ध धर्माचा उगम भारतात झाल्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच वर्ष 1999 पासून संयुक्त राष्ट्रांनी या दिवसाला ‘संयुक्त राष्ट्र वेसाक दिन’ अशी ओळख देखील प्राप्त करून दिली आहे. यावर्षी 5 मे रोजी वैशाख बौद्ध पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे.

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने नुकतेच  (20-21 एप्रिल या काळात)पहिल्या जागतिक बौद्ध शिखर परिषदेचे आयोजन केले होते. जगभरातील 30 देशांतून 500 पेक्षा जास्त प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेचे उद्घाटन केले होते. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने नवी दिल्ली येथे मुख्यालय असलेल्या जागतिक संरक्षक संस्था आयबीसी या त्यांच्या अनुदान देणाऱ्या संस्थेसह 14 आणि 15 मार्च रोजी एका आंतरराष्ट्रीय बैठकीचे यशस्वी आयोजन केले होते. शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) सदस्य देशांतील बौद्ध कलांमध्ये आंतर-सांस्कृतिक दुवे नव्याने स्थापित करणे तसेच या कलांमधील समानता शोधणे या उद्देशाने “सामायिक बौद्ध वारसा” या विषयावर आयोजित केलेल्या या बैठकीमध्ये एससीओ सदय देशातील तज्ञांचा समावेश होता.

‘विश्वमाता गौमाता’ नृत्य नाटिकेतून गोमाता सुरक्षेचा संदेश

श्री शक्तीदर्शन योगाश्रम, किन्नीगोळी आणि सुरभिवन गौशाळा यांच्या वतीने आयोजन ; ‘देशी’ – भारतीय गायींच्या लुप्त होत चाललेल्या जातीला वाचवण्याचा एक प्रयत्न
पुणे : समुद्र मंथनातून गोमाता कामधेनूची उत्पत्ती… पृथ्वीला सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी भूमाताच गोमाता झाल्याची कथा… गाईची पूजा केल्यामुळे इंद्रदेवाने गोकुळात केलेला पावसाचा कहर… गोकुळवासियांना आणि गाईंना वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने करंगळीवर उचललेला गोवर्धन पर्वत…  अशा विविध कथांच्या माध्यमातून ‘विश्वमाता गौमाता’ ही नृत्य नाटिका सादर झाली. भारतीय गायींचे महत्व आणि त्यांच्या लुप्त होत चाललेल्या जातीला वाचविण्याचा आणि संपूर्ण भारतभर गोमातेचे संरक्षण सुनिश्चित करण्याचा प्रयत्न या नाटिकेतून करण्यात आला.


श्री शक्तीदर्शन योगाश्रम, किन्नीगोळी आणि सुरभिवन गौशाळा – ओम प्रकृती धामा ट्रस्ट, कोंपंडावू यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिरात ‘विश्वमाता गौमाता’ या नृत्य नाटिकेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी योगाभ्यासी आचार्य केदारनाथ, प.पू. गुरुजी देवदास राव (देवबाबा), कैलासनाथ नंदा, आदी मान्यवर उपस्थित होते. गोरक्षण व गोसंवर्धन चळवळीचे मूळ प्रवर्तक पूज्य गोजीवन श्री चौंडे महाराज प्रथम गोव्रती पुरस्कार श्री गोवर्धन महिला व बालविकास फाउंडेशन यांच्या तर्फे देवबाबा यांना देण्यात आला. 
आत्तापर्यंत भारतातील विविध भागांमध्ये ‘विश्वमाता गौमाता’ चे ५५  प्रयोग  झाले आहेत व हा ५६ वा प्रयोग आहे. तसेच एकूण १०८  प्रयोगांचा संकल्प करण्यात आला असून संपूर्ण भारत वर्षात त्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. यावेळी परीक्षित राजाने गोहिंसकांना, गोहत्या करणाऱ्यांना दिलेली शिक्षा… आपल्या वासराला सिंहापासून वाचवण्यासाठी गाईने केलेला आक्रोश याच्या सादरीकरणाने  उपस्थित रसिक वर्ग थक्क झाला.

