मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्याचे संकेत दिलेत. कार्यकर्त्यांच्या भावना दुर्लक्षित न करता येत्या एक-दोन दिवसांत अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.शरद पवार यांनी मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण केंद्राबाहेर ठिय्या मांडलेल्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यावेळी या भावना व्यक्त केल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.शरद पवार कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाले की, राजीनामा देण्यापूर्वी तुमच्याशी चर्चा केली असती, तर तुम्ही विरोध केला असता. तुमच्या भावनांचा आदर करतो. आता तुम्हा सर्वांची भावना लक्षात घेऊन येत्या एक ते दोन दिवसांत अंतिम निर्णय घेऊ. हा निर्णय घेताना कार्यकर्त्यांच्या मनातली भावना दुर्लक्षित केली जाणार नाही. दोन दिवसांनंतर तुम्हाला असे बसावे लागणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. पवारांचे हे संकेत राजीनामा मागे घेण्याचे किंवा पक्षात सक्रिय राहण्याचे असल्याचे समजते.
शरद पवार यांनी दिलेला राजीनामा मागे घ्यावा, या मागणीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून जोर धरला आहे. राज्यभरातील अनेक कार्यकर्त्यांनी याच मागणीसाठी मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण केंद्राबाहेर ठिय्या मांडला आहे, तर कोणी रक्ताने पत्र लिहित आहेत. हे पाहता सुप्रिया सुळे यांनी सकाळीही कार्यकर्त्यांना माघार घ्यावी. रक्ताने पत्र वगैरे लिहू नये, असे आवाहन केले. मात्र, तरीही कार्यकर्ते हटायला तयार नव्हते. हे पाहता तीन-सव्वातीनच्या सुमारास शरद पवार यांनी कार्यकर्त्यांची भेट घेत संवाद साधला.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, गेल्या तीन दिवसापासून आम्ही आंदोलन करत आहोत. आमच्या भावना विचारात घेऊ, असे शरद पवार आमच्याशी बोलताना म्हणाले. तुम्हा सर्व कार्यकर्त्यांना मी विचारला हवे होते. मात्र, विचारले असते तर तुम्ही विरोध केला असता, हे सुद्धा ते म्हणाले. नवे नेतृत्व पुढे यावे म्हऊन मी निर्णय घेतला होता. मात्र, देशातल्या सर्व भागातून लोक भेटायला येत आहेत. ते निर्णय मागे घ्या म्हणत आहेत, यावर दोन दिवसांत विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.