पुणे, ०४ मे २०२३: सह्याद्रि हॉस्पिटल्स च्या ट्रान्सप्लांट टीमने पुण्यातील पहिले स्वॅप यकृत प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पाडले. या शस्त्रक्रिया नुकत्याच सह्याद्रि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, डेक्कन जिमखाना येथे करण्यात आल्या. लिव्हर सिरोसिसने (खराब झालेल्या यकृताने ग्रस्त असलेली परिस्थिती) ग्रस्त असलेल्या दोन रुग्णांवर एकाच वेळी जीवरक्षक यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. सह्याद्रि हॉस्पिटल्स येथील यकृत आणि बहु-अवयव प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख डॉ बिपिन विभूते या स्वॅप यकृत प्रत्यारोपणाचे प्रमुख सर्जन होते.
प्रत्येक दाता प्राप्तकर्त्यांपैकी एकाच्या नात्यातला असला तरी त्यांचे यकृत परस्परांशी जुळणारे (कमपॅटीबल) नव्हते म्हणून डॉ. बिपिन विभूते यांनी द्वि-मार्गी प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला दोन्ही कुटुंबांनी सहमती दर्शविली. या स्वॅपच्या हृदयस्पर्शी कथेमध्ये महाराष्ट्रातील बुलढाणा येथील शिक्षक अजित (नाव बदलले आहे) आणि अहमदनगर जिल्हयामधील व्यावसायिक अमर (नाव बदलले आहे) यांचा समावेश आहे. या दोन्ही व्यक्तींचे विधिलिखित सारखेच होते. शस्त्रक्रियेदरम्यान अमर यांच्या पत्नी स्वरा (नाव बदलले आहे) यांनी त्यांचे यकृत अजित यांना दिले. तर अजित यांच्या पत्नी गीता (नाव बदलले आहे) यांनी त्यांचे यकृत अमर यांना दान केले.
२० तासांच्या या कठीण शस्त्रक्रियेने शहरातील पहिले यशस्वी टू-वे यकृत प्रत्यारोपण स्वॅप पार पडले आणि या क्षेत्रातला हा एक मैलाचा दगड ठरला.
सह्याद्रि हॉस्पिटल्स मधील यकृत आणि बहु-अवयव प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख डॉ. बिपीन विभूते म्हणाले, “स्वॅप प्रत्यारोपण यापूर्वी मुंबई आणि दिल्लीसारख्या प्रमुख शहरांमध्ये झाले आहे, परंतु अलीकडेच झालेले हे प्रत्यारोपण पुण्यातले अशा प्रकारचे पहिलेच आहे. ज्या प्राप्तकर्त्यांचे नातेवाईक वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त आहेत पण रक्तगट किंवा यकृताचा आकार जुळत नसल्यामुळे ते त्यांचे यकृत दान करू शकत नाहीत अशा प्राप्तकर्त्यांसाठी या प्रकारची देवाणघेवाण जीवनरक्षक सिद्ध झाली आहे. एकाच वेळी दोन दाते आणि दोन प्राप्तकर्त्यांवर शस्त्रक्रिया करून दोन यकृते प्रत्यारोपण करण्यात आली. २५ सदस्यांचा समावेश असलेल्या वैद्यकीय पथकात ११ डॉक्टर आणि इतर कर्मचारी होते. चार ऑपरेटिंग रूममध्ये २० तासांहून अधिक काळ हे अत्यंत कठीण कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांनी सहकार्य केले.”
अशा शस्त्रक्रियांपूर्वी रुग्णांचे समुपदेशन फार महत्त्वाची भूमिका बजावते यावर त्यांनी भर दिला. भूल देण्यापासून ते प्रत्यारोपण पूर्ण करण्यापर्यंत चारही शस्त्रक्रिया एकाच वेळी चार ऑपरेटिंग रूम मध्ये करणे हे सर्वात मोठे आव्हान होते.
नुकत्याच झालेल्या स्वॅप यकृत प्रत्यारोपणाच्या यशामुळे, सह्याद्रि हॉस्पिटल्स मधील डॉक्टरांना भविष्यात आणखी रुग्णांचे जीव वाचवता येतील असा विश्वास प्राप्त झाला आहे.
प्रत्यारोपण टीममध्ये हेपॅटोबिलरी आणि लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन – डॉ. बिपिन विभूते, डॉ. अनिरुद्ध भोसले, डॉ. अभिजीत माने, डॉ. विकास चौधरी, डॉ. शरण नरुटे, डॉ. अनुराग श्रीमल, ट्रान्सप्लांट भूलतज्ञ डॉ. मनीष पाठक, डॉ. मनोज राऊत, ट्रान्सप्लांट कॉर्डिनेटर राहुल तांबे, अरुण अशोकन आणि अमन बेले तसेच वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते शर्मिला पाध्ये आणि अजिंक्य बोराटे यांचा समावेश होता.