आचार्य केदारनाथ म्हणाले, आपल्या भारतीय संस्कृतीत जो आपल्याला चांगल्या गोष्टी देतो, मदत करतो त्याला आपण देव मानतो. मग गौमातेपासून मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टी महत्वाच्या आहेत. आपल्यासाठी ती देवताच आहे, म्हणून तिचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे, असे ही त्यांनी सांगितले.

देवदास राव म्हणाले, आपल्या प्राचीन धर्मग्रंथांनी गोमातेच्या अंगभूत गुणांचा गौरव केला आहे आणि गायीला विश्व मातेचा दर्जा दिला आहे. गाईवर तिच्या उत्पादनावर संशोधन झाले तर अनेक औषधी कंपन्या बंद होतील. गाय ही फक्त दूध देण्याचे मशीन नाही तर तिच्यामध्ये अनेक रोगांचे निवारण करण्याची शक्ती आहे. आपण गाईसाठी फक्त दुःख करतो परंतु तिच्यासाठी काम करण्याची तयारी दाखवत नाही. गाईचे संरक्षण करण्यासाठी आपण पुढे आले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

सदाशिव पेठेतील श्री लक्ष्मी नरसिंह मंदिरात श्री नृसिंह जयंती साजरी

मंदिराचे २५० वे वर्ष ; फुलांची आकर्षक सजावट व धार्मिक कार्यक्रम
पुणे : सदाशिव पेठेतील श्री लक्ष्मी नरसिंह मंदिरात श्री नृसिंह जयंती निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी नृसिंह याग संपन्न झाला. तर,  सायंकाळी कीर्तनकार सदानंद बुवा ताम्हनकर यांचे नृसिंह जन्माचे कीर्तन झाले. मंदिराला आकर्षक पुष्पसजावट व विद्युतरोषणाई करण्यात आली.

मंदिराचे यंदा २५० वे वर्ष आहे. उत्सवाच्या निमित्ताने मुख्य पूजा दिलीप जोशी, अभिजित जोशी, अद्वैत जोशी आणि शेखर नांदे यांनी केली. उत्सवाच्या निमित्ताने दररोज मंदिरात विशेष पूजा होत होती आणि भजन, याग, कीर्तन, संगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच ५६ भोग प्रसाद नैवैद्य दाखवण्यात आला होता.

प्राप्तीकर विभागाचे पुणे, पिंपरी चिंचवड शहरात 40 ठिकाणी छापे; बिल्डरची कार्यालये, निवासस्थानी झाडाझडती

पुणे- शहरातील तीन बांधकाम व्यावसायिकाशी संबधित ४० ठिकाणांवर प्राप्ती कर विभागाने गुरुवारी एकाचवेळी छापे घातले आहे. प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरात ही छापेमारी केल्याने खळबळ उडाली आहे.आयकर खात्याच्या पथकाने बांधकाम व्यावसायिकांचे कार्यालय आणि निवासस्थानी जाऊन कारवाई केलेली आहे. या कारवाईत काही कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक डाटा जप्त करण्यात आला आहे. पाषाण रस्त्यावरील सिंध सोसायटी आणि पिंपरी चिंचवड भागात संबधित कारवाई करण्यात आली.

या कारवाईत प्राप्तीकर विभागातील मुंबई, पुणे कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी मिळून एकूण २५० जण सहभागी झाले. प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळी तपास पथके तयार करुन ४० ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले आहे.

औंध परिसरात सिंध सोसायटी ही उच्चभ्रू सोसायटी असून सदर ठिकाणी तीन बांधकाम व्यवसाय राहतात ते एकमेकांचे व्यावसायिक भागीदार असून आयकर विभागाच्या रडावर ते आलेले आहेत. आयकर विभागाने त्यांच्याशी संबंधित कार्यालय आणि निवासस्थानी आदी जागी बांधकाम व्यवसायातील आर्थिक व्यवहारात अनियमित असल्याचे सांगत कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी छापेमारी का करण्यात आली याबाबतचा अधिकृत खुलासा आयकर विभागांनी केलेला नाही.

शरद पवारांकडून राजीनामा मागे घेण्याचे संकेत; कार्यकर्त्यांच्या भावना दुर्लक्षित न करता दोन दिवसांत निर्णय घेणार

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्याचे संकेत दिलेत. कार्यकर्त्यांच्या भावना दुर्लक्षित न करता येत्या एक-दोन दिवसांत अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.शरद पवार यांनी मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण केंद्राबाहेर ठिय्या मांडलेल्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यावेळी या भावना व्यक्त केल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.शरद पवार कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाले की, राजीनामा देण्यापूर्वी तुमच्याशी चर्चा केली असती, तर तुम्ही विरोध केला असता. तुमच्या भावनांचा आदर करतो. आता तुम्हा सर्वांची भावना लक्षात घेऊन येत्या एक ते दोन दिवसांत अंतिम निर्णय घेऊ. हा निर्णय घेताना कार्यकर्त्यांच्या मनातली भावना दुर्लक्षित केली जाणार नाही. दोन दिवसांनंतर तुम्हाला असे बसावे लागणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. पवारांचे हे संकेत राजीनामा मागे घेण्याचे किंवा पक्षात सक्रिय राहण्याचे असल्याचे समजते.

शरद पवार यांनी दिलेला राजीनामा मागे घ्यावा, या मागणीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून जोर धरला आहे. राज्यभरातील अनेक कार्यकर्त्यांनी याच मागणीसाठी मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण केंद्राबाहेर ठिय्या मांडला आहे, तर कोणी रक्ताने पत्र लिहित आहेत. हे पाहता सुप्रिया सुळे यांनी सकाळीही कार्यकर्त्यांना माघार घ्यावी. रक्ताने पत्र वगैरे लिहू नये, असे आवाहन केले. मात्र, तरीही कार्यकर्ते हटायला तयार नव्हते. हे पाहता तीन-सव्वातीनच्या सुमारास शरद पवार यांनी कार्यकर्त्यांची भेट घेत संवाद साधला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, गेल्या तीन दिवसापासून आम्ही आंदोलन करत आहोत. आमच्या भावना विचारात घेऊ, असे शरद पवार आमच्याशी बोलताना म्हणाले. तुम्हा सर्व कार्यकर्त्यांना मी विचारला हवे होते. मात्र, विचारले असते तर तुम्ही विरोध केला असता, हे सुद्धा ते म्हणाले. नवे नेतृत्व पुढे यावे म्हऊन मी निर्णय घेतला होता. मात्र, देशातल्या सर्व भागातून लोक भेटायला येत आहेत. ते निर्णय मागे घ्या म्हणत आहेत, यावर दोन दिवसांत विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सह्याद्रि  हॉस्पिटल्स तर्फे पुण्यात प्रथमच पार पडले स्वॅप लिव्हर ट्रान्सप्लांट

पुणे, ०४ मे २०२३: सह्याद्रि हॉस्पिटल्स च्या ट्रान्सप्लांट टीमने पुण्यातील पहिले स्वॅप यकृत प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पाडले. या शस्त्रक्रिया नुकत्याच सह्याद्रि  सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, डेक्कन जिमखाना येथे करण्यात आल्या. लिव्हर सिरोसिसने (खराब झालेल्या यकृताने ग्रस्त असलेली परिस्थिती) ग्रस्त असलेल्या दोन रुग्णांवर एकाच वेळी जीवरक्षक यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. सह्याद्रि  हॉस्पिटल्स येथील यकृत आणि बहु-अवयव प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख डॉ बिपिन विभूते या स्वॅप यकृत प्रत्यारोपणाचे प्रमुख सर्जन होते.

प्रत्येक दाता प्राप्तकर्त्यांपैकी एकाच्या नात्यातला असला तरी त्यांचे यकृत परस्परांशी जुळणारे (कमपॅटीबल) नव्हते म्हणून डॉ. बिपिन विभूते यांनी द्वि-मार्गी प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला दोन्ही कुटुंबांनी सहमती दर्शविली. या स्वॅपच्या हृदयस्पर्शी कथेमध्ये महाराष्ट्रातील बुलढाणा येथील शिक्षक अजित (नाव बदलले आहे) आणि अहमदनगर जिल्हयामधील व्यावसायिक अमर (नाव बदलले आहे)  यांचा समावेश आहे. या दोन्ही व्यक्तींचे विधिलिखित सारखेच होते. शस्त्रक्रियेदरम्यान अमर यांच्या पत्नी स्वरा (नाव बदलले आहे) यांनी त्यांचे यकृत अजित यांना दिले. तर अजित यांच्या पत्नी गीता (नाव बदलले आहे) यांनी त्यांचे यकृत अमर यांना दान केले.

२० तासांच्या या कठीण शस्त्रक्रियेने शहरातील पहिले यशस्वी टू-वे यकृत प्रत्यारोपण स्वॅप पार पडले आणि या क्षेत्रातला हा एक मैलाचा दगड ठरला.

सह्याद्रि हॉस्पिटल्स मधील यकृत आणि बहु-अवयव प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख डॉ. बिपीन विभूते म्हणाले, “स्वॅप प्रत्यारोपण यापूर्वी मुंबई आणि दिल्लीसारख्या प्रमुख शहरांमध्ये झाले आहे, परंतु अलीकडेच झालेले हे प्रत्यारोपण पुण्यातले अशा प्रकारचे पहिलेच आहे. ज्या प्राप्तकर्त्यांचे नातेवाईक वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त आहेत पण रक्तगट किंवा यकृताचा आकार जुळत नसल्यामुळे ते त्यांचे यकृत दान करू शकत नाहीत अशा प्राप्तकर्त्यांसाठी या प्रकारची देवाणघेवाण जीवनरक्षक सिद्ध झाली आहे. एकाच वेळी दोन दाते आणि दोन प्राप्तकर्त्यांवर शस्त्रक्रिया करून दोन यकृते प्रत्यारोपण करण्यात आली. २५ सदस्यांचा समावेश असलेल्या वैद्यकीय पथकात ११ डॉक्टर आणि इतर कर्मचारी होते. चार ऑपरेटिंग रूममध्ये २० तासांहून अधिक काळ हे अत्यंत कठीण कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांनी सहकार्य केले.”

अशा शस्त्रक्रियांपूर्वी रुग्णांचे समुपदेशन फार महत्त्वाची भूमिका बजावते यावर त्यांनी भर दिला. भूल देण्यापासून ते प्रत्यारोपण पूर्ण करण्यापर्यंत चारही शस्त्रक्रिया एकाच वेळी चार ऑपरेटिंग रूम मध्ये करणे हे सर्वात मोठे आव्हान होते.

नुकत्याच झालेल्या स्वॅप यकृत प्रत्यारोपणाच्या यशामुळे, सह्याद्रि हॉस्पिटल्स मधील डॉक्टरांना भविष्यात आणखी रुग्णांचे जीव वाचवता येतील असा विश्वास प्राप्त झाला आहे.

प्रत्यारोपण टीममध्ये हेपॅटोबिलरी आणि लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन – डॉ. बिपिन विभूते, डॉ. अनिरुद्ध भोसले, डॉ. अभिजीत माने, डॉ. विकास चौधरी, डॉ. शरण नरुटे, डॉ. अनुराग श्रीमल, ट्रान्सप्लांट भूलतज्ञ डॉ. मनीष पाठक, डॉ. मनोज राऊत, ट्रान्सप्लांट कॉर्डिनेटर राहुल तांबे, अरुण अशोकन आणि अमन बेले तसेच वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते शर्मिला पाध्ये आणि अजिंक्य बोराटे यांचा समावेश होता.